विझले निखारे

का असे हे भेटती मज भेटणारे
षंढ निघती मर्द सारे भासणारे

काल ते ओकून ऐसी आग गेले
आज ते विझले निखारे पेटणारे

मी कसा विश्वास ठेवू या घडीचा
दूत शांतीचेच सूरा खुपसणारे

बोललो नाहीच मी ते काल ऐसे
बोलती आता असे ते बोलणारे

ते कसे भुंकून गेले आज येथे
हेच ते होते करूणा भाकणारे

सांग आता मी बहाणे काय देऊ
कावले ते संयमाने वागणारे

मी किती मोजू नगद पैसा जुगारी
हाय हे घोडे वरातित नाचणारे

दिवस ही गेलेच सारे फुकट आता
निसटले होते गळाला लागणारे

काल ते घडलेच काही वेगळेसे
नेमके उघडेच पडले झाकणारे

फोन..9821273412/E mail.sanhita44@gmail.com

गझल: