सोपे नसते
श्री. कुमार जावडेकर यांनी लिहिलेली 'सोपे नसते' हा रदीफ असलेली एक सुंदर गझल वाचण्यात आली होती. तोच रदीफ घेऊन मीही लिहिलेलं इथे देत आहे.
सोपे नसते
चांदण्यातला दाह सोसणे सोपे नसते
जळताना दरवळून जाणे सोपे नसते
सोपे नसते साध्याशा प्रश्नांचे उत्तर
मनातले नेमके सांगणे सोपे नसते
नकळत केव्हांतरी निसटतो एक उसासा,
मुकेपणाने वाट पाहणे सोपे नसते
लखलखणाऱ्या रत्नखचितशा आकाशातुन
ध्रुवतारा शोधून काढणे सोपे नसते
सभोवतीच्या झिंग आणणाऱ्या गलग्यातुन
गुंजन हृदयातले ऐकणे सोपे नसते
आठवणींचे उरात ओझे होते अवघड
आभासातुन संगत जपणे सोपे नसते
कधी हरवतो विणीतला नक्षीचा धागा
गुंत्यामधुनी मग उलगडणे सोपे नसते
'हे अवघड, ते अवघड' नुसते म्हणायचे, पण,
अवघड तेही टाकुन देणे सोपे नसते
-सतीश
गझल:
प्रतिसाद
समीर चव्हाण (not verified)
शनि, 17/11/2007 - 09:35
Permalink
व्वा
मनातले नेमके सांगणे सोपे नसते
तसेच
नकळत केव्हांतरी निसटतो एक उसासा,
मुकेपणाने वाट पाहणे सोपे नसते
'हे अवघड, ते अवघड' नुसते म्हणायचे, पण,
अवघड तेही टाकुन देणे सोपे नसते
बहोत बढिया...
जयन्ता५२
शनि, 17/11/2007 - 09:55
Permalink
वृत्त?
नकळत केव्हांतरी निसटतो एक उसासा,
मुकेपणाने वाट पाहणे सोपे नसते
'हे अवघड, ते अवघड' नुसते म्हणायचे, पण,
अवघड तेही टाकुन देणे सोपे नसते - हे शेर तर चांगले पण वृत्त्तात गडबड वाटते!खुलासा यावा.
जयन्ता५२
जयन्ता५२
सतीश
शनि, 17/11/2007 - 11:15
Permalink
वृत्ताबद्दल,
वृत्ताबद्दल - २४ मात्रांची प्रत्येक ओळ, ८ मात्रांचे ३ गट असं वृत्त आहे. आणि 'गा=ल+ल' असंही गृहित आहे.
"सभोवतीच्या झिंग आणणाऱ्या गलक्यामधुनी"ही ओळ "....गलग्यातुन"अशी मी लिहिली आहे. बहुधा पोस्ट करताना हा बदल झाला आहे. त्यामुळे ही ओळ २६ मात्रांची झाली आहे.
जाणकारांनी अवश्य मार्गदर्शन द्यावं. समीर, जयन्ता - अभिप्रायाबद्दल आभार.
-सतीश
समीर चव्हाण (not verified)
शनि, 17/11/2007 - 12:56
Permalink
बरोबर आहे
तुमचा बदल योग्य आहे.
तरीही सांगावेसे वाटते, मात्रा जुळल्या म्हणजे वृत्त जमले असे नाही...
विश्वस्त
रवि, 18/11/2007 - 13:21
Permalink
चूक कवीची नाही
चूक कवीची नाही. सतीश ह्यांनी ही गझल टाकली तेव्हा रोमन लिपीत दिसत होती. देवनागरी पुन्हा कविता टाकताना आमच्याकडूनच चूक झाली.
चक्रपाणि
सोम, 19/11/2007 - 10:53
Permalink
आभास, ध्रुवतारा
आभास, ध्रुवतारा विशेष आवडले.
- चक्रपाणि जीवन चिटणीस