दूरचा किनारा

करण्यास पार क्षितिजे पाउल मी उचलले
रस्ते निघून गेले, मागे मला विसरले

भर श्रावणात जेव्हा दुष्काळ पाहिला मी
या भूतलास माझ्या अश्रूंत मी भिजवले

येणार ना कधीही माझा वसंत आता
बागांमध्ये फुलांच्या वणवेच मी उठवले

स्मरलो तुलाच जेव्हा मी वेदानांत माझ्या
ते दुःख रोज ताज्या जखमांत मी भुलवले

गाठायला निघालो तो दूरचा किनारा
पण शीड मात्र माझे वा-यासवेच वळले!

सांगू तुला न शकलो मी गूज या मनीचे
काळीज शब्द बनले, कवितांमध्ये उतरले!

- योगेश्वर रच्चा

गझल: 

प्रतिसाद

गाठायला निघालो तो दूरचा किनारा
पण शीड मात्र माझे वा-यासवेच वळले

व्वा... हा शेर आवडला.

डॉ.कैलास

करण्यास पार क्षितिजे पाउल मी उचलले
रस्ते निघून गेले, मागे मला विसरले

गाठायला निघालो तो दूरचा किनारा
पण शीड मात्र माझे वा-यासवेच वळले!

दोन्ही शेर उत्तम!