सुटे, मोकळे होण्यामध्ये हात जरा गुरफटले होते

ज्याच्या नाराजीने सध्या नवीन वादळ उठले होते
हे शोधा कि आधी त्याचे किती जणांशी पटले होते

बाग जरा नाखुशच होती फुलांनीच समजोता केला
नव्या ऋतूंची वाट पाहुनी रंग फुलांचे विटले होते

पाय मोकळे झाल्यावरती उभा राहिला नवाच गुंता
सुटे, मोकळे होण्यामध्ये हात जरा गुरफटले होते

पुसू नका आरसे उगाचच तोंडावर मारत जा पाणी
रोज नव्या रंगानी मुळच्या चेहऱ्यांना बरबटले होते

जीवानिशी जे गेले त्यांच्या मृतदेहांना नाही वाली
लाड तयांचे झाले ज्यांना थोडेसे खरचटले होते

धीर कधीना खचला तरीही या सत्याची जाणीव झाली
शरीर थोडे थकले होते... पाय जरासे दमले होते

....कैलास गांधी

गझल: 

प्रतिसाद

वृत्तानुसार शब्द ऱ्हस्व किंव दीर्घ लिहावेत, ही विनंती.

वा. अगदी जोमदार गझल आहे कैलासराव. फार आवडली.

वा वा ... हरेक शेर खणखणित...... कैलासजी,कृपया विश्वस्तांच्या सूचनेकडे लक्ष द्यावे.

डॉ.कैलास

आवडली गझल.

उत्तम रचना
-मानस६

मतला भयंकरच आवडला... खरं म्हणजे तोच मनात घेऊन बसलो आहे. पुढे वाचलीच नाही. बाकी प्रतिसाद उद्या देतो. माफ करा... (चूक तुमच्या मतल्याचीच आहे!) :)

सगळी गझल आवडली.

ज्याच्या नाराजीने सध्या नवीन वादळ उठले होते
हे शोधा कि आधी त्याचे किती जणांशी पटले होते

हा शेर फार फार आवडला.

चित्तरंजनजी, कैलासजी, क्रान्ति, निलेश, मानस,बहर, ह बा आणि गंगाधरजी धन्यवाद.
ऱ्हस्व किंव दीर्घ या चुका टाईप करताना होत आहेत अजुन सरावलेलो नाही.
बहर प्रतिक्रीयेची वाट पहातोय...