बत्तीस तारखेला

बत्तीस तारखेला

भलत्याच ऐनवेळी, हटकून तोल गेला
नादान सद्गुणांनी अवसानघात केला

जागून रात्र सारी, उपयोग काय झाला?
सावज रणात येता, कुत्रा पळून गेला

सांगू नकोस भलते सलतेच तू बहाणे
उरलाय शब्द केवळ, का ओल आटलेला?

नेमून लक्ष्य केले साधेपणास माझ्या
झालीय तीच राणी, माझा गुलाम केला

समजायला हवे ते, समजून आज आले
काही इलाज नाही, पोटातल्या भुकेला

लोंढेच घोषणांचे दिल्लीवरून आले
येणार वित्त आहे, बत्तीस तारखेला

त्याचे रडून झाले, रडतोय मी अजूनी
हिसकून का बरे मग, माझा रुमाल नेला?

राज्यात भेकडांच्या, जनतेस अभय नाही
सोकावलाय मृत्यू तो रक्त चाखलेला

- गंगाधर मुटे
-----------------------------------

गझल: