भान माझे... (अजब)

हरवले आहे कधीचे भान माझे
चालले आहे तरी पण छान माझे!...


छे! कुठे चाहूल; तो तर भास असतो
ऐकण्या टवकारतो मी कान माझे...


राहती माझे रिकामे हात आता
परत पण मागू कुणाला दान माझे?...


चेहरा मी शक्य तितका बदलतो अन्
आरसा हसतो 'निरखुनी' ध्यान माझे!...


जिंकलो असतो लढाई पण अखेरी
'अजब' गळले का बरे अवसान माझे?...

गझल: 

प्रतिसाद

राहती माझे रिकामे हात आता
परत पण मागू कुणाला दान माझे?...
वाव्वा. मस्त. मतला आणि आरसाही छान!! भास आणि चाहूल ह्यो दोन्ही गोष्टी जवळजवळ आहेत. त्यामुळे तो शेर कळला नाही. गझल आवडली.

उत्तम गझल !
प्रांजळपणाने सांगावेसे वाटते,.. लय सुधारण्यास वाव आहे. भाव सुंदरच.

छे! कुठे चाहूल; तो तर भास असतो
ऐकण्या टवकारतो मी कान माझे...
हा शेर तर सुधारायलाच हवा - आशयासाठीही. मतला आणि मक्ताही छान !

 
 
 
( न आवडलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करावे. काय आवडले ते लक्षात ठेवावे.)
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

मतला आणि मक्ता खूप आवडले!

हरवले आहे कधीचे भान माझे
चालले आहे तरी पण छान माझे!...

छान...फारच छान

चाहूल 'खरी' असते (किंवा असू शकते) पण भास 'खोटे'च असतात असे मानून मी तो शेर लिहिला आहे... त्यातला अपेक्षित अर्थ स्पष्ट होत नसल्यास हा मिसरा असाही घेता येईल-
हाक आली की मला तो भास झाला
ऐकण्या टवकारले मी कान माझे...

... अजब