पाय ओढायला जडतात ती!

साठवा आसवे सडतात ती
प्यायला स्वस्तही पडतात ती!

पाखरांची घरे जळल्यावरी
पाहिले का कशी रडतात ती?

मी कुठे मांजरे कुरवाळली,
नेहमी माणसे नडतात ती?

टाळ तू मैफिली... व्यसनेच ती
पाय ओढायला जडतात ती

ठेवली लेकरे कवळून जी
का मला पाहुनी दडतात ती?

गझल: 

प्रतिसाद

छान गझल....

ठेवली लेकरे कवळून जी
का मला पाहुनी दडतात ती?

यातिल '' कवळून '' हा शब्दही बोली भाषेतील वाटतो.

डॉ.कैलास

कैलासजी
मी कराड तालुक्यातल्या एका १२०० लोकसंख्येच्या खेड्यातून आहे. २० वर्षे जी भाषा बोललो ती विसरणे शक्य नाही.
शंका: असे शब्द गझलेत येणे योग्य की अयोग्य?

कवळून = कवटाळून हे लक्षात येतेय.... पण सगळ्यांच्या येइलच असे नाही....प्रचलित असलेला बोली भाषेतील शब्द घेतला तर चालेल.... पण आपला शब्दसंग्रह पहाता.... आपल्याला कुठे अडचण येइल असे वाटत नाही.

डॉ.कैलास

कवळणे हे क्रियापद अतिशय प्रचलित आहे.

पाठमोरा मी जरी झालो,तरीही
सूर्य येणारे मला कवळून गेले!
-- कविवर्य सुरेश भट

धन्यवाद!
कैलासजी
धन्यवाद!
चित्तरंजनजी

@कैलासः कवीने कोणता शब्द वापरावा हा सर्वस्वी त्याचा निर्णय आहे. तेव्हा कोणीही त्याला ते सांगू नये. दुसरी गोष्ट कवळून हे क्रियापद चांगलेच प्रचलित आहे. त्यामुळे आपण आपली शब्दसंपत्ती वाढवावी तसेच नवे शब्द (बोलीभाषेतले असो किंवा कोणतेही) यायला नकोत का. मराठी कविता बंदिस्त करायची आहे का... तर अजिबात नाही.

प्रिय हबा,
आपण आपल्या बोलीभाषेतले शब्द बिनधास्त वापरा. म्हणजे ते आम्हालाही कळतील. भाषेचा पर्यायाने कवितेचा विकास असाच होईल. ज्या भाषेत तुम्ही अर्ध आयुष्य घालवलं ती भाषा वापरू नये असं म्हणण्याचा अधिकार कोणालाच नाही.
या गझलेबाबत म्हणाल तर अजून ब-याच गोष्टी करता येतील. पण त्या तुमच्याच तुम्हाला शोधाव्या लागतील. तेव्हा शोध सुरू ठेवा... शुभेच्छा.

प्रणव.प्रि.प्र जी
शोध सुरूच आहे... व्याकरणाचा सराव होइपर्यंत कमी अधीक होऊ शकते. कैलासजी सातत्याने मार्गदर्शन करत आहेत. आपला सल्लाही मोलाचा आहे. लक्ष ठेवा.

मी कुठे मांजरे कुरवाळली,
नेहमी माणसे नडतात ती?
वा वा! एकदम लागू.

अवांतर :
माकड, कुत्रे, ससे, कासवांबरोबर मांजरालाही गझलेत स्थान मिळते आहे. सर्व जीव सारखेच आहेत.

अवांतर :
माकड, कुत्रे, ससे, कासवांबरोबर मांजरालाही गझलेत स्थान मिळते आहे. सर्व जीव सारखेच आहेत.

असेच प्रतिसाद देत रहीलात तर काही दिवसानी माकड, कुत्रे, ससे, कासव, मांजराबरोबर अजयलाही गझलेत स्थान मिळते आहे असा प्रतिसाद वाचायला मिळेल.

राम क्रुष्ण हरी!!!

