मनसुबे

गंध इथले वेगळे पण श्वास माझा तोच आहे
बंध हे रेशम जरी मी त्यात गुदमरलोच आहे


नेमकेपण येत आहे आपल्या नात्यात आता 
बोलतो केव्हातरी अन त्यातसुद्धा खोच आहे


मी किती हुसकावले, दुर्लक्ष केले, टाळलेही
सारखा दारापुढे तो पारवा घुमतोच आहे


ताठ होते सर्व येताना मनाच्या मद्यशाळी
हाय आता मनसुबा प्रत्येक डळमळतोच आहे!


कोण अंधारास त्याच्याएवढे समजून घेतो?
दूर कोनाड्यात एकाकी दिवा जळतोच आहे!


संत थकले! नाहिसे अज्ञान त्याचे होत नाही...
पीठ तो भलत्या जनीसाठी किती दळतोच आहे!


कोरडे होतील डोळे - आसवे असतील जर ती
कोण डोळयातून संततधार ओघळतोच आहे?


या अटळ अपुरेपणाची फारशी मज खंत नाही!
दु:ख हे सलते उरी की - मी तरी उरलोच आहे...

गझल: 

प्रतिसाद

मतल्यानुसार रदीफ "तोच आहे" होतो आणि पुढचे बरेच शेर ही रदीफ पाळत नाहीत. पण, पुढच्या शेराने रदीफ "आहे", काफिया "च" आणि अलामत "ओ" निश्चित करून तीच पुढे पाळली आहे. असे चालते का हे कृपया जाणकारांनी सांगावे...
धन्यवाद.
पुलस्ति.
-- मतला आता बदलला आहे.

नेमकेपण येत आहे आपल्या नात्यात आता 
बोलतो केव्हातरी अन त्यातसुद्धा खोच आहे
वा!! क्या बात है....खूपच चांगला शेर आहे. 

मी किती हुसकावले, दुर्लक्ष केले, टाळलेही
सारखा दारापुढे तो पारवा घुमतोच आहे
वा!! ह्यातल्या वरच्या ओळीसारखी एक ओळ एका शेरात मला काही दिवसांपूर्वी सुचली आहे..

कोण अंधारास त्याच्याएवढे समजून घेतो?
दूर कोनाड्यात एकाकी दिवा जळतोच आहे!
वा!वा!



मतला बदलून असा केला आहे -
गंध इथले वेगळे पण श्वास माझा तोच आहे
बंध रेशम हे जरी मी त्यात गुदमरलोच आहे
सुचवण्यांबद्दल आभार!

नेमकेपण येत आहे आपल्या नात्यात आता 
बोलतो केव्हातरी अन त्यातसुद्धा खोच आहे
कोण अंधारास त्याच्याएवढे समजून घेतो?

दूर कोनाड्यात एकाकी दिवा जळतोच आहे!
 
हे शेर अप्रतिम आहेत..

नेमकेपण येत आहे आपल्या नात्यात आता 
बोलतो केव्हातरी अन त्यातसुद्धा खोच आह

आणि दिव्याचा शेर मस्त आहे!


आपली गझल अप्रतीम आहे. फक्त 'मद्यशाळी' हे रूप कितपत बरोबर आहे, अशी एक शंका आली.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
'मद्यशाळी' बद्दल तुमची शंका वाचली अन... विचार करतो आहे.

मतल्या नुसार रदिफ "तोच आहे" असे कसे म्हनता येइल?
रदिफ "आहे" हाच आहे, कफिया च आहे व अलमत ओ आहे. मल वातते हे बरोबर आहे.

नेमकेपण येत आहे आपल्या नात्यात आता 
बोलतो केव्हातरी अन त्यातसुद्धा खोच आहे
कलोअ चूभूद्याघ्या

उत्तम गझल!

बहुतेक सगळे शेर आवडले.

कवी-कवीनुसार शैलीमधे कितीतरी भिन्नता येते व त्यामुळे आणखीनच आस्वाद घेता येतो.

बंध हे रेशम जरी मी त्यात गुदमरलोच आहे

नेमकेपण येत आहे आपल्या नात्यात आता

या दोन ओळी तर फारच आवडल्या.

मस्त ! आधी वाचल्यासारखी वाटते आहे. पण आज मजा आली पुन्हा. :-)

खोच, मनसुबा आणि एकाकी दिवा हे शेर सुरेख आहेत.

नेमकेपण येत आहे आपल्या नात्यात आता
बोलतो केव्हातरी अन त्यातसुद्धा खोच आहे

वा!

नेमकेपण येत आहे आपल्या नात्यात आता
बोलतो केव्हातरी अन त्यातसुद्धा खोच आहे>>सही

मी किती हुसकावले, दुर्लक्ष केले, टाळलेही
सारखा दारापुढे तो पारवा घुमतोच आहे>>>हा पण आरपार

ताठ होते सर्व येताना मनाच्या मद्यशाळी
हाय आता मनसुबा प्रत्येक डळमळतोच आहे!>>ह्म्म

कोण अंधारास त्याच्याएवढे समजून घेतो?
दूर कोनाड्यात एकाकी दिवा जळतोच आहे!>>>मस्तच आलेच हे शेर.

मतल्याला धडपडले जराशी :(

नेमकेपण येत आहे आपल्या नात्यात आता
बोलतो केव्हातरी अन त्यातसुद्धा खोच आहे
निव्वळ अप्रतिम!
मतलाही छान आहे.
गझल चांगली आहे; आवडली.

सर्वच शेर एकाहून एक सुंदर.=सविनय.

२००९ च्या प्रतिसाददात्यांचे मनापासून धन्यवाद :)

कोण अंधारास त्याच्याएवढे समजून घेतो?
दूर कोनाड्यात एकाकी दिवा जळतोच आहे!

मस्तच!

ताठ होते सर्व येताना मनाच्या मद्यशाळी
हाय आता मनसुबा प्रत्येक डळमळतोच आहे!

हा शेरही अफलातून झालाय!