जागलेली रात...

आसवांचे सूर ओल्या पापण्या गातात आता
माझिया डोळ्यात आहे जागलेली रात आता

चांदणे आलेच नाही अंगणी माझ्या कधीही
अंगणाशी बोलतो मी चांदण्या शब्दात आता

कोणता कंदील लावू जिंकण्या काळोख येथे ?
काजळी होते दिव्याची पेटणारी वात आता

मोगरा नाही तुझा मी तू मला माळू नको ना
वादळे का मागशी तू मोकळ्या केसात आता ?

सोसतो मी वार सारे आपुलाले - वेगळाले
वेदनेला भाव आहे कोणत्या घावात आता ?

मयुरेश साने...दि...१३-जानेवारी-११

गझल: 

प्रतिसाद

मोगरा नाही तुझा मी तू मला माळू नको ना
वादळे का माळशी तू मोकळ्या केसात आता ?
असं केलं तर? की नकोच? :)

खुप छान सुधारणा सुचवली तुम्ही.....अभारी आहे.