ह बा,
उत्साहात लिहिताना जरा विचार करून लिहा. मी जे लिहिले त्याचा अर्थ तुम्हाला निश्चितच समजला नाही. मला तुम्हाला स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता अजिबात नाही. मात्र तुम्ही दिलेल्या प्रतिसादावर 'काहींना' फार मजा (की आनंद?) आली असेल हे नक्की. पुढे त्याही सर्वांची नावे घालायला विसरू नका.....:)

असेच प्रतिसाद देत रहीलात तर काही दिवसानी माकड, कुत्रे, ससे, कासव, मांजराबरोबर अजयलाही गझलेत स्थान मिळते आहे असा प्रतिसाद वाचायला मिळेल.

राम क्रुष्ण हरी!!!



ह बा......
मी आपल्या प्रतिसादाचा निषेध करतो....

(हे राम.)

डॉ.कैलास

ह बा,

लेकरे हा शेर आवडला.

आपण अजय जोशी यांना दिलेला प्रतिसाद पाहून तीव्र आश्चर्य अन खेद वाटला.

तसेच, आपण अनंत ढवळे यांच्याही नावावरून काहीतरी हीन विनोद करायचा प्रयत्न केला होतात.

(मी का बोलत आहे हे विचारायचे असल्यास नुसतेच हे दोघे मित्र आहेत असे नाही तर आपले दोन्ही प्रतिसाद अत्यंत तिरस्करणीय आहेत).

कैलास यांच्याप्रमाणे मीही माझे मत नोंदवले.

ह बा,
उत्साहात लिहिताना जरा विचार करून लिहा. मी जे लिहिले त्याचा अर्थ तुम्हाला निश्चितच समजला नाही. मला तुम्हाला स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता अजिबात नाही. मात्र तुम्ही दिलेल्या प्रतिसादावर 'काहींना' फार मजा (की आनंद?) आली असेल हे नक्की. पुढे त्याही सर्वांची नावे घालायला विसरू नका.....:)
@ अजयजी
जर मला तो अ र्थ कळला नसेल व माझा प्रतिसाद चुकिचा असेल तर मी त्याबद्दल दीलगीर आहे. अजयजी मी या संकेत स्थळावरच्या एकाही माणसाला भेटलेलो नाही. कुणाला मजा आली असेल कुणा मित्राला वाइट वाटले असेल ते मी जाणत नाही. मला कुणाशी विनाकारण भांडणे आजिबात आवडत नाही. आपण नेहमी विनोदी प्रतिक्रीया देता म्हणून मी ही थोडी आगळीक केली पण थोडी जास्तच झाली. राग मनात ठेऊ नये ही विनंती.

@ बेफिकीर
(मी का बोलत आहे हे विचारायचे असल्यास नुसतेच हे दोघे मित्र आहेत असे नाही तर आपले दोन्ही प्रतिसाद अत्यंत तिरस्करणीय आहेत).
माझ्या मते ते फक्त बोचरे विनोद आहेत. पण ज्या वाक्यांनंतर हे प्रतिसाद दिले गेले ती जर ग्राह्यच धरली नाहीत तर माझा प्रतिसाद अत्यंत तिरस्करणीयच वाटेल.
गझले विषयी च्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

@कैलासजी
ह बा......
मी आपल्या प्रतिसादाचा निषेध करतो....

काही अधिक झाले असल्यास समजून घ्या.
राम क्रुष्ण हरी!!!

सगळ्यांसाठी
प्रतिसाद देताना तारतम्य बाळगावे, ही विनंती. हे संकेतस्थळ सुरेश भट यांच्या नावाने चालविले जाते, याचा विसर कुणीही पडू देऊ नये. ह्या संकेतस्थळावर शोभतील असेच प्रतिसाद द्यावेत. वाद जरूर घालावेत.पण गझल चारी बाजूंनी बहरून येण्यास मदत होईल, असेच ते असावेत.कोणत्याही कवीला व्यक्तिगतरीत्या कुणीही, कधीही लक्ष्य करू नये. गझल हा काव्यप्रकार अधिकाधिक सशक्त, सुदृढ व्हावा, यासाठी आहे त्या ठिकाणाहून चार पावले पुढे नेण्यासाठी प्रतिसादांचा उपयोग व्हावा, असा उद्देश मनात ठेवूनच प्रतिसाद द्यावेत.

@ प्रणव.प्रि.

