दिसू लागले स्पष्ट जेवढे

दिसू लागले स्पष्ट जेवढे स्पष्टपणाने धूसर झाले
ठार आंधळा झालो तेव्हा दृश्य खरे दृग्गोचर झाले

विचार करता-करता इतका लख्ख देखणा प्रकाश फुटला
सगळी पाटी कोरी झाली, सगळे शब्द निरक्षर झाले

गढूळलेल्या डबक्यामध्ये एक थेंब ओघळला खळकन
जितके जितके तरंग उठले त्याचे शांत सरोवर झाले

कणा वाकल्यावर तो शिकला विनायास कोलांट्या घेणे
आधी तो माणूसच होता, त्याचे माकड नंतर झाले

फूल, पाकळ्या, कळ्या, ऋतू, दवबिंदू, तारे, चंद्र वगैरे...
खूप पाहिली वाट तुझी मी, खूप खूप विषयांतर झाले

चुकली माझी वाट म्हणूनच मला मिळाले स्थान आपले
जोवर होता मार्ग बरोबर तोवर हाल भयंकर झाले

कधी अचानक फूल उमलले, कुठे विजेची रेघ उमटली
माझ्या साध्या ओळीचेही कसे कसे भाषांतर झाले

जुन्या घराच्या अंगणातल्या कडुनिंबाला म्हणेल वारा,
"तिथे तरी तो कुठे राहतो ज्या गावी त्याचे घर झाले"

तुला पाहिले आणि एकटक, एकसारखा बघत राहिलो
बघता-बघता माझे बघणे तुझ्याहूनही सुंदर झाले !

गझल: 

प्रतिसाद

अरे वा! खूप दिवसांनी...
संपूर्ण गझल आवडली. खणखणीत.
सगळेच शेर अत्युत्कृष्ट. कुठल्या एकाचा वेगळा उल्लेख करण्याची आवश्यकता नाही.
येऊ द्या अशाच गझला वारंवार.

छ्प्परफाडके गझल... अप्रतिमच आहे...

सध्या खूप आवडलेला शेर 'भाषांतर' आहे...
पुन्हा पुन्हा वाचून झाल्यावर बाकी सविस्तर प्रतिक्रिया नंतर

दिसू लागले स्पष्ट जेवढे स्पष्टपणाने धूसर झाले
ठार आंधळा झालो तेव्हा दृश्य खरे दृग्गोचर झाले

क्या बात है !! मस्त कल्पना...

विचार करता-करता इतका लख्ख देखणा प्रकाश फुटला
सगळी पाटी कोरी झाली, सगळे शब्द निरक्षर झाले

प्रकाश फुटणे..... व्वा !!

गढूळलेल्या डबक्यामध्ये एक थेंब ओघळला खळकन
जितके जितके तरंग उठले त्याचे शांत सरोवर झाले

थेंब ओघळला खळकन.... मजा देऊन गेला.

कणा वाकल्यावर तो शिकला विनायास कोलांट्या घेणे
आधी तो माणूसच होता, त्याचे माकड नंतर झाले

आशय सुंदर... पण यतिल '' विनायास'' खटकले....विनासायास्,विनाप्रयास वगैरे ठीक आहे...
अतिशय निर्दोष गझलेत '' विनायास '' नको होता असे वाटते.

फूल, पाकळ्या, कळ्या, ऋतू, दवबिंदू, तारे, चंद्र वगैरे...
खूप पाहिली वाट तुझी मी, खूप खूप विषयांतर झाले

चुकली माझी वाट म्हणूनच मला मिळाले स्थान आपले
जोवर होता मार्ग बरोबर तोवर हाल भयंकर झाले

कधी अचानक फूल उमलले, कुठे विजेचे रेघ उमटली
माझ्या साध्या ओळीचेही कसे कसे भाषांतर झाले

जुन्या घराच्या अंगणातल्या कडुनिंबाला म्हणेल वारा,
"तिथे तरी तो कुठे राहतो ज्या गावी त्याचे घर झाले"

हे शेर खूप सुंदर..

तुला पाहिले आणि एकटक, एकसारखा बघत राहिलो
बघता-बघता माझे बघणे तुझ्याहूनही सुंदर झाले !

हा शेर मला सगळ्यात जास्त आवडला.

