ती इतकी करारी वाटते

दोस्ता तुझी सार्‍यांबरोबर फार यारी वाटते
तू वेगळे अन वागले की मग गद्दारी वाटते

इतकी सवय जडली मनाला कुंपणी राहायची
ओलांडले हे घर जरा की हद्दपारी वाटते

गाती फुलांचे गोडवे फांदी उपेक्षित राहते
चाले जगी हे नेहमी त्याची शिसारी वाटते

ती वागते तेव्हा अशी आभाळ कोसळले तरी
मी बैसतो निश्चिंत ती इतकी करारी वाटते

जे अनुभवाने जाणले ते सांगतो दोस्ता तुला
असते जरा त्याहून 'ती' जितकी विचारी वाटते

निलेश कालुवाला.

गझल: 

प्रतिसाद

चौथ्या शेरातील 'निश्च्चिंत' मधला 'श्च्चिं' श अर्धा+च +पहिली वेलांटी+अनुस्वार असा वाचावा.

ती वागते तेव्हा अशी आभाळ कोसळले तरी
मी बैसतो निश्चिंत ती इतकी करारी वाटते

जे अनुभवाने जाणले ते सांगतो दोस्ता तुला
असते जरा त्याहून 'ती' जितकी विचारी वाटते

शेवटचे दोन्ही शेर आवड्ले गझल छानच.

इतकी सवय जडली मनाला कुंपणी राहायची
ओलांडले हे घर जरा की हद्दपारी वाटते
.
गाती फुलांचे गोडवे फांदी उपेक्षित राहते
चाले जगी हे नेहमी त्याची शिसारी वाटते

हे जास्तच आवडले.

हद्दपारी आवडला...

छान गझल.

गाती फुलांचे गोडवे फांदी उपेक्षित राहते

खुपच छान.

गदारी असा उच्चार करायचा का?

इतकी सवय जडली मनाला कुंपणी राहायची
ओलांडले हे घर जरा की हद्दपारी वाटते

वा.

एकंदर छान.

ह बा जी, गंगाधरजी,आनंदयात्री,बहर्,अनिलजी,
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.

@ चित्तरंजनजी...धन्यवाद!

खरं तर 'गद्दार' हा मूळचा हिंदी शब्द आहे.तो मराठीत क्वचित उच्चारला जातो.हा शब्द मराठीत पूर्ण रुळला आहे असे म्हणता येणार नाही. आणि त्याचा शब्दशः अर्थ आहे 'देशद्रोही' असा.वर हा शब्दशः अर्थ मलाही अभिप्रेत नाही.मराठीत प्रतारणा,विश्वासघात असं म्हणतात तसं काही अपेक्षित आहे.जमीन मोकळी करण्याच्या द्रुष्टीने दुसरा समर्पक शब्द मला मराठीत सापडला नाही.(हवं तर असं करून मी मतल्याची जुळवणी केली असं सोयीस्कर म्हणता येईल.) खरं तर आपण हे विचारले नव्हते.पण तरीही मी हे लिहिले.
.
गद्दारी(गद्दार) हा शब्द हिंदीतून ग+(पाय मोडून द ला द काना जोडून)+र असा उच्चारला जातो.तो उच्चार तसाच ठेवून मी लिहिला आहे.मराठीत हा वेगळयाप्रकारे उच्चारला जात असल्यास ठाऊक नाही.

मदारी सारखा गदारी उच्चारला तरच वृत्तात बसेल. अन्यथा नाही. पण हिंदी-उच्चारात 'द' चे द्वित्त आहे.

चित्तरंजनजी,
आपल्या मताशी मी सहमत आहे.मतला आणखी दुसर्‍या प्रकारे लिहायचा विचार करतो.

आपला सहर्ष आभारी आहे.