व्यर्थ


इथे जीवनाचे दिवाणे हजारो
अधाशी मनाचे बहाणे हजारो


कवीच्याच माथी अशी रेष वेडी
जिला वाचणारे शहाणे हजारो


तुझे ओठ पोरी किती लाल झाले!
कधी चुंबिले तू उखाणे हजारो?


पुन्हा हात माझाच धरलास का तू?
मला लोक पुसती घराणे हजारो


उगा माणसांची नको खूण शोधू
गवसतील पत्थर पुराणे हजारो


जरी हुंदक्यांनी कुचेष्टाच केली
तरी गायले मी तराणे हजारो


नसे एकटा मी जगी एकटा जो
असावेत माझ्याप्रमाणे हजारो


उपाशीच तुटल्यावरी चोच माझी
कुणी टाकले व्यर्थ दाणे हजारो?

 


गझल: 

प्रतिसाद

कवीच्याच माथी अशी रेष वेडी
जिला वाचणारे शहाणे हजारो
फार आवडला हा शेर. मक्ताही. 'उखाणे'ही. 'पुराणे'ही. घराणेचा शेर मला थोडा पुसटसा वाटतो.पण छान. 'माझ्याप्रमाणे' नेहमीचा असला तरी सफाईदार लहजा आवडला. एकंदर गझल फार आवडली.

मस्त गझल! फार आवडली.

उपाशीच तुटल्यावरी चोच माझी
कुणी टाकले व्यर्थ दाणे हजारो?

हा शेर फार आवडला. छान जमलीय गझल...
 

कवीच्याच माथी अशी रेष वेडी
जिला वाचणारे शहाणे हजारो

खूपच छान...

नसे एकटा मी जगी एकटा जो
असावेत माझ्याप्रमाणे हजारो

अप्रतिम...

उपाशीच तुटल्यावरी चोच माझी
कुणी टाकले व्यर्थ दाणे हजारो?

सुंदर

आभाळ, हे शेर खूप आवडले...झकास....

आपल्या गझललेखनाला शुभेच्छा...पुढचीही गझल येऊ द्या लवकरच...!

नसे एकटा मी जगी एकटा जो
असावेत माझ्याप्रमाणे हजारो

या शेराच्या पहिल्या ओळीवरून मला  एक ओळ सुचली....सहज गंमत म्हणून...एकटा या शब्दावर श्लेष करणारी.....

जगी एकटा, एकटा मीच नाही...!
असावेत माझ्याप्रमाणे हजारो !

१)  तू असा एकटा-एकटा का राहतोस ?

२) जगाच तूच एकटा, एकटा नाहीस (बाकीचेही आहेत !)

३) तू तेवढा एकटा शहाणा आणि बाकीचे...?

या तिन्ही वाक्यांत एकटा हा शब्द वेगवेगळय़ा अर्थांनी येतो....असे काहीसे आपला शेर वाचून मला सुचून गेले... आपला शेर खूपच छान....!वाचणाऱयाच्या मनात अर्थांचे तरंग उमटवणारा...

सर्वांचेच धन्यवाद...
प्रदीप..तुम्ही पकडलेल्या 'एकटेपणाच्या छटा' छान.
-आपले आभाळ :)
 

आभाळा, ग़ज़ल सुंदर आहे.
कवीच्याच माथी अशी रेष वेडी
जिला वाचणारे शहाणे हजारो
छानच.
तुझे ओठ पोरी किती लाल झाले!
कधी चुंबिले तू उखाणे हजारो?
सुंदर.
उगा माणसांची नको खूण शोधू
गवसतील पत्थर पुराणे हजारो
छान.
जरी हुंदक्यांनी कुचेष्टाच केली
तरी गायले मी तराणे हजारो
छान.
नसे एकटा मी जगी एकटा जो
असावेत माझ्याप्रमाणे हजारो
वा वा. वेगवेगळे अर्थ आवडले. त्यापैकी एक I am unique, just like everyone else हाही आठवला.
उपाशीच तुटल्यावरी चोच माझी
कुणी टाकले व्यर्थ दाणे हजारो?
मी उपाशी, चो़च़ नव्हे एवढी अडचण सोडली तर बाकीचा़ शेर आवडला.

 नवीन रदीफ ब-याचदा नवीन काही सुचवून जातो.
गझल वाचताना मजा आली.
धन्यवाद.  

फारच छान गझल आभाळा!
कवी आणि एकटा विशेष आवडले!!
-- पुलस्ति.

वा. चांगली झालेय गझल.
आपला,
(संतुष्ट) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com