@कैलासः कवीने कोणता शब्द वापरावा हा सर्वस्वी त्याचा निर्णय आहे. तेव्हा कोणीही त्याला ते सांगू नये.
ह.बा. ने कोणता शब्द वापरावा हे मी अजिबात सांगितले नाही...

दुसरी गोष्ट कवळून हे क्रियापद चांगलेच प्रचलित आहे. त्यामुळे आपण आपली शब्दसंपत्ती वाढवावी.
कवळून हे क्रियापद प्रचलित आहे मान्य ..... चांगलेच प्रचलित आहे हे साफ चूक आहे. ( मराठी,वारली,कातकरी,काथोडी,आदिवासी,भिल्ल्,आगरी,ठाणे जिल्ह्यामधील कुणबी,भोई... या समाजा मधील व प्राचीन्/आधुनिक मराठी भाषेतील प्रचलित बोली भाषे वरील प्रबंध सादर करुन पुणे विद्यापीठाची डॉक्टरेट मी मिळविली आहे... तसा मी एम.बी.बी.एस. डॉक्टर आहेच )
मी या भाषेतिल शब्द वापरून गझल केली तर प्रणव .... कुणालाच कळणार नाही. असो ......हे नमूद करुन मी खूप शहाणा आहे असे काही मला सांगायचे नाही आहे.... तसेच दुसरा/समोरचा हीन्/मूर्ख आहे असाही उद्देश नाहिये....
पण आपल्या वाक्यामुळे '' माझी शब्द संपत्ती मर्यादित आहे '' असा सरळ अर्थ निघत आहे.अर्थात माझ्या शब्दसंपत्तीच्या सम्रूद्धि/मर्यादेबाबत पुणे विद्यापीठाची डॉक्टरेट पुरेशी आहे.

तसेच नवे शब्द (बोलीभाषेतले असो किंवा कोणतेही) यायला नकोत का. मराठी कविता बंदिस्त करायची आहे का... तर अजिबात नाही.

याविषयी अजिबात दुमत नाही......

ह.बा. हे नुकतेच गझल लिहू लागले आहेत ... सुरुवातीस दोष मुक्त गझल व्हावी या दृष्टिने मी जमेल तेवढे सौम्य भाषेत मार्गदर्शन करत आहे..... ''कवळणे'' सारखे कमी प्रचलित शब्द न वापरून गझल अधिक ऊठावदार व्हावी म्हणून मी त्यांस प्रतिसाद दिला....तर त्यावर तुम्हि माझी शब्द भांडाराबाबत अक्कल काढाल हे अपेक्षित नव्हते... असो !

डॉ.कैलास

विश्वस्त व कैलास यांच्या अंतीम प्रतिसादांशी सहमत!

आगरी भाषेत
कवळणे = गोळा करणे

हे सहजच आठवलं

डॉ.कैलास

कैलासजी
कितीही वाद झाले तरी आपण मार्गदर्शन करणे बंद करू नये ही कळकळीची विनंती.

ह बा.
आपण चांगले लिहित आहात.....
माझ्याहून खूप चांगले मार्गदर्शक इथे आहेत.....मी तर फक्त ४/५ महिन्यांपासुन गझल लेखन करत आहे.....
चित्तरंजन्,अजय जोशी,ज्ञानेश्,बेफिकिर्,अनंत ढवळे,मिल्या,संगीता जोशी,क्रांति,.........आणी असे खूप चांगले गझलकार
इथे आहेत.... आपणांस... अन मलाही ते वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात.....माझ्यापरीने शक्य तेवढे मी आपणांस सांगेनच....त्यासाठी आपण विनंती वगैरे नका हो करु...

डॉ.कैलास

कैलासः
तुमची अक्कल काढण्याचा प्रश्नच नव्हता. मी कोणाची कशाला अक्कल काढू व मला तसा अधिकार तरी काय. असो. तुमचा प्रतिसाद वाचल्यावर जे प्रामाणिकपणे वाटले. ते मांडले. खूप शांतपणे दिलेली ती प्रतिक्रिया असून त्यात कोणालाही दुखावण्याचा प्रश्नच नव्हता. तुम्हाला तुमचे मत मांडण्याचा अधिकार आहेच. तेव्हा तो मांडावा. त्याचा नेहमीच आदर करायला हवाच मग ते मत पटो व न पटो. तेव्हा ती प्रतिक्रिया आदरपूर्वक दिलेली आहे. चर्चेच्या उद्देशातून. वैयक्तिक उद्देशातून नव्हे. असो.
यामध्ये गझलेबाबत चर्चा थोडी मागे पडतेय. तेव्हा असो...

