सोकावलेल्या अंधाराला इशारा
सोकावलेल्या अंधाराला इशारा
सोकावलेल्या अंधाराला, इशारा आज कळला पाहिजे
वादळ येऊ दे कितीही पण, हा दीप आज जळला पाहिजे
आंब्याला मानायचे कांदा, किती काळ असेच चालायचे?
डोळे उघडून तू वाग जरा, नकोसा वाद टळला पाहिजे
गाय इकडे आणि कास तिकडे, चारा मी घालायचा कुठवर?
कधीतरी इकडे; या बाजूस, दुधाचा थेंब वळला पाहिजे
प्रवेशदाराचा ताबा घेत, का उभा ठाकला आहेस तू?
माझा प्रवेश नाकारणारा, इरादा तुझा ढळला पाहिजे
आता थोडे बोलू दे मला, ऐकणे तुही शिकायला हवे
हे आवश्यक नाही की तूच, दरवेळेस बरळला पाहिजे
निर्भीडतेने 'अभय' असा तू, यज्ञकार्य असेच चालू ठेव
ग्रहणापायी झाकोळलेला, चंद्र आता उजळला पाहिजे
.
.
गंगाधर मुटे
..................................................................
शिकायला हवे(स), बरळला पाहिजे(स)
येथे व्याकरण सुट घेतलीय.