गझल



बोल प्रेमाचे तुझ्या ओठात होते
कोण जाणे काय पण पोटात होते

माणसाला दंश करता सर्प मेला
जहर इतके मानवी रक्तात होते


रंगता मैफल मनी तव आठवांची
हुंदक्यांची भैरवी मी गात होते


जाळते आयुष्य पळ पळ काळजाला
राख स्वप्नांची उरी दिन-रात होते


साठते पाण्यात शेवाळे जसे, ते
साचलेपण आपल्या नात्यात होते


जीवनाच्या चक्रव्यूहा भेदती जे
अंश का असले अता गर्भात होते?

 

गझल: 

प्रतिसाद

साठते पाण्यात शेवाळे जसे, ते
साचलेपण आपल्या नात्यात होते
व्वा!

राख आणि शेवाळ हे शेर सुंदर!

समीर, पुलस्ती
खूप धन्यवाद

मिल्या, एकंदर गझल छान आहे. पण बांधणी अजून अधिक चांगली करता येईल, असे मला वाटते.  पहिल्या २ शेरात नेहमीचे विचार, कल्पना आहेत. मांडणीही सपाट आहे. ३ रा शेर ओघवता आणि चांगला आहे. ४ थ्या शेरातली कल्पना फार चांगली आहे. पण त्यात शक्य झाल्यास अजून सफाई यायला हवी.


चित्तंशी सहमत आहे.
- चक्रपाणि जीवन चिटणीस

जाळते आयुष्य पळ पळ काळजाला
राख स्वप्नांची उरी दिन-रात होते  ...      छान...
साठते पाण्यात शेवाळे जसे, ते
साचलेपण आपल्या नात्यात होते ...        वा...वा...
 
 


साचलेपण आपल्या नात्यात होते
चांगला मिसरा आहे.. (पहिली ओळ थोडी संकेतवजा असेल तर मजा येईल ...)
 
 

चित्त परत एकदा बहुमोल सुचना दिल्या बद्दल धन्यवाद...
चक्रपाणी, प्रदिप, अनंत खूप आभार