उठ बा रे पांडुरंगा..

संत नाही राहिले ते, राहिले ना भाट आता
उठ बा रे पांडुरंगा दाखवाया वाट आता ..

पेरल्या नोटेस त्यांच्या पीक येते बहुमतांचे
लोकशाहीचा असा बाजार हा सरलाट आता..

सांगतो हा सातबारा आत्महत्येची कहाणी
कर्जमाफीचाच त्याहुन वाढला बोभाट आता..

वाटतो जो मुक्तहस्ते राज्य त्याचे, तोच राजा
तू तुझ्या कोट्यातलेही रोज थोडे वाट आता..

चंद्रभागेनेच ज्यांची आजवर धुतलीत पापे
तेच सारे पुन्य आत्मे घाण करती घाट आता..

रोज कानी त्याच वार्ता थडकती दाहीदिशांनी
भ्रष्टनाही कोण येथे? प्रश्न पडतो दाट आता..

जो इथे पेटून उठला तो पुन्हा दिसलाच नाही
उघडणारे तोंड होते बंद बिनबोभाट आता..

ताज अन् कन्याकुमारी प्रीति,शांतीचीच रुपे
दोन्ही तिर्थांच्या मधे मग देश का मोकाट आता?..

खेळ पुन्हा तोच येथे मांडला दुर्योधनांनी
लाज अबलेचीच पुन्हा 'शाम' बघते वाट आता..

गझल: 

प्रतिसाद

वा वा .. चांगली गझल.... मतल्यातील भाट हा शब्द तितकासा पटला नाही.

सरलाट ऐवजी ''बेफाट''ही चालु शकेल...

कर्जमाफीचाच त्याहुन वाढला बोभाट आता..... येथे कर्जमाफी वाढली येथेच बिनबोभाट आता.. असे काहिसे केल्यास सुलभ होईल असे वाटते.... असो.

छान गझल.पुलेशु.

धन्यवाद! डॉ.साहेब आपल्या सूचनांचा आदर आहे.
नक्कीच योग्य तो बदल होईल.

सगळीच आवडली!!!

त्या कोल्हापुरी 'पुन्न्हा'वर अनेकदा लिहीले राव!

देश का बिनबोभाट आणि 'तू तुझ्या कोट्यातलेही रोज थोडे वाट आता' हे शेर / मिसरे आवडले.

'ऊ' पाहिजे मतल्यातील 'उठ बा रे पांडुरंगा' मध्ये!

शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

कैलास , बेफिकीर ,ह बा, सर्वांचे मनःपुर्वक आभार..! आणि निर्मळ सूचनांचे स्वागत!