प्रवासी

आरशालाही स्वत:चा अर्थ कळला पाहिजे
चेहरा माझा खरा मज त्यात दिसला पाहिजे

पावलांना वाट कळते, एवढे नाही पुरे
त्या धुळीला हा प्रवासीही उमगला पाहिजे

पाठ फिरवुन जायला अन् तू सखे वळशीलही
पावलांनाही तुझा निर्धार पटला पाहिजे

वाहताना आसवांना एक आडोसा हवा
(आजच्याइतकाच पाउस रोज पडला पाहिजे)

वाट दु:खाची कितीही, संपुनी जाईलही
फक्त दु:खानेच माझा हात धरला पाहिजे

लेखणी बहरून यावी हे तुला जर वाटते-
काळजाच्या वेदनांचा संप मिटला पाहिजे

जाणिवा हृदयास भिडल्या- ओळखावे हे कसे?
आपुल्या डोळ्यांतला तो मेघ भरला पाहिजे

आटला नाही कधीही आठवांचा हा झरा
आत माझ्या खोल त्याचा उगम असला पाहिजे

- नचिकेत जोशी

गझल: 

प्रतिसाद

वा वा... छान गझल नचिकेतराव...

वाहताना आसवांना एक आडोसा हवा
(आजच्याइतकाच पाउस रोज पडला पाहिजे)

हा शेर फार आवडला..

वाट दु:खाची कितीही, संपुनी जाईलही
फक्त दु:खानेच माझा हात धरला पाहिजे

लेखणी बहरून यावी हे तुला जर वाटते-
काळजाच्या वेदनांचा संप मिटला पाहिजे

छान शेर!

पावलांना वाट कळते, एवढे नाही पुरे
त्या धुळीला हा प्रवासीही उमगला पाहिजे

सही!
पाठ फिरवुन जायला अन् तू सखे वळशीलही
पावलांनाही तुझा निर्धार पटला पाहिजे

अतिशय सुरेख!
वाहताना आसवांना एक आडोसा हवा
(आजच्याइतकाच पाउस रोज पडला पाहिजे)

अफाट!!!!!
खूप खूप आवडली गझल!

छान गझल.

कैलासजी, अजयजी, क्रांतिजी, गंगाधरजी, धन्यवाद!

लेखणीच्या शेराचा उला मिसरा
"लेखणी बहरून यावी वाटते कित्येकदा" असा केला तर?
अजून एक, पाठ फिरवुन जायला मग तू सखे वळशीलही असं केलं तर?

सुरेख गझल, नचिकेता.

वाहताना आसवांना एक आडोसा हवा
(आजच्याइतकाच पाउस रोज पडला पाहिजे)

क्या बात है.. व्वाह !

वाट दु:खाची कितीही, संपुनी जाईलही
फक्त दु:खानेच माझा हात धरला पाहिजे

सुरेख ! विशेषतः खालची ओळ.

आटला नाही कधीही आठवांचा हा झरा
आत माझ्या खोल त्याचा उगम असला पाहिजे

सुंदर !!
एकंदर गझल फार फार आवडली. असेच लिहित रहा.

लेखणी बहरून यावी हे तुला जर वाटते-
काळजाच्या वेदनांचा संप मिटला पाहिजे

आहे तो छानच वाटतो.

पावलांना वाट कळते, एवढे नाही पुरे
त्या धुळीला हा प्रवासीही उमगला पाहिजे

पाठ फिरवुन जायला अन् तू सखे वळशीलही
पावलांनाही तुझा निर्धार पटला पाहिजे

वाहताना आसवांना एक आडोसा हवा
(आजच्याइतकाच पाउस रोज पडला पाहिजे).. वाह वाह एकदम हाय-क्लास शेर..मस्त...विशेषतः निर्धाराचा शेर..लिहीत रहाणे
-मानस६

ज्ञानेशराव, खास आभार...
मानस, धन्यवाद!
लिहीत रहाणे >> नक्कीच! :)

वाहताना आसवांना एक आडोसा हवा
(आजच्याइतकाच पाउस रोज पडला पाहिजे)

आणि

लेखणी बहरून यावी हे तुला जर वाटते-
काळजाच्या वेदनांचा संप मिटला पाहिजे

जास्त आवडले. बाकी शेरही छानच आहेत. पण हे वाचताना थांबलोच!

छान गझल, आवडली सगळीच्या सगळीच

बहर, श्यामली,
धन्यवाद! :)

सुंदर गझल....

आनंदयात्री जी,
व्वा...एकदम सुरेख गझल.
वाचून खूप बरे वाटले.आपल्याला जे म्हणायचे आहे ते अगदी ठाम आले आहे.अगदी बिनदिक्कत.....
लिखाणास शुभेच्छा!

वैभव, निलेश,
thanks!! :-)

सगळ्यांच्या प्रतिक्रीया एकत्र करुन जी होते ती....
(आजच्याइतकाच पाउस रोज पडला पाहिजे)