मला माणसांत रस आहे

नंदा सुर्वे ह्यांनी 'साप्ताहिक सकाळ'मधील 'गप्पाटप्पा' ह्या सदरासाठी घेतलेल्या मुलाखतीचा संपादित अंश सादर आहे.
..........


मराठीत गझल हा काव्यप्रकार तुम्ही रूढ केलाय. हा काव्यप्रकार मराठीत कसा आणलात? तसा आणण्याची गरज होती काय?
गझलेमध्ये एक सामान्य यमक असते. एकच वृत्त असते. त्यातला एक एक शेर बाजूला उचलला तरी त्यात संपूर्ण भावना येते. मनात येणारा विचार, संवेदना, प्रत्यय, त्यातून आपोआप येतो.

उर्दू गझलांचा अभ्यास करावा लागला असेल ना?
माझे बरेचसे हिदी भाषक मित्र होते. त्यांच्या घरी माझा वावर असे. त्यामुळे त्या भाषेचे संस्कार आपोआप घडत गेले. अगदी स्वयंपाकघरापर्यंतची भाषा माझ्या जवळ आली.

म्हणून उर्दू काव्याच्याही जवळ गेलात का?
त्याच्या जवळ म्हणजे मी त्यातल आनंद घेतला. मुद्दाम अभ्यास करत बसलो नाही. माझ्या घरातला माहौलही (वातावरण) तसाच होता. वडील जन्मले जबलपूरला, त्यामुळे त्यांचा संपर्क अमराठी लोकांशीच. माझी आई मात्र कोकणातली. त्यामुळे मी मराठी गझला करायला लागलो.

हा फायदा झाला तर?
तसे म्हणा, तुम्हाला काय म्हणायचे ते बेलाशक म्हणा. मी आधी फक्त कविता करीत असे. एकदा एका मित्राने माझी एक कविता ऐकली अन् तो म्हणाला, 'अरे ही तर गझल आहे!' ती गझल अगदी सहजपणे आलेली होती. मुद्दाम अभ्यास न करता. मी आधी हिंदी कविताही करत असे.

गझलेने मराठी काव्यसौंदर्यात भर पडली असे वाटते का?
निश्चितपणे; पण खरे तर हे रसिकांनी ठरवायचे. गझलेचे मराठीपण आम्ही सांभाळले की नाही, हे मराठी माणसानेच सांगावे.

खरे तर मराठी काव्यविश्व समृद्ध असताना हा प्रकार आणण्याचा हेतू काय?
प्रेम बसले त्यावर. हेतू कसला आलाय त्यात? हेतूबद्दलच बोलायचे तर मग मी मराठीतच कशाला हे करायला आलो असतो?

गझलगायनासाठी संगीताचा अभ्यासही करावा लागला असेल ना?
करावा लागतोच. कारण गझलगायन हे उपशास्त्रीय गाणे आहे. याखेरीज शब्दांची समजूत हवी.

तुमच्या स्टाइलने मराठी गझला लिहिणारे बरेच आहेत, ते कितपत तयारीचे आहेत?
फार कोणी तयारीचे वाटत नाहीत. अकोला जिल्ह्यातला राजू जाधव आणि नागपूरचा मोहन शिंदे एवढेच तयारीचे वाटतात.

तुमचा शिष्यवर्ग तयार झाला असेल ना?
कोणी शिष्य वगैरे नाही. मी तसले काही मानत नाही. त्या हेतूने कोणी आले तर मी त्यांना सरळ हाकलून लावतो.

आणि तेच तुम्हाला गुरू मानत असतील तर?
काही मानायला नकोय. मानत असतील तर सगळे खोटे आहे. त्यांच्या सुखासाठी ते मानतात हो. ते गैरफायदा घेतात. तो मला आवडत नाही.

गझलकारांना काय संदेश द्यावासा वाटतो?
चालण्याची नको एवढी कौतुके
थांबणे ही अघोरी कला यार हो

तुम्हाला कशाकशात रस आहे?
मला माणसांत रस आहे. गप्पा मारण्यात रस आहे. कॉमिक्स आवडतात. चांगले खाण्यातही खूप रस आहे.

मराठी ही तुमची अस्मिता का? कारण उर्दू गझल हा प्रकार मराठीत आणलात?
असले मोठेमोठे शब्द मी वापरत नाही, म्हणून मी कवी आहे. मला जे वाटते, आवडते ते मी करतो.

तुम्ही रुबायासुद्धा करता त्याविषयी काही सांगता का?
कोणत्याही चार ओळींना रुबाई म्हणतात, हे अगदी चूक आहे. रुबाईला वजन असते. रुबाई म्हणजे आवडणारी लाडकी. अद्याप मराठीत रुबाई लिहिली गेली नाही. मी हिंदी, उर्दूत रुबाया लिहिल्या आहेत.

मराठीत रुबाया लिहिल्या जात नाहीत असे तुम्ही निश्चितपणे म्हणू शकता?
अगदी निश्चितपणे मराठीतल्या कोणत्याही अभ्यासकाला, एखाद्या विभाग प्रमुखालाही विचारून पाहा.

रुबाईचे गजलेशी काही नाते आहे का?
रुबाईच्या वजनात गझल लिहिता येते. एखादी गझल सादर करण्यापूर्वी एखादी रुबाई सादर केली जाते.

(साप्ताहिक सकाळ, १७ सप्टेंबर १९९४)

Taxonomy upgrade extras: