कुठे म्हणालो परी असावी
कुठे म्हणालो परी असावी
मनाप्रमाणेतरी असावी

हवा कशाला प्रचंड पैसा
जगायला नोकरी असावी

तरूस आधार होत जावी
अशी कुणी वल्लरी असावी

नको अवाढव्य राजवाडा
निजायला ओसरी असावी

नको दिखाव्यास गोड गप्पा
मनात प्रीती खरी असावी

- प्रणव सदाशिव काळे

गझल: 

प्रतिसाद

वाचताना मजा आली
तरूस आधार होत जावी
अशी कुणी वल्लरी असावी

समजावून सांगाल का?

माझ्या काही ठराविक आवडत्या गझलपैकी ही एक..
लयी भारी...
लगे रहो...
-आपला आभाळ :)

सहज आणि प्रवाही गझल !
तरूस आधार होत जावी
अशी कुणी वल्लरी असावी

बढीया !

पुन्हा एकदा दाद घ्या, प्रणवराव.

समीर,
तरूस आधार होत जावी
अशी कुणी वल्लरी असावी

अशी एखादी वेल असावी जी झाडास आधार देईल! खरे तर झाडच वेलीला आधार देत असते...! सुंदर कल्पना...
 

कुठे म्हणालो परी असावी ! वा! सुंदर शेर.
((पर्‍या स्वप्नात आणि गोष्टीतच भेटाव्यात. :))

वा वा वा वा पंत,
आज बर्‍याच दिवसांनी तुमच्या गझलेला दाद देण्याचा योग आलाय. म्हणजे तुम्ही दाद देण्यासारखं लिहीत नव्हतात असा याचा अर्थ नाही. तुम्ही आमची रसद तोडली नाही, आम्हीच अन्नपाणी वर्ज्य केलेलं होतं. असो.
झकास गझल. मतला तर लई खास. इतका ओघवता मतला बर्‍याच दिवसात ऐकलेला नाही.
हवा कशाला प्रचंड पैसा
तुझ्या घरी नोकरी असावी....
असे आमच्यासारख्याला म्हणावेसे वाटेल.
--- अगस्ती
 

पर्‍या फक्त स्वप्नात भेटतात हे तुम्हाला कोणी सांगितले? पर्‍या कुठेही भेटाव्यात / भेटतात. आता पंत परिकथेतील राजकुमार असल्यामुळे त्यांना अगदी इथे सुध्दा भेटतील.
आपला,
(तर्कशुध्द) धोंडोपंत


 
 
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

वा वा पंत,
झकास गझल हो. "मनाप्रमाणे" सर्व शेर झालेत. चित्तरंजनमुळे तुमच्या गझला येथे वाचता येतील. नाहीतर गेली दोन वर्षे तुमच्या लेखनाला आम्ही पारखे झालो होतो. असो.
मस्त जमलेय गझल. भट्टी अशीच पेटलेली राहू द्या.
आपला,
(रसिक) धोंडोपंत
 
 
 
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

का कुणास ठाऊक समजायला वेळ लागला,
खूप डीप शेर आहे...
क्या बात है प्रणव साहब!!!

सर्व सदस्यांनी विषयांतरासाठी निरोपाची सुविधा वापरावी. व्यक्तिगत आशयाचे प्रतिसाद संपादित केले जातील. कळावे.
-संपादक

प्रणवराव...
तुमची परी आम्हाला फारच आवडली....देखणी आणि बांधेसूद...!
आम्हालाही दोन वर्षांपूर्वी  परीस्पर्श  झाला होता. तुम्हालाही त्याचा अनुभव देऊ इच्छितो....घ्या, स्पर्श करा आमच्या परीला...!

भावतेस मज जशी कशी आहेस तशी तू...
नकोस होऊ स्वप्नामधल्या परीसारखी !
.........
नसेल अस्तित्वात़, जगात जी कोठेच -
तुझीच ती होण्यास, अशी परी येईल...!
..........
(या पऱ्यांचे हे केवळ ओझरते दर्शन.  समग्र, निवांत, सांगोपांग दर्शन घडवू पुढे कधीतरी याच संकेतस्थळावर )
 ...या झाल्या आमच्या पऱ्या...पण तुमची परी खासच !  आपापल्या परीने जो तो आपापली परी पाहत असतो....! म्हणूनच तर शेवटी ज्याची त्याची परी वेगळी असते ना !!  
पुन्हा एकदा अभिनंदन...उत्तम गझल वाचायला दिलीत, त्याबद्दल...!