आत्मसात


'ना-ना' खुले म्हणालो, 'हो-हो' मनात केले
सारे तुझे बहाणे मी आत्मसात केले!


फसलो जगामुळे पण हसलो जगापुढे मी
का प्रेम ह्या जगावर मी तहहयात केले?


भीती जरा न उरली आता मला कुणाची
हेतू मनातले मी सर्वांस ज्ञात केले...


होतो पुढे निघालो घेऊन साथ ज्यांना
त्यांनीच नेमके का विश्वासघात केले?


देऊ कसा जगाला उपदेश एकतेचा
व्यवहार मी स्वतःचे पाहून जात केले


- कुमार जावडेकर

गझल: 

प्रतिसाद

कुमार, पहिले २ शेर आवडले. आणि शेवटचा तर - अर्थ, ओघ, प्रांजळपणा आणि खंत -- वा वा अप्रतिम आहे!!

'ना-ना' खुले म्हणालो, 'हो-हो' मनात केले
सारे तुझे बहाणे मी आत्मसात केले!

फसलो जगामुळे पण हसलो जगापुढे मी
का प्रेम ह्या जगावर मी तहहयात केले?

भीती जरा न उरली आता मला कुणाची
हेतू मनातले मी सर्वांस ज्ञात केले...  आवडले..सही
-मानस६

 
वा, कुमार, वा...
 
फारच छान गझल...एकेक शेर खणखणीत...
भीती जरा न उरली आता मला कुणाची
हेतू मनातले मी सर्वांस ज्ञात केले... (खूपच छान..)
देऊ कसा जगाला उपदेश एकतेचा
व्यवहार मी स्वतःचे पाहून जात केले (बुरखे फा़डणारा ...सर्वांचेच...! फारच छान)

प्रत्येक शेर सुंदर !