मराठी गझल धोक्याच्या वळणावर

मराठी कवितेच्या विश्वात गझलची वाटचाल सुरू झाली आहे. या वाटचालीत पंचवीसेक वर्षांचा काळ लोटला आहे. सुरेश भटांची गझल हा या वाटचालीचा अत्यंत ठळक आणि अस्सल प्रस्थानबिंदू आहे. सुरेश भटांनी स्वतःच्या बळावर, मराठी गझलची ध्वजा उत्तुंग फडकविली. सौंदर्य, सामर्थ्य आणि अस्सलेतेने श्रीमंत असलेली एकमेव गझल ही फक्त सुरेश भटांचीच. टोकाची मिजास, विलक्षण लालित्य आणि तीव्र भाव प्रत्यय अशी गुणसंपन्न असलेली उर्दूतली गझल मराठी भाषेतही तितकीच गुणसंपन्न साकारू शकते हे सुरेश भटांनी दाखवून दिलं. त्यांच्या आणि मराठी भाषेतल्या गझलांचे सामर्थ्य कळण्यासाठी  भटांची --
फुलावया लागलीस तेव्हा मला कुठे देहभान होते
वसंत आला निघून गेला, मला कुठे वर्तमान होते
ही गझल व त्यातले शेर पुरेसे आहेत. त्यांच्या रंग माझा वेगळा, एल्गार, झंझावात आणि सप्तरंग या संग्रहातल्या गझला या मराठी भाषेतल्या समर्थ गझलांची समर्थ उदाहरणं आहेत. या गझलांकडे पाहिल्यावर मराठी कवितेच्या विश्वात गझल आपला जबरदस्त प्रभाव टाकणार असं वाटायला लागलं होतं. तसा तो पडलाही पण फक्त सुरेश भटांच्या गझलांचा, गझल या काव्यप्रकाराचा नाही. हे विलक्षण काव्यशिल्प आज दिवसेंदिवस अधिकाधिक भ्रष्ट होत चाललय. त्याच्या रूपाचे भान व जाणीव नष्ट होते आहे, त्याचे विकृत बुजगावणे अस्सल म्हणून मिरवले जात आहे. या परिस्थितीला छेद देणारी शक्यता आता धूसरच वाटतेय. हे वातावरण गझलच्या विकासाला पोषक नाही. म्हणून या वळणावर मराठी गझलच्या स्थितिगताचा गंभीरपणे विचार व्हायला हवा.

सादृश्यता व कृतकता
सुरेश भटांच्या उत्तेजनांमुळे आणि त्यांच्या गझलांनी प्रभावित होऊन गावोगावीचे असंख्य गझलेच्छू गझललेखनाकडे वळले. मतला, वृत्त, काफिया, रदीफ, शेर या गझलच्या काव्यांगांचा आपल्या मगदुराप्रमाणे अर्थ लावून हे गझलेच्छू भसाभसा गझल लिहायला लागले. स्थिती अशी होती की जे ते लिहीत होते त्याला ते गझलच समजत होते आणि म्हणून ऐकणारे , वाचणारे, आणि छापणारेही त्या कवनांना गझलच समजत होते. अशा या रचना गझलच्या अस्सलतेपासून शेकडो योजने दूर होत्या. लिहिणाऱ्यांनी कधी गझलच्या काव्यशिल्पाचा अभ्यास केला नाही, तिचा स्थल स्थलकाल सापेक्ष विचार केला नाही, आपल्या लेखनाचा कस तपासला नाही, आपला मगदूर जोखला नाही, आपल्या उणिवांची कधी त्यांना जाणीव झाली नाही आणि जाणीव झाली तरी आपले अज्ञान हीच आपली काव्यप्रतिभा समजून, साक्षरतेमुळे ते जे काही लिहीत होते त्याला गझल मानून टुकार, फडतूस प्रसिद्धीसाठी कायम हपापत राहिले. या कवनांना गझल म्हणून प्रसिद्धी मिळायला लागली, त्यांचे स्तंभ सुरू झाले, वाचनाचे, गायनाचे कार्यक्रम सुरू झाले. संग्रह प्रसिद्ध व्हायला लागले, त्या संग्रहांना नामवंतांच्या प्रस्तावना मिळायला लागल्या, प्रशस्तिपत्रकं मिळायला लागली, पुरस्कार मिळायला लागले, विशेषांक निघायला लागले, बघता बघता धड महाराष्ट्राच्या भूमीतही ओळख न मिळवू शकलेल्या मराठी गझलेची अखिल भारतीय संमेलनं भरायला लागली. या सर्व उपक्रमांत, कार्यक्रमांत, घडामोडींमध्ये सगळ काही घडतं, फक्त घडत नाही ती मराठी गझल. ती घडवण्यासाठी निघालेल्या स्वयंघोषित अध्वर्यूंना, गझलेच्छूंना मात्र ती आपल्याकडूनच बिघडतेय याची आज जाण नाही आणि जाण असली तरी त्याची अजिबात चाड नाही. गझलच्या नावाने केल्या जाणाऱ्या या सर्व उपक्रमांतून जी गझल वाचकांसमोर, रसिकांसमोर येतेय ती दिसतेय, वाटतेय गझलसारखी पण म्हणून ती गझल नाही. तिच्याकडे गझलत्वाचे शील नाही आणि कवितेचं मोलही नाही. साक्षर माणसाने लिहिलेल्या पद्य ओळी यापेक्षा त्यांचा वेगळा दर्जा असू शकत नाही. सादृश्यता आणि कृतकता हे दोन दुर्गुण मराठी गझलेला पथभ्रष्ट करून अंतिमतः तिला संपवून टाकायला पुरेसे आहेत. आज हेच दुर्गुण मराठी गझलच्या गळ्यात खरे गुण म्हणून बांधले जातायत आणि हे काम आज गझल सागरसारखी संस्था व तिचे चालक फार उत्साहाने करताहेत.