डॉ.कैलास

आवडलेल्या जागा :

लख्ख देखणा प्रकाश फुटला

सगळे शब्द निरक्षर झाले

आवडलेला शेर :
गढूळलेल्या डबक्यामध्ये एक थेंब ओघळला खळकन
जितके जितके तरंग उठले त्याचे शांत सरोवर झाले

गझल उत्तमच!!!

भाषांतर व बघणे सुंदर आवडले. माकड व विषयांतर हे शेर आपण सादरही चांगलेच करता.

मला वाटायचे दृगोच्चर असा उच्चार असतो, खरा उच्चार माहीत नव्हता.

अभिनंदन!

अवांतर - मागे ऐकवलेला शेर आठवला. :-)

ये प्रिये आता तरी भेटायला तू
चित्तरंजनची गझलसुद्धा झळकली

प्रत्येक शेर वाचताना मजा आला.सुंदर गजल.

गढूळलेल्या डबक्यामध्ये एक थेंब ओघळला खळकन
जितके जितके तरंग उठले त्याचे शांत सरोवर झाले

कया कहेना !

चित्तरंजन,
गझल काय क्लास झाली आहे. एकेक शेर मोठ्याने म्हणून पाहिला! सुरेख. दर वेळी हा जास्त चांगला,तो चांगला असे सुरु आहे:)

चित्तूजी,
मस्त. भन्नाट. व्वा. क्या बात है. एकदमच छान.
आवडलेले शेर-
दिसू लागले स्पष्ट जेवढे स्पष्टपणाने धूसर झाले
ठार आंधळा झालो तेव्हा दृश्य खरे दृग्गोचर झाले

विचार करता-करता इतका लख्ख देखणा प्रकाश फुटला
सगळी पाटी कोरी झाली, सगळे शब्द निरक्षर झाले
- व्वा.

गढूळलेल्या डबक्यामध्ये एक थेंब ओघळला खळकन
जितके जितके तरंग उठले त्याचे शांत सरोवर झाले
.....

चुकली माझी वाट म्हणूनच मला मिळाले स्थान आपले
जोवर होता मार्ग बरोबर तोवर हाल भयंकर झाले
- खरं आहे.

कधी अचानक फूल उमलले, कुठे विजेचे रेघ उमटली
माझ्या साध्या ओळीचेही कसे कसे भाषांतर झाले
मस्त

जुन्या घराच्या अंगणातल्या कडुनिंबाला म्हणेल वारा,
"तिथे तरी तो कुठे राहतो ज्या गावी त्याचे घर झाले"

तुला पाहिले आणि एकटक, एकसारखा बघत राहिलो
बघता-बघता माझे बघणे तुझ्याहूनही सुंदर झाले !
व्वा व्वा.
मजा आला. रिफ्रेशिंग....

किती वाट पाहिली मी या गझलेची !

क्लास ! शब्दच नाहीत. एकूण एक शेर आवडला. मतलाही.
पण माझा सगळ्यात आवडता शेर- ..विषयांतर' 'हा आहे.
(खरं तर हा माझाच शेर.. तुम्हाला आधी सुचला, इतकेच ! :-)

चित्तरंजनची गझल असताना काय बोलायचं आणखी ?
हे असं लिहिता यायला पाहिजे.

सोनालीशी सहमत.
तूर्तास विषयांतर, भाषांतर हे सर्वात आवडलेले शेर....
काही दिवसांनी उरलेल्यापैकी काही आवडू शकतील, परत पहिले आवडतील आणि हे चालतच राहील...

चित्तरंजन,
तुझ्या गझला वाचताना गझलेचे, पर्यायाने जीवनाचे आकलन नव्या रीतीने होते हा माझा अनुभव आहे.

केदार तुमच्या मताशी अगदी सहमत. अजून थोड्या दिवसांनी शेरांचे नवे अर्थ उलगडतील. नवं काहीतरी सापडेल. काही शेरांचा अधिक खोल अर्थ सापडेल.... ये तो चलताही रहेगा...

संपूर्ण गझल अप्रतीम!

गझल वाचून जाणवतय की खूप आतला प्रवास चललाय.
हे परिवर्तन नाहिय हे खर असलं तरी वळण आहे नक्की.
आणि खूप सुखद वळण आहे..