ऑल राइट, लिखते रहेंगे मिलते रहेंगे.

२१ प्रतिसादांपैकी फक्त तीन माझ्या गझले विषयी आहेत. भलतीच दर्जेदार झालेली दिसतीये.
असो मान्यवरानी पामराच्या गझलेखाली चालवलेला सत्कार समारंभ आटोपता घ्यावा.
सर्वाना गझल लेखनास सदिच्छा!
पुंडलीकवरदे हरी विठ्ठल... श्री ज्ञान देव तुका$$$$$$राम!!!
राम क्रुष्ण हरी!!!

@ प्रणव

त्यामुळे आपण आपली शब्दसंपत्ती वाढवावी

हा प्रतिसाद देवून कोणती चर्चा आपणांस अपेक्षित आहे....?
ह्या प्रतिसादाने गझलवर चर्चा घडणे शक्य आहे का?
ह्या प्रतिसादाने कुणी न दुखावणे शक्य आहे का?
हा प्रतिसाद म्हणजे माझी अक्कल काढणेच आहे... त्यात दुसरी कोणती गोष्ट नाही हे स्पष्ट आहे.

तुमची अक्कल काढण्याचा प्रश्नच नव्हता. मी कोणाची कशाला अक्कल काढू व मला तसा अधिकार तरी काय.

हे आपण बोलत आहात पण त्यामुळे आपण आपली शब्दसंपत्ती वाढवावी हे आधीच बोलून माझी अक्कल काढून झालिय त्याचे काय?

असो !!

डॉ.कैलास

मला "कवळणे" या शब्दा बद्दल ह्.बा. आपले अभिनंदन करावेसे वाटते !
मराठी भाषा समृध्द करावयाची असेल तर परकीय भाषेतील शब्दापेक्षा ग्रामिण बोली भाषेतील शब्दांचा वापर करणे काही गैर नाही असे मला वाटते ! इंग्राजळलेल्या शब्दापेक्षा मराठी ग्रमिण शब्द ,बोली भाषा ,प्राचीन मराठी भाषेतील शब्द वापरणे केव्हाही चांगले
(माझ्या एका भक्तीगीता मध्ये 'देखीला ' या शब्दाऐवजी 'पाहीला' हा शब्द वापरा असा मान्यवर गायकाचा आग्रह होता मी तो नम्रपणे नाकारला होता. त्या बद्दल गायकांनी कोणताही राग धरला नाही व मोकळेपणाने गाण्याचे ध्वनिमुद्रण केले)
प्रशान्त वेळापुरे

मला "कवळणे" या शब्दा बद्दल ह्.बा. आपले अभिनंदन करावेसे वाटते!
प्रशान्तजी .... धन्यवाद!

या निमित्ताने विविध ग्रामीण किंवा विशिष्ट मराठी प्रांतातील शब्द व त्यांचा अर्थ असा एक धागा विश्वस्तांनी कृपया सुरू करावा व गझलकार, रसिक यांनी त्यात नवनवे शब्द व त्यांचे अर्थ समाविष्ट करावेत अशी विनंती! योग्य वाटत असल्यास 'गझलचर्चा' या सदरात मीही तो धागा स्वतःच सुरू करण्याचा प्रयत्न करेन.

कवळून हा शब्दच मला माहीत नव्हता. पण त्या शेरात तो फार सुरेख बसला व अर्थ जाणवण्याइतका स्पष्ट झाला.

धन्यवाद!

कुणबी भाषेत

कारा = पाठलाग

आगरी भाषेत

पाकल = पाठलाग

हे दोन वानगीदाखल देत आहे..... विविध ग्रामीण भागातील अर्थ दिल्यास मोठाच शब्दकोष बनेल.... पण हो... असा धागा सुरु झाल्यास खूप उपयुक्त ठरेल.

डॉ.कैलास