गझल हे एक विलक्षण काव्यशिल्प आहे. भाव, रस, विचार, या जाणिवांची हृदयस्पर्शी अनुभूती देणारं काव्यशिल्प आहे. या काव्यशिल्पाचा स्वतःचा असा एक खास आकृतिबंध आहे.या गझलच्या शिल्पातला एक घटक अत्यंत महत्त्वाचा आहे, तो घटक म्हणजे गझलेतील दोन-दोन समवृत्त चरणांची द्विपद, जिला शेर असं म्हणतात. शेर हा दोन चरणांचा, द्विपदीच्या रूपातच असतो पण कुठलीही द्विपदी शेर असतेच असं नाही. शेर स्वयंभू असतो, स्वतंत्र असतो. स्वतःचं अस्तित्व तो स्वबळावर सिद्ध करतो आणि त्याच्या अस्तित्वावरच गझलचं अस्तित्व अवलंबून असतं. पण शेर गझलच्या आधाराचा मोताद नाही, नसतो. शेर हाच गझलचा गाभा आहे, शेर हाच गझलचा आत्मा आहे आणि शेर हाच गझलचा जीव आहे. गझलेचा विचार करायचा म्हणजे शेराचा विचार करायचा, गझला लिहायच्या म्हणजे आधी शेर आपल्याशी, आपल्या मनात 'उद्गारायचा.' अशा समान शेरांच्या रचनेतून जी संरचना घडते ती गझल. गझल लिहिणं म्हणजे बाराखडी लिहिल्यासारखी एकामागून एक अशा अनुक्रमानुसार पद्य ओळी लिहिणं नव्हे. म्हणजे बाजार हा शब्द आला की अंधार, अंधाराच्या मागोमाग आकार, मग पुढे माघार अशा काही शब्दांनी फिट केलेल्या ओळींची पदावली रचणे म्हणजे गझल नव्हे. शेर हा स्वतंत्र असतो, स्वयंभू असतो हे विधान कोणाच्या तरी तोंडावर फेकण्यापुरतं किंवा बोलण्यापुरतं असता कामा नये. तो तसा घडवता यायला हवा. तो तसाच स्वतंत्र चिंतन-मननातून निर्माण व्हायला हवा. शेराच्या व्याकरण तंत्राची परिपूर्ती करणं हे फारच प्राथमिक काम आहे. खरं काम आहे ते अवघ्या दोन चरणाच्या अवकाशात हृदयस्पर्शी व विचारशील संवेदनाचा अनुभव घडवणारं काव्यशिल्प उभं करणं, असा भाव, रस किंवा प्रत्यय, समृद्ध काव्यानुभव द्विपदी देत नसेल तर तो शेर नव्हे आणि असा शेर नसेल ती गझल नव्हे. नेमका हाच मुद्दा मराठीतले आजचे तमात उत्साही गझलेच्छू लक्षात घेत नाहीत. लक्षात आलं की झटपट नाव, प्रसिद्धी, यश मिळविण्याच्या हव्यासापोटी अभ्यास, चिंतन-मनन, परिश्रम याची त्यांना गरज वाटत नाही. गझलच्या तंत्राची किंवा नियमांची पूर्तता केली म्हणजे गझल झाली, इतक्या तोकड्या विचाराच्या आधारावर हे गझलेच्छू पांढऱ्यावर काळं करत असतात. गझलच्या अनभिज्ञतमुळे अशा गझलेच्छूंना वा! वा! म्हणणारेही भरपूर मिळतात. ते एकदा मिळायला लागले की लागे-बांधे, ओळखीपाळखीच्या आधारावर एकट्याने किंवा संघटितपणे मराठी गझलचा काहीतरी जलसा करता येतो. तो एकदा केला की प्रसिद्धी मिळविण्याची एक फट सापडते. अशा फटीचा दिंडी-दरवाज्यात रूपांतर करण्यासाठी  आपला खटाटोप सातत्याने चालू ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. या गोंधळात गझलविषयी स्वतःची दिशाभूल  झालेला (आणि स्वेच्छेने स्वतःची दिशाभूल करून घेणारा) कमअस्सल मगदुराचा गझलेच्छू, निष्पाप रसिकांची, वाचकांचीही फसवणूक करतो.
याची जबाबदारी कोणी घ्यायची?

