अर्थ मौनाचे...

अर्थ मौनाचे...

लोक सारे व्यर्थ जेव्हा, बडबडाया लागले...
अर्थ मौनाचे तुझ्या, मज आकळाया लागले...

तू अशी जादूगरी, केली सखे माझ्यावरी...
सावली अन् देह आता, एक व्हाया लागले...

पौर्णिमेच्या चांदण्याने घाव केले पाशवी...
गूढ भय, अवसेतले, मज आवडाया लागले...

नम्रभावाने जयांची, लाच मी अव्हेरली...
ते मनापासून मजला, घाबराया लागले...

ऐनवेळी घात केला, आप्त गेले सोडुनी...
हाय अन् छातीमधे, भलते दुखाया लागले...

- निरज कुलकर्णी

गझल: 

प्रतिसाद

वा! जादूगरी आणि पौर्णिमा खूपच खास!

वा! नीरज, सुंदर गजल आहे.
'मौन' (मतला) आणि 'अवस' हे विशेष आवडले.

फारच छान !
वाचताना रोमांचित झालो!!!!!!

रामकुमार

पौर्णिमेच्या चांदण्याने घाव केले पाशवी...
गूढ भय, अवसेतले, मज आवडाया लागले... निरजजी, हासिले गझल शेर ...

पौर्णिमेच्या चांदण्याने घाव केले पाशवी...
गूढ भय, अवसेतले, मज आवडाया लागले

मस्त शेर.