स्वीकारले

जीवनाला मी कुठे नाकारले ?
ते जसे आले तसे स्वीकारले

मैफलींवर जीव होता टाकला
एकटेपणही कुठे झिडकारले ?

स्वाभिमानी मी तयांना बोचलो
हाय ! सर्वांनी मला धिक्कारले

येत नव्हती कुंचल्याची मज कला
चित्र मी शब्दांतुनी साकारले

खीर जितक्या आवडीने चाटली
चाखले तितक्या चवीने कारले

कौल, माती, गवत-नाही घेतले
सदन स्वप्नांनीच मी शाकारले

एक हलकासाच होता स्पर्श तो..
...देहतंबोरे किती झंकारले !

गझल: 

प्रतिसाद

वाव्वा, केदार. सुंदर गझल. सगळेच शेर आवडले. पण,

जीवनाला मी कुठे नाकारले ?
ते जसे आले तसे स्वीकारले

मैफलींवर जीव होता टाकला
एकटेपणही कुठे झिडकारले ?                            खीर जितक्या आवडीने चाटली
                            चाखले तितक्या चवीने  कारले

    हे शेर कायम लक्षात राहतील असे आहेत. क्या बात है! सहज, सफाईदार, बोलते!!

जीवनाला मी कुठे नाकारले ?
ते जसे आले तसे स्वीकारले

खीर जितक्या आवडीने चाटली
चाखले तितक्या चवीने  कारले

वा पाटणकर साहेब. या दोन शेरांवर आपण् फिदा.

सुंदर गझल....
केदार,
असाच लिहीत राहा...लिहीत राहा....शुभेच्छा !

गझल आवडली. २ रा शेर खूपच छान आहे.

मतला आणि खीर विशेष आवडले!
-- पुलस्ति.

मैफलींवर जीव होता टाकला
एकटेपणही कुठे झिडकारले ?

सुंदर.

गझल आवडली.

मस्त गझल. सगळेच शेर आवडले.
- चक्रपाणि जीवन चिटणीस

वा केदार,
जीवनाला मी कुठे नाकारले ?
ते जसे आले तसे स्वीकारले
हा मतला फारच आवडला.
तसंच कारलंही!
- कुमार

चित्तरंजन  शी सहमत

खीर जितक्या आवडीने चाटली
चाखले तितक्या चवीने कारले...
...
चित्र मी शब्दांतुनी साकारले...
आवडली.....

जांभळ्या रंगातील शेर नवा ...

प्रगत बाण आहेत. गजगामिनी चालत जवी तसे झोक्यात जातात. तिच्या चालीकडे बघता बघता प्राण जावेत.

नवीन शेरही आवडला. बाकी हल्ली मला कारलेही आवडायला लागले आहे.
'राहिलो मी' मध्ये मी जो नकारात्मक मुद्दा मांडला होता('कडुनिंब'बद्दल), तो तुम्ही होकारात्मक चांगल्या पद्धतीने मांडला आहेत ('कारले'बद्दल).
अभिनंदन.

कौल, माती, गवत-नाही घेतले
सदन स्वप्नांनीच मी शाकारले

बाण, जोशी, समीर..
धन्यवाद. लोभ असू दे.

एक हलकासाच होता स्पर्श तो..
...देहतंबोरे किती झंकारले !

हा नवा शेर...

.केदार पाटणकर

वा वा! सुंदरच गझल!

देहतंबोरेपण छान आहे.

कारल्याचा शेर वेगळाच आहे.

आपल्या गझलांममधे मला एक वेगळेपण जाणवते, ते म्हणजे अगदी साध्या शब्दात छानपैकी अर्थ येतो अन कुठेही कसलीही कसरत जाणवत नाही.

अभिनंदन!

केदार,

चक्क साडेपंचवीस महिन्यांपुर्वीच्या गझलेच्या बहरेत नवीन शेर केलास?

काही विशेष कारण?

( एक मान्य केले पाहिजे, एखाद्या गझलेवर किती विचार करता येईल याचे हे उत्तम उदाहरण आहे खरे!)

भूषण,

स्वतःची रचना खूप दिवसांनी पाहिली जाते तेव्हा अजून काही तरी सुचते.झंकारले या काफियाने खूप दिवस मनासारखा शेर होत नव्हता. शेवटी समाधानाच्या जवळ जाईल, असा शेर झाला.

.केदार पाटणकर

सुरेख गझल!

एक हलकासाच होता स्पर्श तो..
...देहतंबोरे किती झंकारले !

अत्यंत अप्रतिम!