चंद्रशेखर सानेकर
(क्रमश:)
[वरील लेखात मांडलेल्या मतांशी हे संकेतस्थळ सहमत असेलच असे नाही. विश्वस्त]

प्रतिसाद

खुद्द भट लिहीत होते तेंव्हा भटांची गझल त्यावेळच्या तथाकथीत समिक्षकांच्या पचनी पडली नाही. कालांतराने तीच गझल कालातीत असल्याचे मान्य झाले.भटांच्या गझलेनंतर अस्सल गझल मराठी भाषेत कोणी लिहिली नाही अशी खंत / टीका होते आहे. हे कदाचित १९९०-९५ पर्यंत ठीक होते.
गेल्या काही वर्षात सामाजिक आणि मानसिक परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. समाजाने दडपलेला 'मी' चा आक्रोश आज उरलेला नाही. सारीच संवेदनशील, अंतर्गामी  मने बधीर होऊन मूक झाली आहेत आणि उपलब्ध असलेल्या फटींमधून बाह्यगामी, बेगडी मने  जगासमोर आक्रोशाचा देखावा करीत आहेत असे काहीसे विचित्र चित्र आहे.कदाचित आता स्वतःचा बेगडीपणा हीच एकमेव जाणीव अस्सल उरली आहे हा विरोधाभास अभिजात काव्यासमोर आ वासून उभा आहे.
 आजच्या या  नव्या सामाजिक विचार आणि आचार पद्धतीवर आधारित अस्सल गझल कशी असली पाहिजे हे कुणीच दाखवून देत नाही. प्रस्तुत लेखकाने ज्या भटांच्या गझलेचे उदाहरण सच्ची गझल म्हणून दिले आहे ते आजच्या परिस्थितीत आणि आजच्या गझलकाराची मानसिक बैठक जमेस धरून संयुक्तिक ठरेल का? अशी शंका येते.
भावनांचे- (मग ते कारुण्य असो, दु:ख असो, प्रेम असो, वैषम्य असो - किंवा आणखी काही )- मापदंड बदलत चालले आहेत नव्हे पार बदलले आहेत.
(अवांतर -
गालिबा प्रेमात आता निकम्मा कुणि होत नाही
हजाराखाली माझी प्रिया प्रेझेंटही घेत नाही)
 टी.व्ही. सारख्या अत्यंत प्रभावी प्रसार माध्यमाने केलेले सर्वव्यापी आक्रमण हेही त्यामागचे कारण आहे.समाजमनात काव्यासारख्या अत्यंत तरल आणि संवेदनशील साहित्याला कितपत स्थान उरले आहे? कदाचित आजचा समाज यापुढे जागतिक संगीतावर (सालसा, वाल्ट्झ, पॉप) बसवल्या गेलेल्या रचनांनाच खरे काव्य समजू लागेल अशी रास्त भीती वाटते.
या भयावह परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी  'आज' सच्चे, मनाला भिडणारे कसे लिहावे याचा आदर्श वस्तुपाठ मान्यवरांनी घालून ध्यावा असे मनापासून वाटते. नाहीतर तेच जुनाट, सदृश, टुकार, कृतक, उधार लेखन होत राहील. कारण उघड आहे. खोटे का असेना, जे नाणे चालते तेच पाडले जाणार! त्यासाठी  समाजाचे आणि काव्याचे चलन बदलावे लागेल.ते कसे? हाच खरा प्रश्न आहे.

सानेकरांच्या अनेक मतांशी मी सहमत आहे  !

