असे झाले तसे झाले....

असे झाले तसे झाले रडू आले हसे झाले
जसे झाले तसे झाले व्यथांचेही ठसे झाले

उन्हाचे शाप सोसूनी सुखाची सावली आली
तुला चोरून बघताना मनाचे कवडसे झाले

वजाबाकी जमेची हीच आयुष्यातली बाजू
सुखाची मर्तिके झाली दुखाचे बारसे झाले

जरा विश्वास ठेवा घात हा अपघात नसतो हो
अचानक होत जावा त्याचसाठी भरवसे झाले

कितीदा संशयाने तोडते काळीज तू माझे
उभे आयुष्य तुजसाठी बिलोरी आरसे झाले

मयुरेश साने... दि..२३ अप्रील ११

गझल: