वाहलो मी

ओघळाया लागलो मी
फार नाही वाहलो मी

नग्न आहे या जगी मी
ना तरीही लाजलो मी

सत्य होते पोळ्णारे
स्वच्छतेने माखलो मी

दूरदेशी गाजलो मी
मायदेशी भाजलो मी

लग्न झाले काल तूझे
योग्य का, ना वाटलो मी

बातमी होतीच मोठी
फार नाही हाललो मी

गुंतलो मी बाहुपाशी
आज ना तो वाचलो मी

मोडलो आहे जरासा
जास्त नाही वाकलो मी

गझल: 

प्रतिसाद

ओघळाया लागलो मी
फार नाही वाहलो मी

सत्य होते पोळ्णारे
स्वच्छतेने माखलो मी

दोन्ही शेर छान आहेत.

ओघळाया लागलो मी
फार नाही वाहलो मी
.
बातमी होतीच मोठी
फार नाही हाललो मी
.
गुंतलो मी बाहुपाशी
आज ना तो वाचलो मी
.
मोडलो आहे जरासा
जास्त नाही वाकलो मी

आवडलेत. छान शेर.

ह.बा., गंगाधरजी प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.
ही गझल अनपेक्षितपणे कधी प्रकाशित झाली ते मलाही कळले नव्हते.
माझ्या अंदाजाप्रमाणे एक-दोन पाने पुढे गेली होती. तरी आपण ती वाचुन दाद दिलीत. खरोखरच एक सुखद धक्का. धन्यवाद.

अनिलजी... लहान बहर घेण्याचा विचार चांगला आहे... पण बहर अती लहान असला तरीही मजा जाते हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. (अनुभव वैयक्तिक आहे हे कृपया ध्यानात घ्यावे ही विनंती.)

बाकी गझल नेहमी प्रमाणे छान.

वा वा अनिल.... छोटा बहर पण कमाल करुन जातोय...

लग्न झाले काल तूझे
योग्य का, ना वाटलो मी

बातमी होतीच मोठी
फार नाही हाललो मी

हे दोन खासच.

डॉ.कैलास

बहरजी,
आपली सुचना महत्वपुर्ण आहे पण मी गझलक्षेत्रात नविन आहे आणि मला कवितेप्रमाणे गझलमधले सर्व प्रकार अभ्यासायची ईच्छा असल्यानेच छोटा बहर मी हाताळला आहे. छोट्या बहरात वृत्त चुकायची शक्यता कमी असल्याने हा प्रयत्न आहे. हा बहर अती लहान आहे हेही मला माहित नव्हते. आपल्यासारख्यांच्या प्रतिसादानेच नविन शिकायला मिळते. मनापासुन धन्यवाद.

कैलास,
आपला प्रतिसाद नेहमीच अभ्यासपुर्ण व प्रोत्साहन देणारा असतो.
आपल्या मार्गदर्शनानेच आता थोडेफार व्यवस्थित लिखाण होत आहे.
धन्यवाद.

हा बहर अती छोटा नव्हता. ह्याही पेक्षा लहान बहर हाताळले गेलेत. पण त्यात एकूणच व्याप कमी होतो गझलेचा असं माझं मत आहे.

( सर्वात 'लहान' 'बहर' मी आहे हे ही नमूद करतो जाता जाता!!) :)