अपघात काय घडला?

रिमझिम सुरात धारा अवघा मळा बहरला
बांधावरी उतरल्या माझ्या अनंत गझला

पाण्यात त्राण नाही विरले कधीच भवरे
हळव्या नदीत सांगा अपघात काय घडला?

आई किती मयेची सार्‍याच लेकरांची
वाचून ओळ वरची गालात बाप हसला

अंधार शुभ्र झाला आभाळ सांडताना
भिजती धरा दिसेना, तो सुर्यही तरसला

ये मी रचून आलो माझे सरण कधीचे
ये एकटाच मरणा नाही विरोध कसला

- ह. बा. शिंदे

गझल: 

प्रतिसाद

रिमझिम सुरात धारा अवघा मळा बहरला
बांधावरी उतरल्या माझ्या अनंत गझला

वा... छान. मतला आवडला.

पाण्यात त्राण नाही विरले कधीच भवरे
हळव्या नदीत सांगा अपघात काय घडला?

जरा संदिग्ध वाटतोय......

पाण्यात त्राण नाही विरले कधीच भवरे
सांगा तुम्ही नदीचा अपराध काय घडला?
....... असे केल्यास्?अर्थात निर्णय तुमचाच.

आई किती मयेची सार्‍याच लेकरांची
वाचून ओळ वरची गालात बाप हसला

ठीक...

अंधार शुभ्र झाला आभाळ सांडताना
भिजती धरा दिसेना, तो सुर्यही तरसला

सुंदर.....

ये मी रचून आलो माझे सरण कधीचे
ये एकटाच मरणा नाही विरोध कसला

हा शेर बाकी भन्नाट आहे...आवडला.

एकंदर छान गझल.

डॉ.कैलास

पाण्यात त्राण नाही विरले कधीच भवरे
सांगा तुम्ही नदीचा अपराध काय घडला?....... असे केल्यास्?अर्थात निर्णय तुमचाच.

कैलासजी,
सुचविलेला बदल खूप आवडला. स्विकारण्याचा मोह होतो आहे पण तत्व मोडण्याचं धाडस होत नाही. जे लिहीलं ते लिहीलं.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

ये मी रचून आलो माझे सरण कधीचे
ये एकटाच मरणा नाही विरोध कसला

इथे

ये मी रचून आलो माझे सरण कधीचे
ये एकटाच मॄत्यो नाही विरोध कसला

हे हि बरे वाटेल.

डॉ.कैलास

दुसरा अन तिसरा शेर अप्रतिम! ह.बा., लिहीत राहा! आपण गझलेत नवीन आहात हे मला व्यक्तीशः मान्य नाही.

ह.बा.जी ,
एकंदर गझल सुरेखच.

ये मी रचून आलो माझे सरण कधीचे
ये एकटाच मरणा नाही विरोध कसला

इथे

ये मी रचून आलो माझे सरण कधीचे
ये एकटाच मॄत्यो नाही विरोध कसला

कैलासजींनी सुचविलेल्या ह्या बदलाशी मी १००% सहमत आहे.'मरणा' ऐवजी 'मॄत्यो 'या शब्दाने शेराचे वजन अधिक वाढते आहे .शेर आणखी खणखणीत झाल्यासारखा वाटतो.आपण यावर नक्कीच विचार करावा.चांगले ते घ्यावे.....

ये मी रचून आलो माझे सरण कधीचे
ये एकटाच मरणा नाही विरोध कसला

हा शेर खरेच काळजाला भिडला.आणि एका गझलेत लिहिलेला माझा -
पोचली तुझ्यापुढेच लाकडे
तू चितेवरी तुला रचून जा

हा शेरही मला आठवला.इथे तो फक्त रसस्वादासाठी देत आहे.जेणेकरून प्रत्येकाचे विचार(किंवा कल्पना)यातील साम्य भिन्नता कशी असू शकते हे दिसावे.मराठी,हिंदी,उर्दूत याहून अधिक चांगली उदाहरणे असतील.आपला तितका खरेच अभ्यासही नाही अन वाचनही.हाती होते ते दिले.मात्र दिलेले योग्यच होते याचा पत्ता नाही.कोणी याप्रकारची उदाहरणे सांगितल्यास मजा येईल.

कैलासजी,
सुचविलेला बदल छानच आहे. प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

भुषणजी,
कविता, व्यासपीठ, साहित्य इ. गोष्टी मला नव्या नाहीत. गझलेत मी नवाच आहे. मार्गदर्शन अपेक्षीत. प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

निलेशजी,
आपला शेर आवडला!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

वा मन जी,
धन्यवाद!

खालील शेर वादातीत आहे.
मला तरी तो आहे तसाच आवडला.

ये मी रचून आलो माझे सरण कधीचे
ये एकटाच मरणा नाही विरोध कसला

सुंदर शेर!
----------------------------------------------नचिकेत भिंगार्डे

शेवटचा शेर आवडला. बाकी द्विपदी फारशा कळल्या नाही. कृपया काही पॉइंटर्ज़ द्यावे. 'मयेची' हा शब्द वापरलेला आवडला.

काव्यरसिकजी,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

@चित्तरंजनजी,

रिमझिम सुरात धारा अवघा मळा बहरला
बांधावरी उतरल्या माझ्या अनंत गझला

बरसता पाउस पाहून मळा बहरून येतो. प्रत्येक सर्/थेंब एक गझल आहे
किंवा त्या पावसाच्या स्पर्शाने फुलून आलेलं गवताचं प्रत्येक पातं म्हणजे एक गझल आहे.

पाण्यात त्राण नाही विरले कधीच भवरे
हळव्या नदीत सांगा अपघात काय घडला?

आज काल ती तीतकीशी आनंदी दिसत नाही. आधिच ती हळवी त्यात एखादा अपघात तर घडला नाही ना?

अंधार शुभ्र झाला आभाळ सांडताना
भिजती धरा दिसेना, तो सुर्यही तरसला

नाहत्या धरणीला स्पष्टपणे पाहण्याची सुर्याची इच्छा पुर्ण होत नाही. कारण पाउस पडू लागला की डोळ्यासमोर दिसणारा रंग धवलच असतो पण पांढ र्‍या अंधारासारखा. त्याच्या पलिकडचं काहीच दिसत नाही.

चित्तरंजनजी,
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

शेवटचा शेर छान.

धन्यवाद, केदारजी.

रिमझिम सुरात धारा अवघा मळा बहरला
बांधावरी उतरल्या माझ्या अनंत गझला

सु॑दर...

धन्यवाद!

ये मी रचून आलो माझे सरण कधीचे
ये एकटाच मरणा नाही विरोध कसला
एकदम गझल-ष्टाईल!!!
आवडला..

आनंदयात्रीजी,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

ये मी रचून आलो माझे सरण कधीचे
ये एकटाच मरणा नाही विरोध कसला

बढिया !

अनिलजी,
धन्यवाद!