शब्द ठेचाळतो...

.........................
शब्द ठेचाळतो...
.........................


उंबऱ्याशी तुझ्या जीव घोटाळतो !
याचसाठी तुझी वाट मी टाळतो !


शब्द देऊन विसरून जातेस तू...
शब्द नाही दिला मी, तरी पाळतो !


दुःख नाहीच ते मानतो दुःख मी
कोरडी कोरडी आसवे ढाळतो !


लागते सावरावेच ना शेवटी ?
तोल जाता, मला मीच सांभाळतो !


तीच ती ही कथा ! तीच ती ही व्यथा !
सांगतो रोज मी ! रोज कंटाळतो !


बंद दारापुढे थांबतो रोज मी...
वाट पाहून पाहून ओशाळतो !


कीव माझी न वाटो जगाला, तुला...
जीव हा आतल्या आत मी जाळतो !


रोज उमलून येतेस तू अंतरी...
मोगरा रोज रक्तात गंधाळतो !!

भूतकाळात हिंडून येतो जरा...
रोज पत्रे जुनी मी तुझी चाळतो !


सापडूही नये मी कुणाला कुठे...
मी लपाया असे गाव धुंडाळतो !


भेटलेला मुका एक रस्त्यावरी
रोज स्वप्नात येऊन किंचाळतो !


सांज कलते जशी...या मनाच्या बनी
सावळा सावळा सूर रेंगाळतो !


आज सूर्यावरी वेळ आली अशी...
आरती काजव्यालाच ओवाळतो !


वाट सोपी न कविते, तुझी एवढी...
शब्द ठेचाळतो ! अर्थ रक्ताळतो !!


 


- प्रदीप कुलकर्णी

गझल: 

प्रतिसाद

मुका आणि शब्द हे शेर विशेष आवडले!
मतल्यातील "टाळतो" बद्दल एक मामुली तांत्रिक शंका आहे प्रदीपजी. हा अक्षरसमूह प्रत्येक शेरात चालवलेला दिसत नाही. असे का? मग "ळतो" तरी चालवायची गरज आहे का? माझ्या अगदी आताच्याच गझलेमधेही असाच मुद्दा निघाला होता.

माझ्या मते किंचाळतो जरा वेगळे वाटते. कल्पना आवडली.

उत्तम गझल..


खालील शेर "क्या बात है" आहेत.

शब्द देऊन विसरून जातेस तू...
शब्द नाही दिला मी, तरी पाळतो !तीच ती ही कथा ! तीच ती ही व्यथा !
सांगतो रोज मी ! रोज कंटाळतो !


बंद दारापुढे थांबतो रोज मी...
वाट पाहून पाहून ओशाळतो !

भेटलेला मुका एक रस्त्यावरी
रोज स्वप्नात येऊन किंचाळतो !

वाट सोपी न कविते, तुझी एवढी...
शब्द ठेचाळतो ! अर्थ रक्ताळतो !!

नेहमीप्रमाणे छान गझल.
त्यातही गंधाळतो, चाळतो व रेंगाळतो हे शेर अगदी  'कातिल'...

मतल्यातील अलामतीबद्दल मी तरी साशंकच आहे बुवा.
एकदा 'टाळतो' असे म्हटले की, 'टाळणे'च येत राहते.  हे खरे की , दोन्ही शब्द वेगवेगळ्या अर्थाचे आहेत,- 'घोटाळतो' आणि 'टाळतो' असे असले - तरीही अलामत सहीसलामत असती तर शेर आणि हा मतल्याचाच असल्यामुळे एकूण गझलेचेही अस्तित्व पगडी पचास झाले असते.
पण तरीही 'भूतकाळ', 'मुका', 'तीच ती कथा..', 'सूर्य' हे शेर सुंदर.
चूक भूल द्यावी, घ्यावी....
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०