पुढे सरू की जाऊ मागे...

पुढे सरू की जाऊ मागे काय करू...?
द्वीधा द्वीधा या हृदयाचे काय करू ?

इथेच झोपू की एखादे घर शोधू ?
वहीत आहे काही पत्ते काय करू ?

पुढच्या थांब्यावरती उतरुन जाशिल तू
तुझ्यासवे मी बोलुन खोटे काय करू ?

रद्दी सारी विकून आलो बाजारी
आता हे कवितांचे गठ्ठे काय करू ?

तुझी आठवण बिलगुन या ब्रम्हांडाला
तुझ्यासारखे दिसते सारे काय करू ?

सत्य दाटले पेनाच्या टोकावरती...
पुढ्यात आहे कागद कोरे काय करू ?

तिफन थांबवुन विचार करतो आहे मी
पेरू की खावू हे दाणे ? काय करू ?

- वैभव देशमुख

गझल: 

प्रतिसाद

वा वैभवराव..... छान गझल.

पुढच्या थांब्यावरती उतरुन जाशिल तू
तुझ्यासवे मी बोलुन खोटे काय करू ?

रद्दी सारी विकून आलो बाजारी
आता हे कवितांचे गठ्ठे काय करू ?

तुझी आठवण बिलगुन या ब्रम्हांडाला
तुझ्यासारखे दिसते सारे काय करू ?

सत्य दाटले पेनाच्या टोकावरती...
पुढ्यात आहे कागद कोरे काय करू ?

हे शेर खूप छान.....

उर्वरित दोन शेरांत मला कही गोष्टी खटकल्या......

पुढे सरू की जाऊ मागे काय करू...?
द्विधा द्विधा मी या हृदयाचे काय करू ?..... द्विधा ही मनस्थिती असते/असावी... तद्वत द्विधा हृदय पटत नाही.

द्विधा द्विधा या मनस्थितीचे काय करु? ..........?

इथेच झोपू की एखादे घर शोधू ?
वहीत आहे काही पत्ते काय करू ?.... वहीत आहे (त) काही पत्ते काय करु?

असो... एकंदर चांगली गझल. अभिनंदन.

डॉ.कैलास

वैभव,
अप्रतिम!!!
छान गझल!

कैलासजी,

द्विधा ही मनस्थिती असते/असावी... तद्वत द्विधा हृदय पटत नाही.
हा मुद्दा पटला नाही.
शेर वाचताना/पोचताना अडचण येत नाही.

वहीत आहे (त) काही पत्ते काय करु?
इथे एकवचन-अनेकवचनाचा प्रश्न येतो आहे असे वाटते.

छान गझल.

मी द्विधा आहे त्यामुळे आता या हृदयाचे काय करावे, हे योग्यच आहे

पुढच्या थांब्यावरती उतरुन जाशिल तू
तुझ्यासवे मी बोलुन खोटे काय करू ?

वा वैभव, सुरेख गझल आहे. सगळेच शेर आवडले.

"पुढच्या थांब्यावरती..."
वा.....

गझल आवडली.

पुढच्या थांब्यावरती उतरुन जाशिल तू
तुझ्यासवे मी बोलुन खोटे काय करू ?

अगदी मस्त वाटला.छान गझल.

सत्य दाटले पेनाच्या टोकावरती...
पुढ्यात आहे कागद कोरे काय करू ?
हा शेर आवडला.

खालिल दोन्ही ओळीत आहेत असेच हवे.

वहीत आहे काही पत्ते काय करू ?

पुढ्यात आहे कागद कोरे काय करू ?

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार...

द्विधा द्विधा मी या हृदयाचे काय करू ?
ही ओळ पुढीलप्रमाणे वाचावी :

द्वीधा द्वीधा या हृदयाचे काय करू ?
राहिलेला शेर:
तिफन थांबवुन विचार करतो आहे मी
पेरू की खावू हे दाणे ? काय करू ?

तिफन थांबवुन विचार करतो आहे मी
पेरू की खावू हे दाणे ? काय करू ?

वावा... आजच्या शेतकर्‍यावर मार्मिक भाष्य....... खूप आवडले.

डॉ.कैलास

तिफन थांबवुन विचार करतो आहे मी
पेरू की खावू हे दाणे ? काय करू ?
आवडले.

इथेच झोपू की एखादे घर शोधू ?
वहीत आहे काही पत्ते काय करू ?

पुढच्या थांब्यावरती उतरुन जाशिल तू
तुझ्यासवे मी बोलुन खोटे काय करू ?

गझल सुरेख, हे दोन शेर खूप आवडले. `पत्ते' तर फारच

विडंबनकार बापू, कैलासजी
खालिल दोन्ही ओळीत आहेत असेच हवे.
वहीत आहे काही पत्ते काय करू ?
पुढ्यात आहे कागद कोरे काय करू ?

मी प्रयत्न करेल....सर्वांचे धन्यवाद.

यार आता काय बोलू बस शब्द नाहीत

पुढच्या थांब्यावरती उतरुन जाशिल तू
तुझ्यासवे मी बोलुन खोटे काय करू ?

सत्य दाटले पेनाच्या टोकावरती...
पुढ्यात आहे कागद कोरे काय करू ?

छान आहेत हे शेर.
पुलेशु.

कड्यांग गझल...

उत्तम
मजा आली वाचताना

तुझ्यासारखे दिसते सारे काय करू ?

vaa vaa, gazal aavadalee.