.. तूही प्रसन्न हास !

...................................
.. तूही प्रसन्न हास !
....................................

हा दूरचा प्रवास... किती दूरचा प्रवास !
अन् सावलीशिवाय न कोणीच आसपास !

सोईनुसार सारे ! ही सोय, गैरसोय...
तू आपुला !तुझा मी मानू कशास त्रास ?

ये...छेड मारव्याची तू आर्त आर्त धून...
ये...सांजवेळ माझी कर आणखी उदास !

तू सांग, घेतलीस कला ही कुणाकडून ?
कडवेपणा मनात नि वाणी तुझी मिठास !

गंधाळतेस माझ्या तू रोज काळजात...
येतो तुझ्या मनाला माझाच ना सुवास ?

मज सांग तूच - माझी तू लागतेस कोण ?
मज पाहता, तुझा का येतो फुलून श्वास ?

येतो कधी चुकून अता फक्त एक फोन...
बोलायचीस तेव्हा का रोज तास तास ?

माझ्या गुहेत ये तू केव्हातरी असाच...
काही चिजा इथेही आहेत खास खास !!

डोळे पुसून मीही आलो तुझ्यासमोर...
विसरून दुःख  सारे तूही प्रसन्न हास !

- प्रदीप कुलकर्णी

गझल: 

प्रतिसाद

येतो कधी चुकून अता फक्त एक फोन...
बोलायचीस तेव्हा का रोज तास तास ?
डोळे पुसून मीही आलो तुझ्यासमोर...
विसरून दुःख  सारे तूही प्रसन्न हास !
एकदम छान!

गंधाळतेस माझ्या तू रोज काळजात...
येतो तुझ्या मनाला माझाच ना सुवास ?
मज सांग तूच - माझी तू लागतेस कोण ?
मज पाहता, तुझा का येतो फुलून श्वास ?
येतो कधी चुकून अता फक्त एक फोन...
बोलायचीस तेव्हा का रोज तास तास ?
डोळे पुसून मीही आलो तुझ्यासमोर...
विसरून दुःख  सारे तूही प्रसन्न हास !
सुरेख ओळी..

ये...छेड मारव्याची तू आर्त आर्त धून...
ये...सांजवेळ माझी कर आणखी उदास !
डोळे पुसून मीही आलो तुझ्यासमोर...
विसरून दुःख  सारे तूही प्रसन्न हास !
सुरेल अन सुरेख ओळी....
एक अफ़्साना जिसे तकमील तक लाना न हो मुमकीन .....
 
 

मि. प्रदीप,
ही एक नितांतसुंदर रचना आहे. ग्रेट! आपण एक जबरदस्त गझलकार आहात हे जाणवते या गझलेतून.

तू सांग, घेतलीस कला ही कुणाकडून ?
कडवेपणा मनात नि वाणी तुझी मिठास !

गंधाळतेस माझ्या तू रोज काळजात...
येतो तुझ्या मनाला माझाच ना सुवास ?

वा वा!! फारच आवडले हे शेर.माझ्या गुहेत ये तू केव्हातरी असाच...
काही चिजा इथेही आहेत खास खास!!

भावनांचे अलगद शिंपण.

प्रदीप..
शेवटचा शेर मस्त जमलाय .. आणी सगळी गझल सुधा छान आहे...

प्रतिसाद देणाऱ्या सगळ्यांचे मनापासून आभार... लोभ आहेच; असाच राहू द्यावा...

१. परवीन शाकिरः मै क्यो उसको फोन करू, उसके भी तो इल्म मे होगा?
२. मख्मूर - बेअंत हा शब्द उर्दू वाटत आहे
३. अनंत ढवळे - भाषिक देवाणघेवाण गझलेत चालतेच. आणि गझल हा शब्दच मुळात उर्दू आहे.
४. चित्तरंजन भट -'दोजखे' हा शब्द वापरणे योग्य नाही, तो उर्दू आहे. ( माझ्या वखवखे मला या रचनेवर )
५. एक भूतकाळातील व्यक्तिमत्व - भटसाहेबांनी नाहीका कॉलरी हा शब्द वापरला होता?
६. भटसाहेब ( एल्गार ) - आपल्याच मायबोलीचे सामर्थ्य आम्हाला ठाऊक नसते हे आमचेच करंटेपण आहे. 
कोणची भूमिका खरी?
 

दागची गझल आठवली.
फिरे राहसे वो यहाँ आते आते
अजल मरगयी तू कहाँ आते आते
न जाना के दुनियासे जाता है कोई
बडी देर की मेहरबां आते आते
नही खेल ए दाग यारोंसे कहदो
आती है उर्दू जुबां आते आते

असेही करून बघावे. दु:ख बाहेर पाडणे व मन मोकळे मोकळे करणे हे गझलेचे सर्वात मोठ्ठे काम आहे.
हा दूरचा निवास किती दूरचा निवास
पोहोचता न येत तरीही म्हणाच व्यास
नाही कुणीच येथ, जयाला कळे बनाव
भट्टी कशी कळे न जळे आजही झकास
सारे पुढेच जात, न मागे कुणी पहात
आम्हास लागतोय, गिळावाच घास घास
या वेदना परार्ध, हजारो खुणा दिसेत 
वाटे नको नकोय, फुकाचा उगाच ध्यास
मज सांग तूच माझी तू लागतेस कोण
गझले तुझ्यामुळे मी वाटे पिऊन लास
ईर्शाद ना म्हणीत, न क्या बात है म्हणीत
कोणी नसे कुणास, कोणी नसे कुणास
माझ्या गुहेत ये तू, केव्हातरी असाच
ही शायरी उगाच, तपासाय रास रास