सोयरा
श्रावणाने आटलेला तो झरा माझाच होता
वादळांनी बांधलेला आसरा माझाच होता
कैक त्या पात्रात गेले, अन् सुखे परतून आले,
मी बुडाले एकटी, तो भोवरा माझाच होता
तो जरी चुकवून गेला ताल माझ्या बंदिशीचा,
मैफलीला जिंकणारा अंतरा माझाच होता
वाजले पाऊल माझे आणि त्या निश्चिंत झाल्या
काढला माझ्या व्यथांनी धोसरा माझाच होता!
खेचताना राहिल्या का घागरी खाली, तळाशी?
खोल बारव, काचणारा कासरा माझाच होता
हार त्याची, जीत माझी; ऐन वेळी घात झाला
हारला जो जिंकताना, मोहरा माझाच होता
भांडताना पाहिले मी काल माझ्याशीच ज्याला,
आरसा आता म्हणे, तो चेहरा माझाच होता!
तू म्हणे दारात त्याला ना दिला थारा कधीही,
मी कसे दु:खास टाळू? सोयरा माझाच होता!
गझल:
प्रतिसाद
गंगाधर मुटे
गुरु, 17/03/2011 - 23:32
Permalink
कैक त्या पात्रात गेले, अन्
जबरदस्त.
कैलास
शुक्र, 18/03/2011 - 10:13
Permalink
तू म्हणे दारात त्याला ना दिला
तू म्हणे दारात त्याला ना दिला थारा कधीही,
मी कसे दु:खास टाळू? सोयरा माझाच होता!
व्वा.. छान गझल.
अनिल रत्नाकर
शुक्र, 18/03/2011 - 16:02
Permalink
सुंदर गझल. धोसरा, कासरा ..
सुंदर गझल.
धोसरा, कासरा .. अप्रतिम.
खास सातारी बाज वाटला.
धन्यवाद.
मी अभिजीत
सोम, 21/03/2011 - 11:53
Permalink
शेवटचा शेर वाचून मला माझ्या
शेवटचा शेर वाचून मला माझ्या गझलेचा एक शेर आठवला
दु:खास ठेवलेले मी आसर्यास माझ्या
नाही कसे म्हणावे या सोयर्यास माझ्या
कैक त्या पात्रात गेले, अन् सुखे परतून आले,
मी बुडाले एकटी, तो भोवरा माझाच होता
आवडला. छान गझल क्रांतीताई..!
काव्यरसिक
शनि, 26/03/2011 - 10:20
Permalink
सारेच शेर आवडले. सम्पूर्ण
सारेच शेर आवडले.
सम्पूर्ण गझलच अप्रतिम झाली आहे.
----------------------------------------------------नचिकेत भिंगार्डे
क्रान्ति
रवि, 27/03/2011 - 11:10
Permalink
धन्यवाद मित्रांनो! अभिजीत,
धन्यवाद मित्रांनो!
अभिजीत, खासच आहे तुझा सोयर्याचा शेर!
supriya.jadhav7
रवि, 27/03/2011 - 18:48
Permalink
सम्पूर्ण गझलच अप्रतिम झाली
सम्पूर्ण गझलच अप्रतिम झाली आहे.
अप्रतिम !!!