हं.....
गझल तिहाईच्या डिसेंबरमधील आपल्या मुशायर्‍यात तुमची ही गझल ऐकली होतीच. त्यानंतर भरत नाट्यच्या मुशायर्‍यातही ऐकली होती. इथे बघून आनंद वाटला.

फूल, पाकळ्या, कळ्या, ऋतू, दवबिंदू, तारे, चंद्र वगैरे...
खूप पाहिली वाट तुझी मी, खूप खूप विषयांतर झाले
हं....
खूप खूप विषयांतर झाले = यावर वा वा! असे सहजच येईल.
पण सर्व शेर वाचला की तसे वाटत नाही.

चुकली माझी वाट म्हणूनच मला मिळाले स्थान आपले
जोवर होता मार्ग बरोबर तोवर हाल भयंकर झाले
१ली आणि २री दोनही ओळी सुरेख. दोनही ओळींचा अर्थ तसा एकच आहे, पण घटना दोन आहेत.

कधी अचानक फूल उमलले, कुठे विजेची रेघ उमटली
माझ्या साध्या ओळीचेही कसे कसे भाषांतर झाले
हा शेर मस्तच आहे. दुसरी ओळ तर अक्षरशः खरी!

तुला पाहिले आणि एकटक, एकसारखा बघत राहिलो
बघता-बघता माझे बघणे तुझ्याहूनही सुंदर झाले !
हा शेरही छान.

एकंदर छान.

आता लवकरच नव्या गझलेची नांदी होऊ देत.

शुभेच्छा !!

प्रदीप, मिल्या, सोनाली, डॉ. बेजकर, प्रणव, ह.बा आणि अनंताधन्यवाद.

बेफिकीर,
:) धन्यवाद. i write with fastidious difficulty.

डॉ. कैलास,
विनायास हा शब्द शब्दकोशात आहे. आणि सररास वापरला जातो, असे वाटते.
ज्ञानेश,
(खरं तर हा माझाच शेर.. तुम्हाला आधी सुचला, इतकेच ! :-)
काँप्लिमेंट आवडला.

मनीषा,
मनापासून धन्यवाद. बघू या. वळणाचे काही माहीत नाही.

अजय अनंत जोशी,
दिलखुलास प्रतिसादाबद्दल धन्यवाद. त्या कार्यक्रमानंतर त्यानंतर चार शेर नवे झाले. हेही नसे थोडके. एक महत्त्वाचे: त्या कार्यक्रमातल्या माझ्या ज्या काही गझला आहेत त्या यूट्यूबवरून लवकरात लवकर काढून टाकाव्यात.
धन्यवाद.

चार नवे शेरच काय! आपल्या गझलाही झालेल्या आहेत हे माहीत आहे. एक अतिशय चांगला शेर आठवतो.

(आपण प्रकाशित करण्याआधीच येथे देण्याबद्दल मनापासून क्षमस्व!)

नेहमीसारखे तुला भेटण्यासाठी
पावले कितीदा मागे वळली माझी

'दिसू लागले स्पष्ट जेवढे' ही निश्चीतच सुंदर गझल आहे. आपण प्रकाशित कमी करता हा भाग वेगळा असावा.

अवांतर लिहिल्याबद्दल दिलगीरी!

अप्रतिम गझल....
Hats off चित्तजी!
सध्यातरी विषयांतर चा शेरच ज्ज्ज्ज्जाम आवडलाय..
धन्यवाद!

चित्तरंजन,
त्या कार्यक्रमानंतर त्यानंतर चार शेर नवे झाले.
निश्चितच होणार. गझलाही झाल्या असतील. जर त्या पूर्ण झाल्या असतील तर आम्हालाही त्या ऐकणे अथवा वाचणे आवडेल.

केवळ वाचनातून आनंद घेणार्‍या सर्वांना ऐकायला आणि पहायला मिळावे म्हणून व्हिडीओज् यू ट्यूबवर ठेवले होते. आतापर्यंत शेकडो लोकांनी पाहिले असतील. (ते अपलोड करण्यासाठी किमान २४-२५ तास गेले असतील. असो. तो माझाच मूर्खपणा होता.)
तुमच्या विनंतीवरून तुमच्या यू ट्युबवरील गझला काढून टाकल्या आहेत. एखादी राहिली असल्यास पाहून कळवावे. माझ्या मते तीन होत्या, त्या काढल्या आहेत.
तसेच इतर कोणाला आणखी काही आक्षेप असल्यास त्यांनीही कळवावे.
धन्यवाद.

