परिस्थितीच्या उन्हात...

परिस्थितीच्या उन्हात हे आयुष्य करपले माझे
कर्तव्याच्या जात्याने... जगणेच भरडले माझे

वयाअगोदर... चेहर्‍याचे वयमान.. वाढले आहे
शोधामध्ये कसल्याशा... बालपण हरवले माझे

"स्वत:स जप तू" असे आजवर कुणी बोलले नव्हते
तुझे 'शब्द' ऐकून... ह्रदय.. अश्रूत तरळले माझे

जिद्द अशी की... आकाशाला कवेत घेइन माझ्या
घाव सोसुनी... ध्येय असे मजबूत बनवले माझे

उलट्या-सुलट्या खूप कसरती आयुष्याने केल्या
कसरतीत त्या प्राक्तन आता अभेद्य बनले माझे

जन्माआधी... बहुदा.. माझी निवड चुकीची ठरली
उगाच माणुसपण निवडुन मी सौख्य गमवले माझे

- जनार्दन केशव म्हात्रे
२/ खलिफा निवास, गांधी नगर, जुना बेलापूर रोड,
कळवा-ठाणे ४००६०५.  भ्रमणध्वनी: ९३२३५५५६८८

गझल: 

प्रतिसाद

जन्माआधी... बहुदा.. माझी निवड चुकीची ठरली
उगाच माणुसपण निवडुन मी सौख्य गमवले माझे

फार आवडला....

"स्वत:स जप तू" असे आजवर कुणी बोलले नव्हते
तुझे 'शब्द' ऐकून... ह्रदय.. अश्रूत तरळले माझे
वा! छान ! डोळ्यांत अश्रू तरळतात तसे अश्रूंत हृदय तरळणे ही कल्पना कुशाग्र आहे.

"स्वत:स जप तू" असे आजवर कुणी बोलले नव्हते
तुझे 'शब्द' ऐकून... ह्रदय.. अश्रूत तरळले माझे

जन्माआधी... बहुदा.. माझी निवड चुकीची ठरली
उगाच माणुसपण निवडुन मी सौख्य गमवले माझे

वावावा! मस्त. हे विशेष आवडले. गझल छान आहे.

उलट्या-सुलट्या खूप कसरती आयुष्याने केल्या, कर्तव्याच्या जात्याने... जगणेच भरडले माझे हे मिसरेही फार आवडले. सहज, प्रवाही झाले आहेत. त्यामुळे चटकन् संवाद साधून जात आहेत.

बालपणाच्या शेरतील खालची ओळ नीटशी कळली नाही. विचार करतो आहे. छिद्रान्वेषीपणा नाही, पण 'गमवले' नाही म्हटले तरी (मला तरी) खटकलेच; त्याऐवजी 'हरवले' चालले असते.(एकदा वापरलेला काफिया परत एकदा वापरायची परवनगी गझलेच्या तंत्रात आहे, असे वाटते; चूभूद्याघ्या)

पुढील लेखनासाठी अनेकोत्तम शुभेच्छा.

- चक्रपाणि जीवन चिटणीस