संकटे
'संकटे'
तू मला पाहू नको झुरतात आता संकटे.
वाट माझी अडवुनी बसतात आता संकटे.
संकटांना नाव नाही, गावचा पत्ता नसे;
वारसा शोधावया फिरतात आता संकटे.
दार केले बंद मी , पर्याय त्यांनी काढला;
कवड्सा कवटाळुनी शिरतात आता संकटे.
बाजरी , ज्वारी ,गहू आहेत हंगामी पिके;
बारमाही पण इथे पिकतात आता संकटे.
मानतो थोतांड मी पचांग सारे अन तिथ्या;
काळरेषेची दिशा रचतात आता संकटे.
हे खरे 'वीरेंद्र' पण तू ध्येयही सोडू नको;
झुंजण्याला जिद्दही भरतात आता संकटे.
-वीरेंद्र बेड्से