बेसुरी सुरुवात...

बेसुरी सुरुवात झाली जीवनाची
फक्त आलापीच आहे.. वेदनांची


भैरवी आधीच... मैफल संपवावी
ही प्रथा नाहीच कुठल्या गायनाची


ताल हा... धरलाच आहे तू चुकीचा
सम तरी सांभाळ आता... वादनाची


सूर हे जुळतील आता सांग कुठुनी ?
तार ही तुटली तुझ्या-माझ्या मनाची


वेदनेचा... षडज-पंचम लागला हा
अन सुरावट छान जमली प्राक्तनाची


बासरी जमवायची ती... गोपगोपी
वाढली वर्दळ कशाने ? यातनांची


दाद अश्रुंनी दिली.. या मैफिलीला
शेवटी तू ओळ गावी... सांत्वनाची


ही गझल वाचून आता वाटते की;
गरज तर आहे मलाही चिंतनाची


- जनार्दन केशव म्हात्रे
२/ खलिफा निवास, गांधी नगर, जुना बेलापूर रोड,
कळवा-ठाणे ४००६०५.  भ्रमणध्वनी: ९३२३५५५६८८

गझल: 

प्रतिसाद

सांगितिक परिभाषांचा सुरेख प्रयोग....

भैरवी आधीच मैफल संपवावी
ही प्रथा नाहीच कुठल्या गायनाची

सूर हे जुळतील आता सांग कुठुनी
तार ही तुटली तुझ्या-माझ्या मनाची

वेदनेचा षडज, पंचम लागला हा
अन सुरावट छान जमली प्राक्तनाची 

हे शेर आवडले.

दाद अश्रुंनी दिली.. या मैफिलीला
शेवटी तू ओळ गावी... सांत्वनाची

छान आहे...

दाद अश्रुंनी दिली.. या मैफिलीला
शेवटी तू ओळ गावी... सांत्वनाची

ही गझल वाचून आता वाटते की;
गरज तर आहे मलाही चिंतनाची
-ह्या ओळी आवडल्या..
-मानस६

मानसशी सहमत. हे २ शेर मलाही आवडले!

वेदनेचा... षडज-पंचम लागला हा
अन सुरावट छान जमली प्राक्तनाची
बेसुरी सुरुवात असली तरी,  वेदनेचा षडज-पंचम लागल्यावर  सुरावट छान जमली आहे....
हा शेर आवडला...