हा जुगार

खेळणार आज हा जुगार मी
मांडणार वेगळा विचार मी

पाय वाजले जसे तुझे तिथे
ठेवले खुलेच एक दार मी

बोट लागता नवे शहारते
वाजवू कशी तुझी सतार मी

नवल काय जर कुणा न समजलो
एक खूप वेगळा प्रकार मी

पुसट आकृती मला न भावते
ठसठशीत चित्र काढणार मी

गझल: 

प्रतिसाद

सतार हा शेर फारच सुंदर! नेहमीसारखीच स्वच्छ, लालित्यपूर्ण, साध्या शब्दांची व नजाकतदार गझल!

खेळणार आज हा जुगार मी
मांडणार वेगळा विचार मी

व्वा !! वेगळा विचार हा जुगारच झालाय....अगदी समर्पक.

डॉ.कैलास

बोट लागता नवे शहारते
वाजवू कशी तुझी सतार मी

वावा! मस्त!

चित्तरंजनशी सहमत.

सहज... सुंदर!

अग्दी सहज उतरलेली गझल.....

प्रकार वरून सानेकरांचा एक शेर आठवला....
कधी वाचून बघ, समजेनही मी
तसा दुर्बोध मी मजकूर नाही!!

विचारांमध्ये कशी भिन्नता येत जाते व्यक्तीगणिक... :-)

खेळणार आज हा जुगार मी
मांडणार वेगळा विचार मी
- वा. छान.

बोट लागता नवे शहारते
वाजवू कशी तुझी सतार मी

- सुंदर...

नवल काय जर कुणा न समजलो
एक खूप वेगळा प्रकार मी

- वेगळा विचार ! पण शेर अधिक सौष्ठवपूर्ण, उच्चारणसुलभ करता आला
असता / करता येईल..(वरची ओळ)

पुसट आकृती मला न भावते
ठसठशीत चित्र काढणार मी

- ठसठशीत शेर !

केदार,
मस्त आवडली गझल स्पेशली.
हे शेर-

बोट लागता नवे शहारते
वाजवू कशी तुझी सतार मी

नवल काय जर कुणा न समजलो
एक खूप वेगळा प्रकार मी - तर मस्तच. वेगळा विचार. पटला व भावला.

पुसट आकृती मला न भावते
ठसठशीत चित्र काढणार मी

मस्तच.
व्वा........

बोट लागता नवे... शहारते
वाजवू कशी तुझी सतार मी >>> हा शेर असा वाचला :)

मस्त शेर... मतला पण आवडला

सतार स्पष्ट होत नाही. शहारते आणि सतार यात अंतर फार झाले आहे. त्यामुळे शहारणे सतारीला उद्देशून आहे हे लगेच स्पष्ट होत नाही आहे.
बाकी ठीक.

अवांतर : फक्त तुमच्यासाठी (गझलेसाठी नाही..:)) काही लोक येतात ही जमेची बाजू.

गझल दुसऱ्यांदा वाचली. चांगलीच ठसठशीत झाली आहे.
अवांतर: अजय अनंत जोशी, असल्या अवांतराची गरज नाही. दुसऱ्यांना दुखावू शकणाऱ्या असल्या अवांतरांसाठी व्यक्तिगत निरोपाच्या सुविधेचा वापर केल्यास आवडेल.

धन्यवाद प्रतिसादांबदद्ल.

नवल काय..हा शेर असा करुन पाहिला.

जाणले कुणी मला न आजही
एक खूप वेगळा प्रकार मी