तरी हुंदक्यांना गिळावे किती?

तरी हुंदक्यांना गिळावे किती?

झणी झोत येती तुझ्या आठवांचे, सयेचे उमाळे छिपावे किती?
बळे रोखतो मी जरी आसवांना, तरी हुंदक्यांना गिळावे किती?

कधी चाललो मी तुझ्या पावलांनी, कधी बोट हातात होते तुझे
तशी सांज येणार परतून कैसी, मनी प्राक्तनाने झुरावे किती?

जरी देह-काया चिरंजीव नाही, तळे भावनांचे तरी साचते
जरी घालतो बांध मी या तळ्यांना, हृदय फ़ाटतांना तुणावे किती?

जगी जीव अब्जो जरी नांदताती, फ़ुलांच्या-फ़ळांच्या डहाळ्या दिसे
परी शोधताहे नजर का तुला बा! स्मृतींचे खुमारे भुलावे किती?

’अभय’ विरह येतो नशीबी कुणाच्या, कुणाचेच दुर्भाग्य तैसे नसो
शिरी छत्रछाया अखंडीत लाभो, विधात्या तुला मी पुजावे किती?

गंगाधर मुटे

गझल: 

प्रतिसाद

वा! खूप सुरेख !
खालील द्विपदी भारीच!

झणी झोत येती तुझ्या आठवांचे, सयेचे उमाळे छिपावे किती?
बळे रोखतो मी जरी आसवांना, तरी हुंदक्यांना गिळावे किती?

कधी चाललो मी तुझ्या पावलांनी, कधी बोट हातात होते तुझे
तशी सांज येणार परतून कैसी, मनी प्राक्तनाने झुरावे किती?

’अभय’ विरह येतो नशीबी कुणाच्या, कुणाचेच दुर्भाग्य तैसे नसो
शिरी छत्रछाया अखंडीत लाभो, विधात्या तुला मी पुजावे किती?

------------------------------------------------नचिकेत भिंगार्डे

’अभय’ विरह येतो नशीबी कुणाच्या, कुणाचेच दुर्भाग्य तैसे नसो
शिरी छत्रछाया अखंडीत लाभो, विधात्या तुला मी पुजावे किती?

छान रचना.

प्रामाणिक मतः
केवळ वृत्तात शब्द बसवायचे आहेत या उद्देशाने शाद्बिक करामती केल्यासारखे वाटत आहे. (मत वैयक्तिक आहे.)

(वगळलेली जागा/शेरातील शेवटचा भाग सर्वच शेरात कमी प्रभावी वटली. वयक्तिक मत.)

वामनजी तुमच्या मताशी सहमत.

>
प्रणवजी, हे तुमचे मत काही शब्दांबद्दल, काही ओळीबद्दल, काही शेरा बद्द्ल की संपुर्ण गझलेबद्दल आहे हे नाही कळाले.
मी तुमच्या मताचा आदर करतो. स्पष्टपणे लिहिल्याबद्दल आभारी आहे कारण नवोदितांना अशा स्पष्टमतांचा फायदाच होत असतो.

गंगाधर,
एकूणच गझलेबाबत माझे हे मत आहे.
परंतु इथे कोणी नवे, नवोदित मानून स्वतःला कमी लेखू नये. त्यामुळे तथाकथित गुरुंचे फार फावते.
स्वतःशी प्रामाणिक रहा.
शुभेच्छा.

>

काव्य कशाला मानायचे हे ज्याच्या-त्याच्या प्रकृतीवर अवलंबून आहे. त्यामुळे एखाद्याला या गझलेत काव्यच जर दिसत नसेल तर दोष त्या गझलेचाच आहे, असेही ठामपणे म्हणता येणार नाही.
...................................................
खरे तर गझलेचे पाचही शेर 'बाबांवर' आहेत.
आणि ती एका कोवळ्या जीवाची अनुभूती आहे.
वडील गेल्याचे दु:ख सर्वानाच सारखे होत असेलही कदाचित.... परंतू
परंतू वयाच्या पंधराव्या वर्षी वडीलांचे जाणे आणि
संपुर्ण कुटूंबाची जबाबदारी कोवळ्या खांद्यावर येउन पडणे
अशा परिस्थीतीत होणारे दु:ख, त्याची तिव्रता आणि दाहकता शब्दातीतच असते.
ही उत्कटता प्रदर्शित करणारे कवण जर काव्य ठरत नसेल ....

