सूर माझे


सूर माझे उदास आताही
तू रहा आसपास आताही


दूर गेलीत पाखरे सारी
झाड शोधे कुणास आताही?


फूल सांगे विषण्ण वार्‍याला
"गोठला रे सुवास आताही"


शोध माझाच मी किती केला?
चालला तो तपास आताही


भूल पडली तुझी युगामागे
भूल आहे जिवास आताही


              --  दिलीप पांढरपट्टे

गझल: 

प्रतिसाद

मा.पांढरपट्टे,
चांगली गझल.

दूर गेलीत पाखरे सारी
झाड शोधे कुणास आताही?

ब-याच शेरांतून  दोन अर्थ प्रतीत होतात. हाही असाच एक.
एक अर्थ साधा. जो सगळ्यांना केवळ वाचून समजेल. प्रत्यक्षात झाड पाखरांना शोधताना कोणासही दिसणार नाही. पण पाखरं नसलेल्या झाडाला एकाकीपण जाणवत असेलच.
दुसरा अर्थ मानवी जीवनाकडे घेऊन जातो. मुलं दूरदेशी असलेल्या वृध्दांची अवस्था हा शेर सूचवून जातो.  
फूल सांगे विषण्ण वा-याला
"गोठला रे सुवास आताही..."


फूल नुसत्या वा-याला सांगत नाही. वारा विषण्ण आहे. एकीकडे सुवास गोठलेले फूल आहे तर दुसरीकडे विषण्ण वारा आहे. सांगणारा घटक ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत एेकणारा घटक असल्याने दोन्ही समान पातळीवर येऊन एक सुसंवाद तयार होतो.  

धन्यवाद, पांढरपट्टे साहेब.एक चांगली गझल दिल्याबद्दल. 

केदारशी पूर्ण सहमत. मलाही हे दोन शेर फार आवडले!
पुढील गझलेची वाट पाहतो...

पांढरपट्टे साहेब,
                 आपले ह्या संकेत-स्थळावर स्वागत असो.. आपली गझल भावली..संपुर्ण गझलेचा  एक उदास, हूरहूर लावणारा मूड आहे .....आपली गझल (चौकात काल येथे..) कल्याण येथील, कवियत्री नीरजा ह्यांच्या कार्यक्रमात ऐकली होती..ती सुद्धा आवडली होती..उत्तमोत्तम गझलांच्या प्रतीक्षेत..
                                           -मानस६

छोट्या बहरीतली गझल आवडली.
अजब

 आपले ह्या संकेत-स्थळावर स्वागत असो.. आपली गझल भावली..संपुर्ण गझलेचा  एक उदास, हूरहूर लावणारा मूड आहे .उत्तमोत्तम गझलांच्या प्रतीक्षेत..
या वाक्यांशी माझी पूर्ण सहमती.

एकंदर चांगली, सफाईदार गझल.
दूर गेलीत पाखरे सारी
झाड शोधे कुणास आताही?
वाव्वा! क्या बात है!

दिलीपजी,
दूर गेलीत पाखरे सारी
झाड शोधे कुणास आताही?

फूल सांगे विषण्ण वार्‍याला
"गोठला रे सुवास आताही"
आणि माझी साद...
बोल हे नेमकेच माझेही...
भावती  'त्या' मनास आताही...