हे खरे ना?

स्वप्न होते आपलेही - हे खरे ना?
वाटले सारे खरेही - हे खरे ना?

तापल्या वाळूत माझी वाफ झाली
पण बरसलो मी तिथेही - हे खरे ना?

मी म्हणालो - जायचे आहे जरासे
बोलणे फिरले तुझेही - हे खरे ना?

वाळली आतून वेली स्पंदनांची
बेगडी आता फुलेही - हे खरे ना?

का हसावी ती अशी माझ्याप्रमाणे?
दु:ख नाही कोणतेही - हे खरे ना?

आंधळ्या नशिबात माझ्या - मोरपंखीं
व्यर्थ डोळे शोधणेही - हे  खरे ना?
गझल: 

प्रतिसाद

विसूनाना,
गझल (विशेषतः 'हे खरे ना' ही रदीफ) आवडली.
वाळली आतून वेली स्पंदनांची
बेगडी आता फुलेही - हे खरे ना? ..वा!

'का हसावी ती अशी माझ्या प्रमाणे
दु:ख नाही कोणतेही - हे खरे ना?
... सुंदर!
- कुमार

तापल्या वाळूत माझी वाफ झाली
पण बरसलो मी तिथेही - हे खरे ना?
वावा!

वाळली आतून वेली स्पंदनांची
बेगडी आता फुलेही - हे खरे ना?
वरची ओळ सुंदर. आता  अनावश्यक वाटते. शेर आवडला.

का हसावी ती अशी माझ्याप्रमाणे?
दु:ख नाही कोणतेही - हे खरे ना?
वा! खालची ओळही सहज आली आहे.

सरळ, साधी, सोपी.छान्.तरीही अर्थवाही..!आणि म्हणूनच छान.