केवळ आणि फक्त केवळ प्रेयसी किंवा प्रियकर यांच्यावर शब्दांची उधळण.
तिचे येणे,तिचे जाणे.तिचे खाणे,तिचा गजरा,तिच्या नजरा
असे असेल तरच ते काव्य. तरच ते प्रेम,तरच तो विरह
असेच जर कुणाला मानायचे असेल तर

माझ्यासारख्याने कविता - गझला सोडून शेती करणेच श्रेय्यस्कर.
शेतात चार दाणे जास्त पिकतील. त्यामुळे चार लोकांचे भुकेचे प्रश्न तरी सुटतील.

माझ्यासारख्याने कविता - गझला सोडून शेती करणेच श्रेय्यस्कर.
शेतात चार दाणे जास्त पिकतील. त्यामुळे चार लोकांचे भुकेचे प्रश्न सुटतील.

काव्य म्हणजे काय हे ज्याना कळते ते कोणत्याच रचनेला काव्यहिन म्हणू शकत नाहीत. तुटपुंज्या ज्ञानावर कुणी आपल्याला अर्थहीन प्रतिसाद दिल्याने कविता करायचे सोडून देण्याइतका आपल्यातला कवी खुजा नसावा.
शेती करायचा विचारही वाइट नाही पण दोन्ही एकत्र केले जाउ शकते. आता थोडा मागास होइल पण भुइमुगच लावा, ओल्या शेंगा, उकडलेल्या शेंगा, भाजलेल्या शेंगा..... आ हा... वा वा...
(गंगाधरजी, काळजी नसावी जास्त खाणार नाही)
पुढील लेखनास आणि मागास टोकणीस शुभेच्छा.

आता थोडा मागास होइल पण भुइमुगच लावा,
ओल्या शेंगा, उकडलेल्या शेंगा, भाजलेल्या शेंगा..... आ हा... वा वा...

भुईमुगाच्या जोडीला मोगरा आणि गुलाबांची झाडे पण लावतो.

म्हणजे कवितेतही मोगरा,गुलाब
आणि शेतीतही मोगरा,गुलाब
मस्त दुग्धशर्करेचा योग जुळून येईल.
...................................................
ह.बा. वाणीचा हुरडा खायला माझ्या शेतात अवश्य या.

भुईमुगाच्या जोडीला मोगरा आणि गुलाबांची झाडे पण लावतो.

म्हणजे कवितेतही मोगरा,गुलाब
आणि शेतीतही मोगरा,गुलाब
मस्त दुग्धशर्करेचा योग जुळून येईल.

'कवितेत माझाही अता बघ आब आहे
शेतात माझ्या मोगरा, गुलाब आहे'

पिकण्यास आहे वेळ द्राक्षाना तरी मग
पाटात का ही वाहते शराब आहे?

(दोनच झाले)
मज्जा!!!

.......................................................
@ह.बा. वाणीचा हुरडा खायला माझ्या शेतात अवश्य या.@

हे विसरायचं नाही. लक्षात ठेवायच.

गंगाधरराव, कमी कालावधीतही तुमची प्रगती चांगली आहे. अगदी सुमंदारमालेसारख्या वृत्ताला छान हाताळले आहे. आता आशयाकडे आणि अभिव्यक्तीकडे अधिक लक्ष द्यावे. शुभेच्छा. दिल्ली दूर नाही.

चित्तरंजनजी,
हुरूप शतगुणित करणार्‍या अभिप्रायाबद्दल आभारी आहे.

