चंद्र झालो

मी वाट चांदण्याची शोधीत चंद्र झालो
माझ्या कलाकलांना माळीत चंद्र झालो

कल्याण आळवीती ओल्या मधाळ राती
गंधार भाववेडा ऐकीत चंद्र झालो

खाणाखुणा तमाच्या शोधून सांगताना
शुक्रास मी ललाटी भाळीत चंद्र झालो

शब्दात झाकलेल्या अर्थास तेज देण्या
अंधार तेववोनी ऐटीत चंद्र झालो

होता सभोवताली बेधुंद रोषणाई
रंगीत चंद्र झालो, धुंदीत चंद्र झालो

रातीस पौर्णिमेच्या अंधार भोगणारी
पापी पिशाच्च प्रेते जाळीत चंद्र झालो

गझल: 

प्रतिसाद

होता सभोवताली बेधुंद रोषणाई
रंगीत चंद्र झालो, धुंदीत चंद्र झालो

छान. ढंगदार शेर.

वृत्तात लिहिणे खूप म्हणजे खूपच सोपे असते. पण आपण जे वृत्तबद्ध लिहितो, लिहू शकतो, त्यात वेगवेगळे अर्थ ओतण्याचे कामही आपलेच असते ! आपल्याशिवाय इतर कुणीही हे काम करू शकत नाही. (वाचणाऱयाला होणारी अर्थप्रतीती हे पुन्हा आणखी एक वेगळेच प्रकरण आहे...त्याविषयी नंतर कधीतरी...)
वरकरणी अगदी साधी-सोपी वाटणारी गझल अर्थाच्या दृष्टीने खूप ` भारी ` असू शकते, असायला हवी. तसे लिहिण्याचा प्रयत्न करा !
लिहिणे सोडू नका...! तुमच्या कवितेचा (अर्थात कवितेत गझल हीही आलीच) चंद्र उंच आकाशात नसून, तो तुमच्याच हातात आहे.

शुभेच्छा. पुढील गझलेच्या प्रतीक्षेत.

शब्दात झाकलेल्या अर्थास तेज देण्या
सुंदर ओळ..!

धन्यवाद!!