आराम पहिल्या सारखा

इतिहास पुसला, पीत नाही जाम पहिल्या सारखा
कोठे मनाला वाटतो आराम पहिल्या सारखा ?

मी कास धरली सभ्यतेची काय झाला फायदा ?
लोकास वाटे आजही बदनाम पहिल्या सारखा

का स्वप्न गरिबांना दिसे श्रीमंत होण्याचे फुका ?
घामास कोठे आज मिळतो दाम पहिल्या सारखा ?

होण्यास मी मोठे जरासे मुखवट्यांना घातले
वस्तीत माझ्या आज नाही आम पहिल्या सारखा

मी झाकतो डोळे घरी देवास स्मरतो अंतरी
देवालयी दिसतो कुठे श्रीराम पहिल्या सारखा ?

होता सुगी शेतातली दुसरीकडे मी का उडू ?
केंव्हा तरी परतेल तो हंगाम पहिल्या सारखा

गोंगाट इतका जाहला वनवास आता भावतो
कोठे दिसेना कालचा विश्राम पहिल्या सारखा

शरपंजरी पडलास पण "निशिकांत" केला बेत का ?
छेडावयाचा आजही संग्राम पहिल्या सारखा

निशिकांत देशपांडे मो.नं. ९८९०७ ९९०२३
E Mail :- nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची अपेक्षा

गझल: