ती स्वप्नसुंदरी

ती स्वप्नसुंदरी

सात खिडक्या पुरेशा मी झाकतो तरी
शिरते कशी कळेना ती स्वप्नसुंदरी

ते चित्र पाहतांना दिसते समानता(?)
राधा,टिना,करीना बाजूस श्रीहरी

जोडे सजावटीला एसी-कपाट ते
भाजी-फ़ळास जागा, मात्र उघड्यावरी

मंगळ कह्यात आला, कक्षेत तारका
भैरू अजून खातो कांदा नि भाकरी

जिंकून मीच हरतो, ना जिंकतो कधी
तुमचा लवाद आहे, पंच तुमचे घरी

खेड्याकडून जावे शहराकडे जसे
आकार घटत चोळी, जाते सरासरी

शेती करून मालक होणेच मुर्खता
सन्मान मोल आहे कर अभय चाकरी

गंगाधर मुटे
………………………………….………

गझल: 

प्रतिसाद

ते चित्र पाहतांना दिसते समानता(?)
राधा,टिना,करीना बाजूस श्रीहरी

हा शेर कृपया

जोपासतो अशी ही आम्ही समानता
राधा,टिना,करीना बाजूस श्रीहरी

असा वाचावा.

मंगळ कह्यात आला, कक्षेत तारका
भैरू अजून खातो कांदा नि भाकरी

खूप छान मुटेजी..

डॉ.कैलास

छान गझल मुटेजी. सगळेच शेर आवडले... वा वा!

जोपासतो अशी ही आम्ही समानता
राधा,टिना,करीना बाजूस श्रीहरी
वा.

मंगळ कह्यात आला, कक्षेत तारका
भैरू अजून खातो कांदा नि भाकरी

वा व्वा.हा शेर तर खुपच आवडला.

मंगळ कह्यात आला, कक्षेत तारका
भैरू अजून खातो कांदा नि भाकरी

वा. छान. अशीच भावना व्यक्त करणारा पुलस्ति ह्यांचा एक शेर होता:

मॉल उभा झाला अन बसला त्याचा कुडमुड धंदा
प्रगतीच्या व्याख्येमध्ये म्हादूची टपरी नाही .

शेती करून मालक होणेच मुर्खता
सन्मान मोल आहे कर अभय चाकरी
वा. अभय टोपणनाव आहे का. नसावे असे वाटते. खालची ओळ सफाईदार हवी. वरच्या ओळीतले होणेच मूर्खता हा तुकडा कानांना खटकतो.

सात खिडक्या पुरेशा मी झाकतो तरी
शिरते कशी कळेना ती स्वप्नसुंदरी

सात खिडक्या कुठल्या? अशा काही ओळी लयीत नाहीत.

कैलासजी, हबाजी, निलेशजी, चित्तजी प्रतिसादाबद्दल आभार.

चित्तजी,
अभय टोपणनाव आहे, मक्ता म्हणुन. प्रत्येक रचनेत मी वापरत असतो, कवितेत देखिल.

होणेच मूर्खता या विषयी तुमचे मत मान्य आहे. भविष्यात उपयोग होईल.

सात खिडक्या कुठल्या?
नऊ पैकी सात. (मानवी देहाच्या)
(किमान दोन खिडक्या उघड्या ठेवणे आवश्यक आहे. नाहीतर माणुस गुदमरून मरून जायचा)

(किमान दोन खिडक्या उघड्या ठेवणे आवश्यक आहे. नाहीतर माणुस गुदमरून मरून जायचा)

हं. माझ्यामते कवितेने प्रश्न विचारावेत; पण तिने तिने फार कोडी घालू नये वा फार द्राविडी प्राणायम घालायलाही लावू नये.
रचनेत स्वच्छपणा, सफाईदारपणा असणे चांगलेच.

भैरू अजून खातो...हा शेर चांगला.