सध्या!

प्रश्न जगाला, काय काय मी करतो सध्या...
पतंगापरी हवेत मीही उडतो सध्या!

जन म्हणती हे' "शिंगे फुटली तुजला बेट्या"..
आरशातही पाहण्यास मी डरतो सध्या!

दुकानांवरी पुन्हा मराठी दिसती पाट्या
मराठीसही 'भाव' पुरेसा मिळतो सध्या!

फूलपाखरी जिणे जाहले नकोनकोसे
सुगंधातही जीव किती घुसमटतो सध्या..!

तुझ्या आठवांचे कोळिष्टक अवतीभवती..
सुटू पाहतो तसा त्यात गुरफटतो सध्या!

मोठे मिळता अंथरूण, पसरेल पाय तो
पथारीवरी छोट्या जे आक्रसतो सध्या!

बरसायाला हवी तशी जागाच मिळेना..
भरून येतो..पुन्हा पुन्हा ओसरतो सध्या!

अर्ध्या हळकुंडाने तेव्हा पिवळा झालो..
आशयघन शब्दांना शोधत फिरतो सध्या!

मानेवरती पेलुनिया जू भवितव्याचे
आयुष्याची जमीन नांगरतो सध्या!

गझल: 

प्रतिसाद

फूलपाखरी जिणे जाहले नकोनकोसे
सुगंधातही जीव किती घुसमटतो सध्या..!
व्वा!
तुझ्या आठवांचे कोळिष्टक अवतीभवती..
सुटू पाहतो तसा त्यात गुरफटतो सध्या!
व्वा!

मोठे मिळता अंथरूण, पसरेल पाय तो
पथारीवरी छोट्या जे आक्रसतो सध्या!
टिकात्मक..

मानेवरती पेलुनिया जू भवितव्याचे
आयुष्याची जमीन नांगरतो सध्या! ..... एक गा राहिला आहे. बहुधा 'मी' राहिला असावा.

एकंदर छान..!

आवडली.

वा वा! सुंदरच गझल अमोघराव!

सगळेच शेर आवडले. अभिनंदन!

(आयुष्याची जमीन 'मी' नांगरतो सध्या - असे हवे होते का?)

गझल फार आवडली. मुख्य म्हणजे आता बहुतेक सगळ्या गझला उत्तमोत्तम येत आहेत.

अभिनंदन!

अहाहा !!!!
फार छान....सगळेच शेर मस्त झालेत.धन्यवाद.

डॉ.कैलास

गझल आवडली.

व्वा वा.
सुंदर गझल.

फूलपाखरी जिणे जाहले नकोनकोसे
सुगंधातही जीव किती घुसमटतो सध्या..!

तुझ्या आठवांचे कोळिष्टक अवतीभवती..
सुटू पाहतो तसा त्यात गुरफटतो सध्या!

बरसायाला हवी तशी जागाच मिळेना..
भरून येतो..पुन्हा पुन्हा ओसरतो सध्या!

अर्ध्या हळकुंडाने तेव्हा पिवळा झालो..
आशयघन शब्दांना शोधत फिरतो सध्या!

मानेवरती पेलुनिया जू भवितव्याचे
आयुष्याची जमीन नांगरतो सध्या!

हे सर्व शेर उत्तम आहेत.
अभिनंदन.

तुझ्या आठवांचे कोळिष्टक अवतीभवती..
सुटू पाहतो तसा त्यात गुरफटतो सध्या!

वा:! सुंदर!

मस्त गझल!

सुंदर गझल...
काही काही सुटे मिसरे मस्त जमून आले आहेत..
उदा.
सुगंधातही जीव किती घुसमटतो सध्या..!,
सुटू पाहतो तसा त्यात गुरफटतो सध्या!
इ.

फुलपाखरू व अर्ध्या हळकुंडाचा शेर खास.
छानच.

खुप आवडली. नांगरतो आवडले.

सर्वांना धन्यवाद!
विश्वस्तांना विनंती आहे, शक्य झाल्यास शेवटची ओळ एडिट करावी..नजरचुकीने 'मी' राहून गेला आहे.
आयुष्याची जमीन मी नांगरतो सध्या! असे करावे.

मधुघट..
उत्तम गझल... माझ्याम्ते तुमची आत्तापर्यंतची सगळ्यात चांगली गझल...

बहुतेक सर्व शेर आवडले..

फूलपाखरी जिणे जाहले नकोनकोसे
सुगंधातही जीव किती घुसमटतो सध्या..!

तुझ्या आठवांचे कोळिष्टक अवतीभवती..
सुटू पाहतो तसा त्यात गुरफटतो सध्या!

बरसायाला हवी तशी जागाच मिळेना..
भरून येतो..पुन्हा पुन्हा ओसरतो सध्या!

अर्ध्या हळकुंडाने तेव्हा पिवळा झालो..
आशयघन शब्दांना शोधत फिरतो सध्या!

मानेवरती पेलुनिया जू भवितव्याचे
आयुष्याची जमीन नांगरतो सध्या
>>> मस्तच...

शेवटच्या शेरात उला मिसरा अजून सहज आला तर आवडेल..

जबरदस्त ! अभिनंदन !

छान.