'' शेवटी ''

वाटते व्हावे न केव्हा,तेच झाले शेवटी
सांत्वनाला माझिया,शत्रूच आले शेवटी

हाव केली त्या क्षणी,काही मला ना लाभले
निर्विकारी जाहलो,सारे मिळाले शेवटी

लोक दगडासारखे,कोमल हृदय माझे इथे
लाख मी सांभाळले पण्,वार झाले शेवटी

भिस्त माझी खास होती,ज्या कुणा मित्रांवरी
लोटुनी मज संकटी,तेही पळाले शेवटी

देतसे व्याख्यान दारुबंदि वरती जे कुणी,
पाहिले त्यांच्याच मी,हातात प्याले शेवटी

भार मी वाहून ज्यांचा,दुखविले खांदे सदा
तेच मम खांदेकरी होण्यास आले शेवटी

जन्म गेला हा तुझा '' कैलास '' पुष्पांच्या सवे
घेतले(स) हातात का बंदूक भाले शेवटी ?

डॉ.कैलास गायकवाड.

गझल: 

प्रतिसाद

सगळे शेर आवडले... छान गझल!!!

हाव केली त्या क्षणी,काही मला ना लाभले
निर्विकारी जाहलो,सारे मिळाले शेवटी

वा व्वा.

जन्म गेला हा तुझा '' कैलास '' पुष्पांच्या सवे
घेतले(स) हातात का बंदूक भाले शेवटी ?
छान.

मतलाही आवडला.

धन्यवाद हबा,
धन्यवाद निलेश.

डॉ.कैलास

दारूबंदी वरून आठवलं... कहा मैखाने का दरवा़झा गालिब और कहा वाइज.. पर इतना जानते है कल वो जाता था के हम निकले!!

बाकी गजल सहीच. नेहमीप्रमाणे डॉक्टरसाहेब! क्या बात है!

भार मी वाहून ज्यांचा,दुखविले खांदे सदा
तेच मम खांदेकरी होण्यास आले शेवटी

हा शेर आवडला.

तेच मम खांदेकरी होण्या न आले शेवटी
- असा विरोधाभास कसा वाटला असता?

धन्यवाद विसुना ना......

''तेच मम खांदेकरी होण्यास आले शेवटी'' यातून मला मी उपकार केलेल्या माणसांना मला ''पोचविण्याची '' खूप घाई झाली होती हे सूचित करायचे आहे..... अर्थात आपण म्हणालात ते जास्त समर्पक वाटते आहे.... ( उपकार केलेली माणसे खांदा सुद्धा द्यायला आली नाही इतकी कृतघ्न निघाली---- हे अधिक भिडतंय )

मनःपूर्वक धन्यवाद...

डॉ.कैलास