आहे उसंत कोठे



आहे उसंत कोठे आता बसायला
आयुष्य लागले हे मजला पिसायला


मजला पराभवाची सुचताच कारणे
येते मलाच माझे थोडे हसायला


मी ही अजून थोडे बोलायला हवे
तू ही नकोस आता इतके रुसायला


वस्तीत आठवांच्या गर्दी अमाप ही
मज वाट सापडेना तेथे घुसायला


आला वसंत पुन्हा आली नवी फुले
इतके पुरे मनाला पुन्हा फसायला


आली कुठून स्वप्ने माझ्या मनात ही
घडले असे न काही स्वप्ने दिसायला


बाहूत वेदनेच्या होतो मजेत मी
आली सुखे तिथे ही मजला डसायला


मी वाट पाहिलेली होती चितेवरी
तेव्हा तरी हवी तू होती असायला


मी ही सुखात आहे आता तुझ्या विना
सुचले तुला परी ना डोळे पुसायला



गझल: 

प्रतिसाद

मजला पराभवाची सुचताच कारणे
येते मलाच माझे थोडे हसायला

मी ही अजून थोडे बोलायला हवे
तू ही नकोस आता इतके रुसायला.. वा वा!आला वसंत पुन्हा आली नवी फुले
इतके पुरे मनाला पुन्हा फसायला.. बढिया!
-मानस६

मी ही अजून थोडे बोलायला हवे
तू ही नकोस आता इतके रुसायला

बाहूत वेदनेच्या होतो मजेत मी
आली सुखे तिथे ही मजला डसायला
विश्वास,
आपले मनापासून स्वागत!
ही गझल मुळातच दर्जेदार आहे व विशेषतः  हे दोन शेर तर खास आहेत.
आपण 'प्यास कुछ और बढा दी झलक दिखलाके' अशी अवस्था करून टाकली आहे! तेंव्हा पुढील गझलेच्या प्रतिक्षेत..

शुभेच्छा!

जयन्ता५२

पूर्ण गझलच सुंदर आहे. काही काही शेर तर नितांत सुंदर आहेत.
मजला पराभवाची सुचताच कारणे
येते मलाच माझे थोडे हसायला
मी ही अजून थोडे बोलायला हवे
तू ही नकोस आता इतके रुसायला ..हे शेर नमूद करावेसे वाटतात.
आली कुठून स्वप्ने माझ्या मनात ही
घडले असे न काही स्वप्ने दिसायला.. मधली चमत्कृती फार वेधक आहे.
बाहूत वेदनेच्या होतो मजेत मी
आली सुखे तिथे ही मजला डसायला..हाही शेर मनाला हेलावून जातो.
आला वसंत पुन्हा आली नवी फुले
इतके पुरे मनाला पुन्हा फसायला ...या शेरात मात्र 'पुन्हा' चा उच्चार 'पुन्न्हा' असा करावा लागतो, तरच वृत्त जमते. माझ्यामते 'पुन्न्हा' हा उच्चार फक्त प्रादेशिक अपभ्रंश म्हणून स्वीकारला जावू शकतो. एका चांगल्या गझलेतील चांगल्या शेरासाठी समर्थने देत बसण्यापेक्षा आणि वाद घालत बसण्यापेक्षा, बदललेला बरा (असे मला वाटते. पटले नाही तर सोडून द्यावे).
अभिनंदन !!! अजून लिहित रहा.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

वा, विश्वासराव. गझल सुंदर आहे. सगळेच शेर आवडले. अगदी बोलके आहेत. त्यातही

मी ही अजून थोडे बोलायला हवे
तू ही नकोस आता इतके रुसायलाआली कुठून स्वप्ने माझ्या मनात ही
घडले असे न काही स्वप्ने दिसायला

हे शेर फारफार आवडले.

स्वप्ने, डोळे, वेदना - हे शेर आवडले. पण "येते मलाच माझे थोडे हसायला" - अगदी वेगळा, केवळ अप्रतिम शेर आहे!! अभिनंदन!!!

विश्वासराव्..अगदी फक्कड गझल निर्मिली आहे..!
नितांत सुंदर..! अशा भरपुर गझलांची आपणाकडुन वाट पहात आहोत.
 

विश्वास, तू गझलाही छान लिहितोस की...! पुढील शेर बेसुमार  आवडले...! गझललेखनाला शुभेच्छा !
मजला पराभवाची सुचताच कारणे
येते मलाच माझे थोडे हसायला
मी ही अजून थोडे बोलायला हवे
तू ही नकोस आता इतके रुसायला
आली कुठून स्वप्ने माझ्या मनात ही
घडले असे न काही स्वप्ने दिसायला
मी ही सुखात आहे आता तुझ्या विना
सुचले तुला परी ना डोळे पुसायला

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार..
विश्वास..

विश्वास,
गझल आवडली.
मजला पराभवाची सुचताच कारणे
येते मलाच माझे थोडे हसायला.... वा! हा शेर सर्वांत आवडला.
'डोळे पुसायला'ही.
- कुमार

म्हणतो.
- चक्रपाणि जीवन चिटणीस