आपुलिया बळें-७
एखादा अचूक शब्द सापडत नसेल, तर कवीने लिहिणे बंद करून सरळ घराबाहेर पडावे आणि दिसेल त्य परिचयाच्या साध्या माणसाला तो शब्द विचारावा. सामान्य मराठी माणसे जिवंत, खळखळती व कलदार मराठी भाषा बोलतात. कॉम्प्युटरला कवी म्हणत नसतात! माझ्या बाबात सांगायचे झाले, तर मी एकेका मराठी माणसाकडून संकोच न बाळगता हवे ते शब्द मिळवलेले आहेत. भाषा जनतेकडून शिकायची असते. मराठी माणसेच मराठी कवींचे खरे शब्दगुरू आहेत!
कुठलेच फूल आता मजला पसंत नाही
कळते मला : अरे, हा माझा वसंत नाही
दारात दुःखितांच्या मी शब्द मागणारा
तितकी अजून माझी कीर्ती दिगंत नाही !
कोणत्याही कवीने केवळ ग्रांथिक भाषेवर अवलंबून राहू नये. नाही तर पस्तावण्याची पाळी येईल ! त्याच वेळी आम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की, व्याकरणासाठी भाषा नसते. आधी भाषा असते आणि आधी भाषा असते म्हणूनच तिचा पदर धरून एखाद्या तान्ह्या लेकराप्रमाणे व्याकरण येते. ही मराठी भाषा आहे म्हणूनच मराठी भाषा आहे. तेव्हा आपला अंतिम न्याय कोणाच्या हाती आहे, याचा आम्ही आता तरी विचार करायला नको काय?
निरोप घेता घेता माझे मित्र पं. हृदयनाथ मंगेशकर आणि माझ्या ज्येष्ठ भगिनी श्रीमती शिरीष पै यांच्याकडून मला मिळालेली मानसिक सोबत आणि आधार यांना मी कसे बरे विसरीन? काव्यरसिक म्हणून आणि त्याहून जास्त म्हणजे माझ्यावर -- माझ्या काव्यलेखनावर लक्ष ठेवणारी विश्वासू निर्मळ माणसे म्हणून मी बाळला आणि शिरीषताईंना मनापासून मानतो.
आता शेवटचे सांगायचे म्हणजे हा काव्यसंग्रह म्हणजे माझे एकट्याचे श्रेय नाही. पुण्याचे प्रतिभासंपन्न तरुण कवी श्री. प्रदीप कुलकर्णी ह्यांनी रात्रीच्या रात्री जागून सुंदर हस्ताक्षरात या पुस्तकाची मुद्रणसंहिता तयार केली.
माझे तरुण मित्र श्री. पुरुषोत्तम मालोदे यांची मला ही माझी प्रस्तावनावजा भूमिका ( पुन्हा फेरविचार करून -- संस्कार करून) लिहितांना फार मदत झाली.
श्री. ताराचंद चव्हाण यांनी वेळोवेळी मला सूचना दिल्या व साह्य केले. माझे सहाय्यक आयुष्यमान दिलीप देवगडे यांचे अथ परिश्रम माझ्या सतत उपयोगी पडले.
माझ्या या प्रस्तावनेची/ भूमिकेची पहिली प्रत तयार करतांना पुण्याचे माझे मित्र कवी श्री. दीपक करंदीकर यांनी प्रारंभीच्या काळात, वेळ आणि श्रम यांचा विचारच केला नाही. दीपकला धन्यवाद! याचे वेळी माझे जवळचे मित्र शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांचेही मी प्रेम आणि कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो.
माझे काटोलचे (जि. नागपूर) प्रतिभासंपन्न चित्रकार मित्र आयुष्यमान दिगंबर गायकवाड यांनी आपुलकीने माझ्या या 'झंझावात' नामक काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठासाठी अतिशय सुंदर प्रभावी व समर्पक असे चित्र काढून मला उपकृत केले आहे. मी या प्रेमाच्या ऋणाची परतफेड म्हणून आयुष्यमान दिगंबर गायकवाड यांना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा देतो.
मी या वेळी अजून किती जणांचे कृतज्ञतेने स्मरण करू? मला उभ्या महाराष्ट्रातून गेली कित्येक वर्षे 'एल्गार'नंतरच्या काव्यसंग्रहाविषयी सतत आस्थेने विचारणा होत होती. सर्वांना 'झंझावात'ची चाहूल लागलेली होती. सारेच मला हालवून जागे ठेवत होते.