आज सानेकरांना अभिप्रेत असलेली 'अस्सल' गझल लिहली जात नाही हे मान्य केले तरी  एखादी गझल बरी किंवा उत्तम्,कमअस्सल आहे कि अस्सल हे ठरविण्यासाठी  'ISI' सारखी गुणवत्ता प्रमाणित करणारी व्यवस्था (वा 'मान्यवराचे मंडळ') असणे आवश्यक आहे व ती कशी निर्माण होणार? इतर सर्व क्षेत्राप्रमाणे इथेही  २० % अस्सल गुणवत्ता व ८०% सर्वसामान्य कुवतीचे अशी विभागणी असली तरी ८० % तील काही % मेहनतीने, सातत्याने लिहून २०%ची  टक्केवारी वाढवत जातील अशी प्रार्थना करू या!
जयन्ता५२

लेख विचार करण्यासार्खा आहे. पण सानेकरांनि गझल चळवळीसाठी काय केले? त्यांनी ठोस उपाय सुचवायला हवे आहेत. चळवळीत काहि त्रुटी नक्कीच आहेत. पण पांचाळे स्वत:ला प्रमोट करित का होई ना चळवळ तर पुढे नेत आहेत.

१. सानेकरांच्या तळमळीबाबत त्यांचे अभिनंदन!
२. विसूनानांनी 'एखादी गोष्ट कालबाह्य होणे' हा मुद्दा मांडला तो पटला.
३. जयन्ता ५२ यांनी एका महत्वाच्या मुद्याला अत्यंत वरवरच्या पद्धतीने हात घातला आहे असे वाटते.
४. मेश्राम यांच्या 'सानेकरांनी काय केले' या विधानाव्यतिरिक्तच्या मताशी पूर्णतः सहमत! सानेकरांनी 'काय व्हायला हवे आहे' हे तरी मांडलेच आहे की? त्यांचा तेवढा अधिकारही आहे. मात्र, ठोस उपाय सुचवायला हवेत हे पूर्ण मान्य!

मते:

१. इतरांची गझल कशी आहे व कशी असायला हवी याचे नुसते वर्णन आहे, उदाहरणे द्यायला हवीत असे वाटले.
२. जर, गझलतंत्र पाळणार्‍या 'मतला' धरून एकंदर पाच स्वतंत्र कवितांची मालिका म्हणजे 'गझल' अशी व्याख्या खुद्द भटांनीच केलेली आहे तर, 'तंत्र पाळून केलेल्या पाच शेरांना - ज्यात एक मतला आहे-' गझल म्हणायचे की नाही' यावर सानेकरांनी मतप्रदर्शन करण्यात काय उरते? ( तंत्रच पाळले नसेल तर रचना जरूर खारिज करावी.) पण, तंत्र पाळले असेल तर बाराखडीतील 'फक्त व्याख्येप्रमाणे' ती निश्चीतच गझल होईल. बाराखडीतील 'प्रस्तावना, शेवटी महत्वाचे' व काही मुलाखती, यासारख्या ठिकाणी गझलेबाबत भटसाहेबांनी जे मार्गदर्शन केले आहे ते गृहीत धरले तर सानेकरांना जाणवलेल्याच काय, मराठीतील जवळजवळ ७५% गझला या गझलाच नाहीत असे म्हणावे लागेल.

जसे:
अ - एकही अक्षर / शब्द भरीचे/चा नसावे/वा. ( गोटीबंदता )
ब - तंत्र जमले की गझल जमली असे नाही.
क - शब्दांचा थयथयाट, नक्षी यातून काहीही सिद्ध होत नाही.
ड - अगदी आतून वाटल्याशिवाय शेर रचलाच जाऊ नये.

माझे मत असे आहे, की एकंदर 'मराठी गझल' या विषयावर असे नकारात्मक मतप्रदर्शन करणे, याहून याच साइटवरील जमतील तेव्हढ्या गझलांना प्रतिसादामार्फत मार्गदर्शन करणे, आपल्याही गझला प्रकाशित करत राहणे, त्यावरही चर्चा घडवून आणणे हे उपाय जास्त सक्रीय असावेत. कारण मुळातच इथे जवळपास १५० व्हिझिटर्स तरी आहेतच. त्यांच्यातील १०० तरी ते मार्गदर्शन, चर्चा गंभीरपणे घेतील. ५० तरी गझलकार अ‍ॅक्चुअली सुधारतील. लेख वाचून फक्त मतप्रदर्शन होईल असे वाटते.

माझ्यामते, या स्थळावर सानेकरांचा, तत्समांचा, सक्रीय वावर आवश्यक आहे.

अन्यथा, सदर लेख म्हणजे एक कळकळ आहे हे जाणवून देण्याचा अटेंप्ट वाटेल. निदान मला तरी तसे वाटले.

धन्यवाद!