पाणी थकले, जमीन थकली...

पाणी थकले, जमीन थकली बिमार वारा झाला
समजून घेता आला तर घे खास इशारा झाला

कुठे हरवले तुझे नि माझे घन ते आनंदाचे ?
काय तुझ्या माझ्या जगण्याचा मोरपिसारा झाला ?

आधी होते चंद्र, कळ्या, पक्षांचे येणेजाणे
नको विचारू अता कशाचा मनी निवारा झाला

डिग्री, पदके, प्रमाणपत्रे, शाली, स्म्रुतीचिन्हे...
घर छोटेसे झाले आणिक खूप पसारा झाला

नव्वद वर्षाची ती आजी खरे बोलली होती
पृथ्वीला तोलुन धरणारा सर्प म्हतारा झाला...

- वैभव देशमुख

गझल: 

प्रतिसाद

वाह... नितांतसुंदर गझल....

आधी होते चंद्र, कळ्या, पक्षांचे येणेजाणे
नको विचारू अता कशाचा मनी निवारा झाला

हा शेर खूपच आवडला....

शेवटच्या शेरात ''म्हतारा'' वापरणे अगदी चपखल.... माझी आजी म्हतारा/म्हतारी असंच म्हणायची...

पुलेशु.

घर छोटेसे झाले आणिक खूप पसारा झाला - वा वा!

मतला आणि मोरमिसाराही मस्तच!

स्मृती मुळे बहुधा एखादी मात्रा कमी होत असावी असे वाटले, नीट पाहिले नाही .

शुभेच्छा! र्‍हस्व दीर्घ व 'बिमार' वगैरे रिप्लेसेबल असेल का?

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

डिग्री, पदके, प्रमाणपत्रे, शाली, स्म्रुतीचिन्हे...
घर छोटेसे झाले आणिक खूप पसारा झाला

नव्वद वर्षाची ती आजी खरे बोलली होती
पृथ्वीला तोलुन धरणारा सर्प म्हतारा झाला...

खूपच छान!

नव्वद वर्षाची ती आजी खरे बोलली होती
पृथ्वीला तोलुन धरणारा सर्प म्हतारा झाला...

गझल सुंदरच आहे पण
"पृथ्वीला तोलुन धरणारा सर्प" हि संकल्पना भावली नाही...
जो नव्हताच तो म्हतारा झालाच कसा?????????????????????????????????????????
मजुराच्या तळहातावरच प्रुथ्वि तरलेली आहे हे वास्तव कसं नाकारता वैभवराव
शुभेच्छा...

"पृथ्वीला तोलुन धरणारा सर्प" हि संकल्पना भावली नाही...
जो नव्हताच तो म्हतारा झालाच कसा?????????????????????????????????????????

माफ करा हाडकेजी. माझी गझलेची आणि शेरांची समज अजून खूपच तोकडी आहे.
बर्‍याच संकल्पणा आणि शेर मला अजून नीट कळतच नाहीत.
मी आजवर पृथ्वी सर्पाच्या फण्यावरती तरलेली आहे असेच समजत होतो.
गैरसमज दूर केल्याबद्दल
धन्यवाद...

गझल सुंदरआहे!!! लाजवाब!!!

डिग्री, पदके, प्रमाणपत्रे, शाली, स्म्रुतीचिन्हे...
घर छोटेसे झाले आणिक खूप पसारा झाला

हा शेर खूपच आवडला....

सुरेख, मार्मिक गझल.
पसारा आणि सर्प शेर फार आवडले.

पुलेशु.

व्वाह!
तुमच्या गझला अत्यंत आनन्द देतात.
छान लिहिता.....

वा! उत्तम गझल! निवारा आणि पसारा अप्रतिम!

धन्यवाद....

डिग्री पदके.. आवडले. गझलही छान. शुभेच्छा.

संपुर्ण गझलच अप्रतिम वाटली. नेहमीप्रमाणेच छान लिहीलीयेस.

वाहवा...!

वा
पाणी थकले, जमीन थकली बिमार वारा झाला
समजून घेता आला तर घे खास इशारा झाला

डिग्री पदके, सर्प म्हातारा हे दोन्ही शेर आवडले.
शेषनागाच्या फण्यावर पृथ्वी आहे अशी संकल्पना पुराणात आहे असे वाचल्याचे आठवते. वा त्याचा मस्त उपयोग केला आहे. तुमच्या गझला आवडतात, उशीरा प्रतिसादाबद्दल क्षमस्व.

डिग्री, पदके, प्रमाणपत्रे, शाली, स्म्रुतीचिन्हे...
घर छोटेसे झाले आणिक खूप पसारा झाला......

अप्रतिम, फारच छान. स्मृ असा लिहा smRu

तिथे वृत्तात गडबड होतेय. स्मृतिचिन्हे अन प्रमाणपत्रे डिग्र्या शाली पदके..... असे करून पहा. कारण स्मृ ची मात्रा १ आहे.

पहा पटलं तर

शुभेच्छा

धोंडोपंत