गंगाधरजी,
नमस्कार!
झणी झोत येती तुझ्या आठवांचे,
हृदय फ़ाटतांना तुणावे किती?,
स्मृतींचे खुमारे भुलावे किती?....
अशी शब्दरचना नुसती श्ब्दांची करामत नाही.ह बां चे आणि चित्तरंजनचे मत अगदी योग्य आहे.लिहित रहा.

@ ह बा,

(गझलेत)'कवितेत माझाही अता बघ आब आहे
(शेरात)शेतात माझ्या मोगरा, गुलाब आहे'...........कसे वाटते?

पिकण्यास आहे वेळ द्राक्षाना तरी मग
पाटात का ही वाहते शराब आहे? वाह....

निलेशजी,

आपण सुचविलेला बदल छान. मी केलेल्या दोन्ही शेरात व्याकरणाचा घोळ आहे. पण मला ते आवडलेले आहेत. कुणी प्रभावी दुरूस्ती सुचविल्यास स्वागत.

ह.बा आणखी एक शेर बघा.

होतो पळालो त्यागुनी रणांगणाला
यादीत पदकांच्या तरी रुबाब आहे.

ह.बा... तुम्हाला सलाम!! आणि मुटे... जोरात लिहित रहा. गझल आवडली!

(बहर, धन्यवाद!)
गंगाधरजी,
"थोडीशी जंम्मत ग." सामुहिक गझल निर्मितीची संकल्पनाही वाइट नाही .
यापुढचे शेर कुणाला सुचले तर सांगावेत. व्याकरणाचा घोळ आहे तो तसाच ठेवा किंवा दुरूस्त करा. ही मज्जा असल्याने कुणी हे काय चाल्लय म्हणून आट्या गडद करू नये ही विनंती. .. (मज्जा!!).

'कवितेत माझाही अता बघ आब आहे
शेतात माझ्या मोगरा, गुलाब आहे' : ह बा

गझलेत माझाही अता बघ आब आहे
शेरात माझ्या मोगरा, गुलाब आहे' : डागडुजी :- निलेश कालुवाला

पिकण्यास आहे वेळ द्राक्षाना तरी मग
पाटात का ही वाहते शराब आहे? : ह बा

होतो पळालो त्यागुनी रणांगणाला
यादीत पदकांच्या तरी रुबाब आहे : गंगाधर मुटे

ह.बा आणखी एक शेर घ्या.

नजरेत कैसा जरब पोसला गडे तू
का वाढला माझाच रक्तदाब आहे?

ह बा,
आम्हीपण राहिलो उभा...

आधीच ही तब्बेत माझी वाळलेली
वरुन साला बायकोचा दाब आहे

ह.बा जी,
गंगाधरजी(रक्तदाब आवडला).
हा घ्या आणखी शेर.(व्याकरण दुरुस्ती करुन)

एक आहे हे असे -तुज आठवत संपून जाणे
अन तुला विसरायचे...ही आणखीही बाब आहे.

@ ह.बा. आमचाही थोडासा हातभार...

मिळून झंकारण्यात मौज आहे..
सतार माझी तू, मी रबाब आहे!!

निलेशजी,
शेर छान आहे पण आणखी प्रभावी हवा, मज्जा आली पाहिजे. व्याकरण दुय्यमच ठेवा, लय राहिली तरी खूप झाले. विचार करा.

बहर,
मिळून झंकारण्यात मौज आहे..
सतार माझी तू, मी रबाब आहे!!

अल्टीमेट! वाचताना मज्जा येतिये. साखळीत बसणारा आहे.
खर तर 'रबाब' हा शब्द माझ्या संग्रही नाही पण शेरात आलेल्या संदर्भावरुन तर्क करून मी त्याचा अर्थ काढला आहे. अर्थ सांगावा.

रबाब हे एक अरबी तंतूवाद्य आहे. ' ऐ दिले नादॉ ' ऐकलं असेल आपण रझिया सुल्तान सिनेमातलं. त्यात संतूर बरोबर वाजलेलं हे वाद्य आहे. (काहीसं मेंडोलीन सारखं.)