आज अचानक तुझी आठवण का यावी

आज अचानक तुझी आठवण का यावी
आज पापणी ओली माझी का व्हावी

फार काळ या गोष्टीला झाला नाही
युगे लोटली असतील पण का वाटावी

जुन्या वहीची तीच दुमडलेली पाने
अकस्मात वार्‍याने येउन उघडावी

बरेच काही घडले ह्या मधल्या काळी
तुला कहाणी कुठून आता सांगावी

शब्द उतरण्या पानावरती घाबरले
भीती इतकी अर्थांची का वाटावी?

तुझ्याच साठी शिकलो मौनाची भाषा
फक्त तुला ही धडपड माझी समजावी

हिशोब केला तुला दिलेल्या ताऱ्यांचा
समजत नाही कुठे पौर्णिमा मांडावी

पुन्हा तोच पाऊस पडावा पूर्वीचा
पुन्हा तीच मी नाव कागदी सोडावी

पहाट होणे अशक्य आहे थांबवणे
तरी वाटते रात्र जरा ही लांबावी

मनात आहे काय काय दडले माझ्या
आज उडी डोहात मनाच्या मारावी

गझल: 

प्रतिसाद

धडपड, मौनाची भाषा, डोहात उडी, जुन्या वहीची दुमडलेली पाने... वावा! सगळेच शेर झकास! just in place!

शुभेच्छा.

शब्द उतरण्या पानावरती घाबरले
भीती इतकी अर्थांची का वाटावी?

दुसर्‍या मिसर्‍यात मात्रा कमी आहे.

भिती मला ह्या अर्थांची का वाटावी? असे काहिसे करुन पहा....... अर्थात निर्णय आपला....

बाकी सगळी गझल छान आहे. अभिनंदन.

डॉ.कैलास

शब्द उतरण्या पानावरती घाबरले
भीती इतकी अर्थांची का वाटावी?

दुसर्‍या मिसर्‍यात मात्रा कमी आहे.

मात्रा कमी आहे? कशी बुवा?

भीती हे मी भिती असे वाचले..... त्यामुळे लयीत म्हणताना मात्रा कमी असल्याचे जाणवले.......
आपल्या प्रतिसादानंतर माझी चूक कळाली... क्ष्मस्व.

डॉ.कैलास

कैलासजी... भीती हा पूर्ण शब्दच दिर्घ आहे. त्यामुळे तिथे मात्रा कमी पडत नाहीये.

येस बहर जी...... माय मिस्टेक....

डो.कैलास

तुम्ही आणि मी 'जतन' करा वर बहुतेक एकाच वेळी टिचकी मारली असावी. @ कैलासजी. त्यामुळे पाठोपाठ प्रतिसाद आले. माझा प्रतिसाद बाद समजावा. कारण त्या आधीच प्रश्न मिटला होता.

गझल छान म्हणजे अप्रतिमच आहे.

विषेशतः
पुन्हा तोच पाऊस पडावा पूर्वीचा
पुन्हा तीच मी नाव कागदी सोडावी

पहाट होणे अशक्य आहे थांबवणे
तरी वाटते रात्र जरा ही लांबावी

हे शेर वाचताना असा मूड क्रिएट झाला की

ये दॉलत भी लेलो ये शोहरत भी लेलो
भले छीन लो मुझसे मेरी जवानी
मगर मुझको लॉटा दो बचपण का सावण
वो कागज की कश्ती बो बारिश का पानी

................. वो छोटीसी राते वो लंबी कहानी

ही गझल आठवली.

मजा आली. शुभेच्छा!

खलास !
काय सुरेख गझल आहे...!!

पुन्हा पुन्हा वाचतो आहे.

जुन्या वहीची तीच दुमडलेली पाने
अकस्मात वार्‍याने येउन उघडावी

बरेच काही घडले ह्या मधल्या काळी
तुला कहाणी कुठून आता सांगावी

शब्द उतरण्या पानावरती घाबरले
भीती इतकी अर्थांची का वाटावी?

हिशोब केला तुला दिलेल्या ताऱ्यांचा
समजत नाही कुठे पौर्णिमा मांडावी

अप्रतिम !

पहाट होणे अशक्य आहे थांबवणे
तरी वाटते रात्र जरा ही लांबावी

किती साधा आणि सुरेख आहे हा शेर ! असे शेर वारंवार लिहिले गेले पाहिजेत...

धन्यवाद अनिरुद्ध राव !

शब्द उतरण्या पानावरती घाबरले
भीती इतकी अर्थांची का वाटावी?

तुझ्याच साठी शिकलो मौनाची भाषा
फक्त तुला ही धडपड माझी समजावी

हिशोब केला तुला दिलेल्या ताऱ्यांचा.
समजत नाही कुठे पौर्णिमा मांडावी....... बहोत बढिया

पहाट होणे अशक्य आहे थांबवणे
तरी वाटते रात्र जरा ही लांबावी... वा वा!

शेवटच्या शेरावरून मुजफ्फर वारसी ह्यांचा ' जहन की तह मे मुजफ्फर कोई दरिया तो नही' हा मिसरा आठवला
असो. उत्तम गझल.
-मानस६

पौर्णिमा आणि पहाट फार आवडली. एकंदर चांगली झाली आहे गझल अनिरुद्धराव.

तुझ्याच साठी शिकलो मौनाची भाषा
फक्त तुला ही धडपड माझी समजावी

हा शेर फार आवडला. गझल चांगली आहे.
(हे कोणते मात्रावृत्त आहे? दुसर्‍या अर्धओळीत एक दीर्घ जास्त आला असता तर अधिक 'ताले'वार झाली असती.
उदा. तुझ्याचसाठी शिकलो 'मी 'मौनाची भाषा)

पहाट होणे अशक्य आहे थांबवणे
तरी वाटते रात्र जरा ही लांबावी

मजा आली.

पहाट होणे अशक्य आहे थांबवणे
तरी वाटते रात्र जरा ही लांबावी

मजा आली.

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!
(आभारी)अनिरुद्ध अभ्यंकर

उत्तम गझल.

वा वा! उत्तम गझल.
तुझ्याच साठी शिकलो मौनाची भाषा
फक्त तुला ही धडपड माझी समजावी
हा शेर फार आवडला.
सोनाली

"पौर्णिमा" सर्वाधिक आवडला...

सुरेख गझल आहे.

निलेश,सोनाली,आनंदयात्री,गंगाधर तुमच्या सर्वांचे प्रतिसादा बद्दल मनापासून आभार..
(आभारी)अनिरुद्ध अभ्यंकर