एकदा आहे तुला भेटायचे


एकदा आहे तुला भेटायचे
खूप काही राहिले बोलायचे


दूर असताना मला छळतात हे
नाव भासांचे तुला सांगायचे


हे पहाटेच्या दवाला सांग तू
आज स्पर्शाने तुझ्या उमलायचे


बासरीचे सूर तू छेडू नको
थांबणे माझे पुन्हा लांबायचे


कोणती भाषा तुझ्या डोळ्यात ही
पाश शब्दांचे कसे उधळायचे


दोन घटकेचीच होती साथ ती
का मला आजन्म तू अठवायचे


दूर जाता आसवे डोळ्यात का
हे तुला नाही कधी समजायचे


आठवांच्या कोंडमाऱ्यातून या
श्वास घेणे हे मला विसरायचे


एकदा मी ही असे खेळेन रे
जीवना आहे तुला हरवायचे


वाट आहे पाहते कोणी तुझी
हे तुला मरणा कसे उमजायचे


बोलवाया एकदा येईल तो
सोडुनी हा खेळ मागे जायचे


-विश्वास


गझल: 

प्रतिसाद

एकदा आहे तुला भेटायचे
खूप काही राहिले बोलायचे


हे पहाटेच्या दवाला सांग तू
आज स्पर्शाने तुझ्या उमलायचे


बासरीचे सूर तू छेडू नको
थांबणे माझे पुन्हा लांबायचे


दोन घटकेचीच होती साथ ती
का मला आजन्म तू अठवायचे


दूर जाता आसवे डोळ्यात का
हे तुला नाही कधी समजायचे


आठवांच्या कोंडमाऱ्यातून या
श्वास घेणे हे मला विसरायचे


वाट आहे पाहते कोणी तुझी
हे तुला मरणा कसे उमजायचे


बोलवाया एकदा येईल तो
सोडुनी हा खेळ मागे जायचे
सुंदर गझल... वरील सर्व शेर आवडले.
..........................................
दूर असताना मला छळतात हे
नाव भासांचे तुला सांगायचे
भासांचे असेल तर नावे पाहिजे....
बाकी उत्तम गझल ! लिहीत राहा...
 

दूर असताना मला छळतात हे
नाव भासांचे तुला सांगायचे
इथे तुला भासांची तक्रार करायची आहे का ...? तिच्याकडे...?
म्हणजे एखादा लहान मुलगा त्याच्या मित्राची आईकडे तक्रार करतो तशी....? तुझं नाव सांगतो मी माझ्या आईला....या धर्तीवर...?
पहिला प्रतिसाद पाठवल्यावर विचार केला असता हे लक्षात आले.....मी सुचवलेला बदल मग विसरून जा...पण डोक्याला फार ताण द्यावा लागतो... त्यानंतरच शेरातील सूक्ष्मपणा लक्षात येतो...

श्री. प्रदीप कुळकर्णी यांच्या प्रतिसादाला १००% अनुमोदन!

वा!छान!!शेर..
कोणती भाषा तुझ्या डोळ्यात ही
पाश शब्दांचे कसे उधळायचे
'वाट आहे पाहते कोणी तुझी'
इथे
'वाट कोणी पाहते आहे तुझी' असे केल्यास उत्तम.
चांगली गझल आहे.
लिहित रहा. :)
 
 
 
 
 

 

आदरणीय विसुनाना....
माझे आडनाव कुकर्णी आहे़, कुकर्णी नाही....

कुलकर्णी साहेब, टंकलेखनाच्या चुकीबद्दल माफ करावे. आणि 'आदरणीय' कशाला? नुसते विसु म्हटले तरी चालेल. :)

बासरीचे सूर तू छेडू नको
थांबणे माझे पुन्हा लांबायचे
लाजवाब...!
दोन घटकेचीच होती साथ ती
का मला आजन्म तू अठवायचे(??)

गझल एकदम आवडली

दव, मरणा आणि खेळ विशेष आवडले!
-- पुलस्ति.

वा. सुंदर ग़ज़ल! पहिल्या सात शेरांतील कल्पना आवडल्या.
हे तुला नाही कधी समजायचे
वा!

कोणती भाषा तुझ्या डोळ्यात ही?

पाश शब्दांचे कसे उधळायचे?
वा! गझल फार आवडली विश्वासराव.

झकास गझल. आवडली.
---अगस्ती

एकदा आहे तुला भेटायचे
खूप काही राहिले बोलायचे ...
छान !

अठवायचे चालून जाईल असे, वाटते. ´अठवण´ हा शब्द जुन्या मराठीत प्रचलित होता. ´आई तुझी मज अठवण येते´ हे गाणे आठवा.

गझल खूप आवडली. अभिनंदन आणि शुभेच्छा.
- चक्रपाणि जीवन चिटणीस

वा!!    गझल आवडली....
दोन घटकेचीच होती साथ ती
का मला आजन्म तू अठवायचे
कोणती भाषा तुझ्या डोळ्यात ही
पाश शब्दांचे कसे उधळायचे
हे शेर तर एकदम ंमस्तच.....

मतला  छान .बाकी  शेरही  ठीक  .

आठवांच्या कोंडमाऱ्यातून या
श्वास घेणे हे मला विसरायचे


एकदा मी ही असे खेळेन रे
जीवना आहे तुला हरवायचे


वाट आहे पाहते कोणी तुझी
हे तुला मरणा कसे उमजायचे
ंशेर आवडले ....मस्त रे मस्त