बेफिकीर बघू कधी पूर्ण होते ती गझल.
धन्यवाद आनंदयात्री.
धन्यवाद अजय अनंत जोशी.

अप्रतिम गझल! विषयांतरचा शेर वाचताना
"शफ़क, धनुक, महताब, घटाएं, तारे, नग्मे, बिजली, फूल
उस दामन में क्या क्या कुछ है, वो दामन हाथ में आये तो"

आठवला.

कणा वाकल्यावर तो शिकला विनायास कोलांट्या घेणे
आधी तो माणूसच होता, त्याचे माकड नंतर झाले

कधी अचानक फूल उमलले, कुठे विजेची रेघ उमटली
माझ्या साध्या ओळीचेही कसे कसे भाषांतर झाले

जुन्या घराच्या अंगणातल्या कडुनिंबाला म्हणेल वारा,
"तिथे तरी तो कुठे राहतो ज्या गावी त्याचे घर झाले"

हे तीन शेर भयानकच आवडले.
बाकीचेही उत्तम आहेत.

वारंवारता वाढावी.

किती सुंदर!!!
सगळे 'सव्वाशेर' वाटले, मोहुन गेलो अनुभवताना
माझ्या अन आनंदामधले कमी जरासे अंतर झाले ॥
धन्यवाद चित्तरंजन, इतकी सुंदर गझल दिल्याबद्दल.
वर बहुतेकांनी म्हटल्याप्रमाणे, तर तम निवड अशक्य आहे.
-सतीश

दिसू लागले स्पष्ट जेवढे स्पष्टपणाने धूसर झाले
ठार आंधळा झालो तेव्हा दृश्य खरे दृग्गोचर झाले

विचार करता-करता इतका लख्ख देखणा प्रकाश फुटला
सगळी पाटी कोरी झाली, सगळे शब्द निरक्षर झाले

फूल, पाकळ्या, कळ्या, ऋतू, दवबिंदू, तारे, चंद्र वगैरे...
खूप पाहिली वाट तुझी मी, खूप खूप विषयांतर झाले

चुकली माझी वाट म्हणूनच मला मिळाले स्थान आपले
जोवर होता मार्ग बरोबर तोवर हाल भयंकर झाले

कधी अचानक फूल उमलले, कुठे विजेची रेघ उमटली
माझ्या साध्या ओळीचेही कसे कसे भाषांतर झाले

जुन्या घराच्या अंगणातल्या कडुनिंबाला म्हणेल वारा,
"तिथे तरी तो कुठे राहतो ज्या गावी त्याचे घर झाले"

तुला पाहिले आणि एकटक, एकसारखा बघत राहिलो
बघता-बघता माझे बघणे तुझ्याहूनही सुंदर झाले !

सगळेच शेर आवडले, पण ठळक केलेले विशेष.....

क्रान्ति, विसुनाना, सतीश, जनार्दन मनापासून आभारी आहे. विसुनाना, वारंवारिता वाढायला हवी हे खरे. बघू.

सुन्दर!!!

@ अभिजीत कुलकर्णी,

आपण म्हणता ते योग्यच आहे.पण अत्यंत सुंदर आणि निर्दोष गझलेत मला विनायास खटकले आणि मी ते प्रामाणिकपणे मांडले...... नो पर्सनल ऑफेन्स....

डॉ.कैलास

चित्तरंजन... आपण वारंवारीते बद्दल बोलला होतात!! आम्ही पुढील गझलेची वाट पहात आहोत!!

सुंदर गझल!

फूल, पाकळ्या... आणि कधी अचानक फूल उमलले....हे शेर खुप आवडले.

अप्रतिम गझल....!!!

चुकली माझी वाट म्हणूनच मला मिळाले स्थान आपले
जोवर होता मार्ग बरोबर तोवर हाल भयंकर झाले

कधी अचानक फूल उमलले, कुठे विजेची रेघ उमटली
माझ्या साध्या ओळीचेही कसे कसे भाषांतर झाले

जबरदस्त आहे.खूपच मोहक!