शोधताना मी सुखाला...

शोधताना मी सुखाला हरवले आहे स्वत:ला
जिंकल्या डावात माझ्या गमवले आहे स्वत:ला


स्वप्नं त्या डोळ्यात मी ही हासण्याचे पाहिलेले
पण तिच्या अश्रूत आता भिजवले आहे स्वत:ला


डाव नियतीचाच होता, की मला हरवायचे... पण
मात केली मी तिच्यावर, घडवले आहे स्वत:ला


गंध श्वासांचा तुझ्या जो वाहतो प्राणात आहे
तू दिले मज श्वास अन मी जगवले आहे स्वत:ला


हे मला माहीत नाही, भेट व्हावी वा न व्हावी
आठवण तर सांगते की, भुलवले आहे स्वत:ला

जा नको येवूस माझे धरण अश्रूंचे पहाया
गोठते पाणी तसे मी बनवले आहे स्वत:ला


"तू कुडी सोडून जा रे" हे कसे सांगू तुला मी
मीच आत्म्याच्या समोरी नमवले आहे स्वत:ला


-महेंद्र राजगुडे

गझल: 

प्रतिसाद

गंध श्वासांचा तुझ्या जो वाहतो प्राणात आहे
तू दिले मज श्वास अन मी जगवले आहे स्वत:ला
जिवाचे श्वास मोहरले.............................

गझल आवडली!
शेवटचे २ शेर तर अप्रतिम आहेत!!
जा नको येवूस माझे धरण अश्रूंचे पहाया -- क्या बात है..

शोधताना मी सुखाला हरवले आहे स्वत:ला
जिंकल्या डावात माझ्या गमवले आहे स्वत:ला
ेवा! अश्रूंचे धरण .. गंध श्वासांचा.. हे शेरही विशेष. एकंदर गझल आवडली. पुढील गझलेसाठी शुभेच्छा!

जा नको येवूस माझे धरण अश्रूंचे पहाया
गोठते पाणी तसे मी बनवले आहे स्वत:ला
गोठते पाणी तसे मी बनवले आहे स्वत:ला
खूपच छान कल्पना आहे...
शब्द गोठले...

 
    राजगुडे!वा!छानच!
    अशाच उत्तम रचना येऊद्यात!