अंतरातली व्यथा अंतरी जपायची

भेट आपली अशी वादळी असायची
आत आत खोलवर... वीज लखलखायची

स्पर्श केवडा तुझा ... श्वास चंदनी तुझे
देह सळसळायचा अन मिठी डसायची

सांत्वनास तू मला... मी तुला असायचो
रात्रभर दवांमध्ये आसवे भिजायची

ह्या तिच्या जुन्या स्मृती... मौनराग छेडती
श्वास रोख! अन्यथा... शांतता ढळायची

दाखवू नकोस तू दु:ख सारखे तुझे
प्रेरणा मिळायची... वेदना सुचायची

दिवस पाहिले असे... रोज अवस व्हायची
आणि भास्करासही सावली गिळायची

एक नीळकंठ तर सर्व माणसांमधे
अंतरातली व्यथा अंतरी जपायची

मी अखेर जाणले मर्म जीवना तुझे
सत्य ओघळायचे... स्वप्नं साकळायची

एक हेच साकडे घातले मनाकडे
सोड शेवटी तरी लालसा जगायची

गझल: 

प्रतिसाद

मी अखेर जाणले मर्म जीवना तुझे
सत्य ओघळायचे... स्वप्नं साकळायची

वाव्वा. विशेष. एकंदर छानच.

अवस, मर्म, लालसा खास! सगळीच गझल सुरेख!

ह्या तिच्या जुन्या स्मृती... मौनराग छेडती
श्वास रोख! अन्यथा... शांतता ढळायची

दाखवू नकोस तू दु:ख सारखे तुझे
प्रेरणा मिळायची... वेदना सुचायची

मी अखेर जाणले मर्म जीवना तुझे
सत्य ओघळायचे... स्वप्नं साकळायची
वाव्वा!!!!

सुरेख गझल.

मिल्या क्या बात है... बहोत खुब