छायेलाही त्यांच्या थोडा

अपुल्यांपासुन दूर जरा मी फटकुन आहे
छायेलाही त्यांच्या थोडा बिचकुन आहे

विश्वासाचा घात कधी ना शत्रू करतो
अपुल्यांचा तो हक्क, तयांना दचकुन आहे

बोथट झालो शल्य मनाला बोचत नाही
हळव्या भावांना मी आलो झटकुन आहे

तरुणाईला दोष कशाला? मीच कदाचित
बुरसटल्या मुल्यातच बसलो अडकुन आहे

गजलेच्या क्षेत्रात कुणीही नेता नाही
हिरवी कुरणे दुसरी चरतो हुडकुन आहे

भ्रष्टाचार विरोधी बैठक उधळायाला
बरबटलेला मंत्री आला हटकुन आहे

लाचेवरती अंकुश आता एकच "अण्णा"
छोटीशी चिनगारी गेली भडकुन आहे

वृत्तातच का गजला लिहितो? आज उमगले
या क्षेत्रीच्या श्रेष्ठ जनांना वचकुन आहे

एकच मार्गी जीवन होते "निशिकांता"चे
वाटा दिसता लाखो, गेलो भटकुन आहे

निशिकांत देशपांडे मो.न. ९८९०७ ९९०२३
E Mail :- nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची अपेक्षा

गझल: 

प्रतिसाद

विश्वासाचा घात कधी ना शत्रू करतो
अपुल्यांचा तो हक्क, तयांना दचकुन आहे

या ओळीतील "हक्क" हा शब्द फार आवडला.