मराठी गझल

(आदरणीय सुरेश भटांच्या जयंतीनिमित्त.....)

मराठी गझलही पुढे येत आहे
मराठीसही ती पुढे नेत आहे

व्यथांनी करावी मशागत मनाची...
अशा आशयाचे तिचे शेत आहे

निराकार निर्गुण अशा वेदनेचा
तिचा शब्द एकेक संकेत आहे

जगाया पुरेशी तिची प्रेरणाही
तिचा श्वास आश्वासने देत आहे

तिच्या लौकिकाचा करी दिव्य हेवा
यशाची कथा ह्या असूयेत आहे

तिचा भाव अभिजात लज्जेप्रमाणे...
तिचे सत्य सौंदर्य लज्जेत आहे

नशा व्यक्त होण्यातल्या भावनेची
सुराहीतुनी मी तिच्या घेत आहे

(दिली देणगी ही मराठीस ज्याने
'सुरेशा'स त्या ती दुवा देत आहे)

-प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी, उदगीर

गझल: 

प्रतिसाद

क्या बात है !!!!
भटसाहेबांचे योगदान अन मराठी भाषेला त्रिवार प्रणाम.

डॉ.कैलास

मस्त.

खुप मस्त